‘मराठा लाईट इन्फंट्री’चा गौरवशाली इतिहास

19 Feb 2022 22:52:04

Maratha Regiment
 
 
 
 
‘मराठा रेजिमेंट’च्या सर्व ‘बटालियन’ या उत्तर आफ्रिका, युरोप, ब्रह्मदेश येथे लढल्या आणि आपल्या मर्दूमकीचा ठसा त्या भूप्रदेशावर उमटवला. याच युद्धातील असीम शौर्याबद्दल ‘मराठा बटालियन’च्या नामदेव जाधव आणि यशवंत घाडगे यांना खास ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ने इटलीत सन्मानित करण्यात आले. असा हा ‘मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट’चा गौरवशाली इतिहास आहे. आपल्या पूर्वजांची ही कर्तबगारी आपल्याला माहिती हवी.
 
 
 
४ फेब्रुवारी, १६७० साली छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सेनानी तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक उद्गार होते की, ‘गड आला पण सिंह गेला.’ या ऐतिहासिक लढाई दिवशी ‘मराठा रेजिमेंट’ ज्यांचे सैनिक महाराष्ट्रातले असतात, ‘मराठा लाईट इन्फंट्री’चा वर्धापन दिवस साजरा करतात. १६ डिसेंबर, २०२२च्या ‘सैन्य दिना’च्या दिवशी एका मराठा बटालियनला युनिट सायटेशन, ‘४ मराठा बटालियन युनिट एप्रिशेसन’ देण्यात आले. एक ‘मराठा बटालियन’ला ‘नॉर्दन आर्मी कमांडर’चे ‘युनिट प्रीसिएशन’ देण्यात आले. २०२१ मध्ये ‘मराठा रेजिमेंट’ला पाच सेना मेडल आणि इतर अनेक ‘शूरता पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. एका ‘मराठा बटालियन’मध्ये ७५० ते ८०० सैनिक, ३५ ते ४५ आणि १५ ते २० ‘ऑफिसर्स’ असतात. दरवर्षी पाच ते सहा हजार सैनिक आणि अधिकारी निवृत्त होतात आणि तेवढेच नवीन प्रत्येक वर्षी भरती केले जातात. आज महाराष्ट्रमध्ये निवृत्त झालेल्या मराठा सैनिकांची संख्या दोन लाखांहून जास्त आहेत. ‘मराठा रेजिमेंट’मध्ये २१ ‘इन्फ्रंटी बटालियन्स’, चार ‘राष्ट्रीय रायफल्स बटालियन्स’, दोन ‘स्पेशल फॉर्सेस बटालियन’, आणि एक ‘मेक इन्फंट्री बटालियन’ आहे.
 
 
 
‘मराठा लाईट इन्फंट्री’ची युद्धगर्जना
‘मराठा लाईट इन्फंट्री’चे चिन्ह अशोकचक्र, ढाल-तलवार व तुतारी हे आहे. ‘मराठा रेजिमेंट’चे मुख्यालय बेळगावात आहे. ‘मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट’चा पोशाख हिरवी बेरेट, त्यावर लाल-हिरव्या पिसांचा तुरा, हिरवी लॅनयार्ड जी खांद्यावर असते. त्यांचा बिल्ला म्हणजे शिकारीच्या वेळेस वाजवण्यात येणार बिगूल हा आहे. ‘मराठा लाईट इन्फंट्री’ची युद्धगर्जना आहे, ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...’ आपल्या देशातही स्वातंत्र्याच्या काळातच काश्मीर खोर्‍यातील घुसखोर टोळ्यांचा बंदोबस्त १९४७ साली तीन मराठा छत्रीधारी सैनिकांच्या बटालियनने केला. त्यानंतर गोवा मुक्तीसंग्राम, हैदराबाद मुक्तीसंग्राम, १९६२ चीनचे युद्ध, १९६५ व १९७१चे पाकबरोबरच्या युद्धात ‘मराठा बटालियन’च्या शौर्याच्या कामगिरीचे कौतुक झाले आहे. ’मराठा लाईट इन्फंट्री’चे ‘लिव्हिंग लीजंड’ म्हणजे माजी लष्करप्रमुख जनरल जे. जे. सिंग. ‘गोवामुक्ती संग्रामा’वेळी आदेश मिळताच बेळगावमधील ‘मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट’चे सैनिक बेळगाव, वेंगुर्ल्यामार्गे गोव्यात गेले आणि त्यांनी पोर्तुगीजांना पराभूत करत माघारी जाण्यास भाग पाडले. तसाच पराक्रम त्यांनी दीव-दमण येथेही गाजवला. १९६२च्या युद्धात सिक्कीममध्ये ‘मराठा’ची तुकडी आघाडीवर होती. ‘मराठा लाईट इन्फंट्री’मधील सहा ‘मराठा बटालियन’ची स्थापना दि. १ फेब्रुवारी, १९६२ रोजी आली. त्याच वर्षी या ‘बटालियन’ला चीनबरोबरच्या युद्धात सहभागी होण्याचा बहुमान मिळाला.
 

MLI 
 
 
 
टक्कर विहार, साळुंके विहारचा इतिहास
१९६५च्या युद्धात अमृतसर वाघा येथून आत प्रवेश करत पाकिस्तानी हद्दीतील बुर्ज ठाण्यावर कब्जा करणारी तुकडी मराठाची होती. पुण्यात ज्यांच्या नावाने ‘साळुंके विहार’ हा परिसर ओळखला जातो, त्या पांडुरंग साळुंके यांना याच लढाईसाठी ‘महावीरचक्र’ मिळाले होते. स्वतंत्र हिंदुस्थानच्या सरकारने पराक्रमासाठी ‘अशोक चक्र’ देण्यास सुरुवात केल्यानंतर पहिले ’अशोक चक्र’ दोन ‘मराठा बटालियन’चे कॅप्टन एरिक ठक्कर यांनी मिळवले. हडपसरमधील लष्करी अधिकार्‍यांच्या निवासस्थानांचा परिसर असलेला टक्कर विहार हा परिसर ज्यांच्या नावे ओळखला जातो, त्यांना मिझोराम, नागालँडमध्ये बंडखोरांशी लढताना गाजवलेल्या पराक्रमासाठी ‘अशोकचक्रा’ने सन्मानित करण्यात आले होते. १९७१च्या युद्धात तत्कालीन पूर्व पाकिस्तानात ‘मराठा लाईट’च्या सैनिकांनी आपल्या पराक्रमाने सर्वांना थक्क केले. मेजर नांबियार आणि लेफ्टनंट कर्नल ब्रार यांना ढाकाच्या लढाईसाठी ‘वीरचक्रा’ने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील कर्नल संभाजी पाटील यांच्या ‘२२, मराठा’च्या तुकडीने असामान्य धैर्य दाखवत हिली प्रांत ताब्यात घेतला. त्याचवेळी लाहोरकडे जाणार्‍या रेल्वेमार्गावरील नैनाकोट हे पाकिस्तानातील अत्यंत मोक्याचे ठाणे मराठाच्याच तुकडीने आपल्या विलक्षण पराक्रमाच्या जोरावर ताब्यात घेतले. या लढाईसाठी पुण्यातील कर्नल सदानंद साळुंके यांना ‘वीरचक्रा’ने सन्मानित करण्यात आले.
 

 
‘७, मराठा लाईट इन्फंट्री’ आफ्रिकेतील कांगो देशात
काश्मीर असो वा अरुणाचल, राजस्थान असो वा सियाचीन अशी एकही सीमा नाही, जिथे ‘मराठा’ची तुकडी तैनात नाही. केवळ देशातच नव्हे, तर देशाबाहेर युद्ध करण्याची आणि ते जिंकण्याची परंपरा ‘मराठा बटालियन्स’नी आजही जीवंत ठेवली आहे. अगदी संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेतही ‘मराठा’ची कामगिरी अत्यंत उजवी राहिली आहे. आपले सैनिक अशा ठिकाणी अन्य परकीय सैन्याच्या तुलनेत उत्तम कामगिरी करतात, याची दखल संयुक्त राष्ट्रांनीही घेतली आहे. माझी बटालियन ‘७, मराठा लाईट इन्फंट्री’ सध्या आफ्रिका खंडात कांगो देशात शांतिसेना म्हणून काम कार्यरत आहे. भारतीय लष्कराच्या ‘पॅराशूट रेजिमेंट’मध्येही ‘मराठा रेजिमेंट’च्या सैनिकांचा समावेश आहे. ‘सेकंड पॅरा’च्या तुकडीनेही उत्तम काम केले आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक’सारख्या अत्यंत अभिमानास्पद कारवाईतही ‘मराठा’च्या सैनिकांचा समावेश होताच. कर्नल व्ही. बी. शिंदे यांनीच पहिली ‘स्पेशल फोर्सेस बटालियन’ सुरू केली. २००८ साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर हेलिकॉप्टरमधून दोरीने खाली उतरून दहशतवाद्यांवर हल्ला चढविणारी पहिली व्यक्ती ही ‘मराठा’चेच कर्नल होते.
 
 
 
‘मराठा बटालियन’च्या शौर्यगाथा
मराठा सैनिक गरीब कुटुंबांतून आले असले, तरी ते अत्यंत काटक, चपळ, कुशल, तगडे आणि कुठल्याही कामगिरीसाठी सदैव सज्ज असलेले आणि शिस्तीचे भोक्ते असतात. म्हणूनच रणांगणावर त्यांच्या शौर्याला धार चढते. आधुनिक काळातील कोणतेही तंत्रज्ञान व डावपेच ते सहज आत्मसात करतात. ‘मराठा बटालियन’नी दुसर्‍या महायुद्धातही आपल्या पराक्रमाची चमक दाखवली होती. आफ्रिका खंडातील पहाडांपासून ते वाळवंटांपर्यंत सर्व प्रकारच्या युद्धभूमीवर ‘मराठा बटालियन’ने शौर्य गाजवून सर्व लढाया जिंकल्या. या युद्धात ‘मराठा रेजिमेंट’च्या सर्व ‘बटालियन’ या उत्तर आफ्रिका, युरोप, ब्रह्मदेश येथे लढल्या आणि आपल्या मर्दूमकीचा ठसा त्या भूप्रदेशावर उमटवला. याच युद्धातील असीम शौर्याबद्दल ‘मराठा बटालियन’च्या नामदेव जाधव आणि यशवंत घाडगे यांना खास ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ने इटलीत सन्मानित करण्यात आले.
 
 
 
असा हा ‘मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट’चा गौरवशाली इतिहास आहे. आपल्या पूर्वजांची ही कर्तबगारी आपल्याला माहिती हवी. आपण ती पुढच्या पिढीला सांगायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज हे ‘मराठा’चे दैवत आहे. बोल ‘श्री शिवाजी महाराज की जय’ ही त्यांची युद्धघोषणा आहे. आपण ‘शिवाजींचे बच्चे आहोत, आपल्यामुळे त्यांच्या नावाला बट्टा लागता कामा नये,’ हेच ‘मराठा रेजिमेंट’मध्ये नव्याने दाखल होणार्‍या प्रत्येकाला शिकवले जाते. चपळता, उत्तम शरीरसंपदा, काटकपणा, गनिमीकावा आणि युद्धकौशल्य यांच्या बळावरच ‘मराठा लाईट इन्फंट्री’ आज देशाच्या सर्व सीमा सांभाळण्यात आघाडीवर आहे आणि यापुढेही राहील. ‘मराठा लाईट इन्फंट्री’ने स्वातंत्र्यानंतर देशाच्या रक्षणार्थ दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. प्रत्येक युद्धात मराठे आघाडीवर होते. त्यासाठी वेळोवेळी ‘महावीरचक्र’, ‘अशोकचक्र’, ‘वीरचक्र’आदी सन्मान देऊन लष्कराने त्यांची जाणीव ठेवली आहे
 
 
 
‘मराठा रेजिमेंट’चे स्फूर्तिगीत
‘मराठा रेजिमेंट’ स्फूर्तिगीताचे शब्द आहेत, आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकरांचे. या शब्दांना सुरांचा साज चढवला आहे, बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांनी. या ओळी मराठा ‘रेजिमेंट’मध्ये रोज सामुदायिकपणे म्हटल्या जाणार्‍या स्फूर्तिगीतातील आहे.
 
 
मर्द आम्ही मराठे खरे, दुष्मनाला भरे कापरे।
मर्द आम्ही मराठे खरे, दुष्मनाला भरे कापरे। मर्द आम्ही मराठे खरे , दुष्मनाला भरे कापरे। देश रक्षाया, धर्म ताराया, कोण झुंजीत मागे सरे॥धृ॥
  
वादळापरी आम्ही पुढेच चालतो,
जय शिवाजी गर्जुनी रणांत झुंजतो।
मराठा कधी न संगरातुनी हटे,
मारुनी दहास एक मराठा कटे।
सिंधु ओलांडुनी, धावतो संगिनी, पाय आता न मागे सरे ॥१॥
 
व्हा पुढे अम्हा धनाजी, बाजी सांगती,
वीर हो उठा कडाडतात नौबती।
विजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी,
पूर्वजापरी आम्ही अजिंक्य संगरी।
घेऊ शत्रूवरी झेप वाघापरी,
मृत्यू अम्हा पुढे घाबरे ॥२॥
  
भारता आम्ही तुलाच देव मानतो,
हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो।
राखतो महान आमची परंपरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवती धरा।
ह्याच मातीवरी प्राण गेला तरी,अमुची वीर गाथा उरे... ॥३॥
 
 
 
- (नि.) ब्रि. हेमंत महाजन
 
 
Powered By Sangraha 9.0