कोअर ऑफ सिग्नल्स पथक - वय वर्षं १११

19 Feb 2022 11:50:13
 

कोअर 
 
 
दि. १५ फेब्रुवारी, १९११ या दिवशी इंग्रजांनी लेफ्टनंट कर्नल पॉवेल याच्या अधिपत्याखाली ‘इंडियन सिग्नल सर्व्हिस’ची स्थापना केली. पुढे पथकाचं नाव ‘इंडियन सिग्नल कोअर’ असं झालं. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धात; तसंच स्वातंत्र्यानंतर १९४७-४८, १९६२, १९६५, १९७१ आणि १९९९ अशा सर्व युद्धांमध्ये ‘सिग्नल कोअर’ने उत्कृष्ट कामगिरी बजावून ‘स्विफ्ट अ‍ॅण्ड अ‍ॅलर्ट’ हे आपल्या पथकाचं घोषवाक्य सार्थ ठरवलं आहे.
 
 
दि. २ फेब्रुवारी, १६६१. कारतलबखान उझबेग हा लोहगडाजवळून उंबरखिंडीच्या मार्गाने कोकणात उतरत होता. मे १६६० मध्ये औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्तेखान दीड लाख फौज घेऊन हिंदवी स्वराज्यावर चालून आला. पुण्यात खुद्द शिवरायांच्या ‘लाल महाल’ या राहात्या वाड्यातच त्याने मुक्काम ठोकला. जून १६६० मध्ये त्याने पुण्याजवळचा चाकणच्या किल्ल्याला वेढा घालून ऑगस्ट 1660 मध्ये चाकणचा किल्ला जिंकला. पुढचे सहा महिने मुघली ऐषआरामात गेले. १६६१च्याआरंभी त्याला जाणीव झाली की, काहीतरी हालचाल केली पाहिजे, तेव्हा त्याने कारतलबखान उझबेग या एका बड्या सरदाराला कोकणची मोहीम फर्मावली.
 
 
कारतलबखान मुघली परंपरेनुसार भरपूर फौज, भरपूर शस्त्रसामग्री, भरपूर खजिना घेऊन पुण्यातून बाहेर पडला. पुणे-लोणावळा-खंडाळा-खोपीवली (आधुनिक नाव ‘खोपोली’) या बोर घाटाने खाली उतरण्याऐवजी लोणावळ्यातून उंबरखिंड मार्गाने थेट पाली (गणपतीची) गाठायची नि पुढे पेणवर जायचं, असा बहुधा त्याचा बेत होता. आजच्या भाषेत हा मार्ग लोणावळ्याच्या नाग फणी कड्याच्या बाजूने (ड्युक्स नोज) सुरू होतो. अत्यंत तीव्र उताराने घाट उतरत तो शेमडी नावाच्या गावाजवळ कोकणात पोहोचतो. हे गाव आजच्या खोपोली-पाली रस्त्यावर येतं.
 
 
शिवरायांना राजगडावर त्वरित खबर पोहोेचली .ते यावेळी तळकोकणवर मोहीम करण्याच्या तयारीत होते. लगेच त्यांचा बेत पक्का झाला. प्रथम उंबरखिंडीत कारतलबरखानाचा समाचार घ्यायचा नि तसंच पुढे थेट दाभोळवर धडकायचं. त्याप्रमाणे दि. २ फेब्रुवारी, १६६१ या दिवशी कारतलबखानाची भली थोरली फौज उंबरखिंडीतून तुंगारण्यात उतरत असताना शिवराय आणि सरनौबत नेताजी पालकर यांनी घाटाच्या दोन्ही बाजू आवळून धरल्या. ही घाटवाट एखाद्या नळीसारखी अरूंद आहे. मैदानी युद्धाची सवय असलेल्या मुघली फौजेला डोंगरातल्या, जंगलातल्या अरूंद आणि अडचणीच्या जागी लढण्याची कधीच सवय नव्हती. त्यांच्या लांब आणि सरळ पात्याच्या तलवारी इथे उपयोगी नव्हत्या. उलट मराठ्यांच्या तोकड्या नि वळलेल्या पात्यांच्या तलवारी सपासप मुघली मुंडकी उडवत होत्या.
 
 
अखेर कारतलबखान शरण आला. महाराजांनी त्यांच्या वकिलाला सांगितलं की, “आम्ही मागतोय ती खंडणी द्या आणि आलात तसे मुकाट्याने पुण्याला परत जा.” खानाच्या वकिलाने “होय,” असा जबाब दिल्यावर महाराजांचे सुमारे ५० ढालाईत म्हणजे पायदळ शिपाई घाटवाटेवर सर्वत्र गेले आणि मोठमोठ्याने ओरडून त्यांनी आपल्या सैनिकांना महाराजांचा हुकूम सांगितला की, लढाई बंद करा.
 
 
ही झाली इतिहासकाळातली ‘मिलिटरी कम्युनिकेशन’ची एक पद्धत. ढालाईत म्हणजे पायदळ शिपाई किंवा हरकारा म्हणजे पडेल ते काम करणारा निरोप्या हा रणांगणावर एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी धावत जाऊन निरोप देत किंवा घेत असे. युद्ध चालू असताना असे निरोप किंवा पाण्याच्याखाली घेऊन सैनिकांना पाणी देणारे भिस्ती किंवा जखमी होऊन पडलेल्यांना उचलून मागे आणणारे बिनलढाऊ लोक रणांगणावर सर्वत्र फिरत असतं. त्यांच्यावर हत्यार चालवू नये, असा संकेत होता आणि शक्यतो तो दोन्ही बाजूंनी पाळला जात असे. रणांगण जर खूप विस्तीर्ण असेल, तर हे संदेश देवाणघेवाणींच काम ढालाईताऐवजी घोडेस्वारावर सोपवलं जात.
 
 
दि. १० ऑगस्ट, १७६३. मराठ्यांची छावणी गोदावरीच्या तीरावर राक्षसभुवन इथे पडली होती. मराठ्यांचे मुख्य सेनापती होते खुद्द माधवराव पेशवे. वय वर्ष फक्त १८. त्यांच्याबरोबर होते काका राघोबादादा. निदान त्या मोहिमेत तरी राघोबा मनःपूर्वकमाधवरावांच्या पाठीशी होते. समोर होता हैद्राबादचा निजाम नबाब, निजाम अली खान आणि त्याचा सेनापती विठ्ठल सुंदर पर्शरामी.
 
 
विठ्ठल सुंदर, अत्यंत हुशार आणि धूर्त होता. हत्तीवरून तिरंदाजी करीत निजाम सैन्याची फळी फोडून आत घुसू पाहणार्‍या राघोबांना त्याने मुद्दामच पुरेसं आत घेतलं आणि मग एकदम एल्गार करून त्यांचा हत्ती घेरला. आता राघोबादादा मारले जाणार वा कैद तरी नक्कीच होणार, असा रंग दिसू लागला. पिछाडीवरून सैन्याचं सूत्रसंचालन करणार्‍या माधवरावांना ही बातमी दिली एका घोडेस्वाराने. माधवरावांनी जातीने विठ्ठल सुंदराच्या पथकावर चढाई केली. विठ्ठल सुंदरही हत्तीवरून तिरंदाजी करीत होता. माधवराव तलवारीने हातघाईची लढाई करीत त्याच्यासमोर आले. एवढ्यात एक भालाईत घोडेस्वार त्यांच्यापुढे आला आणि मुजरा करून म्हणाला, “श्रीमंत,आज्ञा असावी, हा माझा बळी.” माधवरावांनी हाताच्या इशार्‍याने संमती दिली. त्या स्वाराने भाला धरून विठ्ठल सुंदर अंबारीतच कोसळला. त्या भालाईतांचं नावं होतं महादजी शितोळे. पुण्याच्या कसबा पेठेतला रहिवासी.
 
 
दि. ८ ऑगस्ट, १९६५. ठिकाण पंजाब प्रांतातील खेमकरण जवळचं आसल उत्ताड नावाचं गाव. पाकिस्तानच्या रणगाडा पथकाचे सुमारे १२५ पॅटन रणगाडे आसल उत्ताडवरून पुढे अमृतसरच्या दिशेने जाणार, ही वार्ता भारताच्या चौथ्या माऊंटन डिव्हिजनचे सेनापती मेजर जनरल गुरूबक्षसिंग यांना कळली. त्यांनी ताबडतोब आसल उत्ताड गावाच्या परिसरातील उसाच्या उंच वाढलेल्या पिकामध्ये, घोड्याच्या, नालाच्या आकाराच्या व्यूहात भारतीय रणगाडे लपवले. चित्रपटात गाणी आणि नाच टाकण्यासाठी कशा ‘सिच्युएशन’ निर्माण करतात; तशी पाकिस्तानच्या पॅटन रणगाड्यांचा ‘बँड’ वाजवण्यासाठी गुरुबक्षांनी मोठी ‘रोमॅण्टिक सिच्युएशन’ निर्माण केली. चहूबाजूंनी गच्च माजलेला ऊस. त्यामधून जाणारा एकमेव रस्ता. तो देखील मुद्दाम कालव्याच्या पाण्याने रपरपीत करून ठेवलेला आणि उसात लपलेले भारतीय रणगाडे! पाकिस्तानी रणगाड्यांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी उतावीळपणे वाट पाहाणारे भारतीय गनर्स!
 
 
संपूर्ण पाकिस्तानी पथक घोड्याच्या नालाच्या पूर्ण आत आल्याची वार्ता गुरुबक्षांना मिळाली. कुणी दिली? आता प्रत्यक्ष कुणी निरोप्याने ती आणण्याची गरज नव्हती. ते काम करायला लघुपल्ल्याचे ट्रान्समीटर्स आणि फिल्ड टेलिफोन्स होते. गुरुबक्षांनी त्या फील्ड टेलिफोनवरुनच आदेश दिला- घोड्याच्या नालाच्या दोन्ही बाजूंनी एकत्र या आणि नालाचा आकार आता पूर्ण गोल करा.
 
 
मग सुमारे ११ किमी व्यास असणार्‍या या गोलात पॅटन रणगाड्यांची जबरदस्त शिकार सुरू झाली. मृत्युगोलच ठरला तो. दि. ८ ऑगस्ट ते १० ऑगस्ट अशी तीन दिवस अहोरात्र एक भीषण लढाई सुरू होती. जेव्हा पाकिस्तानी शरणागतीने ती थांबवली, तेव्हा पाकिस्तानने तब्बल १०० अत्याधुनिक पॅटन रणगाडे उद्ध्वस्त किंवा निकामी होऊन पडले होते. ही लढाई इतकी भयंकर आणि हिंस्र होती की, जगभरच्या लष्करी इतिहासकारांच्या मतानुसार, दुसर्‍या महायुद्धातल्या जर्मन रणगाडादल आणि सोव्हिएत रशियन रणगाडादल यांच्यातील कुर्स्क या ठिकाणच्या लढाईच्या (बॅटल ऑफ कुर्स्क) खालोखाल ही लढाई गणली जाते. इतर सर्वच घटकांप्रमाणेच फील्ड टेलिफोन या यंत्रणेचा देखील या लढाईत महत्त्वपूर्ण सहभाग होता.
 
 
इतिहासकाळी ढालाईत, हरकारे, घोडेस्वार यांच्याचप्रमाणे संदेशवहनासाठी झेंड्यांनी पण खाणाखुणा केल्या जात. रात्रीच्या वेळी मशालींच्या विशिष्ट हालचाली करून संदेश दिले-घेतले जात. शिकवून तयार केलेल्या कबुतरांकरवी संदेश पाठवले जात. पुढे १९व्या शतकात ढाल-तलवार-भाले यांच्यापेक्षा तोफखान्यांचं महत्त्व वाढलं. तोफांच्या वाढत्या मारक पळ्यामुळे खूप लांबवरून शत्रूवर तोफांचा मारा करता येणं शक्य झालं. पण, तो मारा अचूक व्हावा म्हणून टेहळणीचं महत्त्व वाढलं. एखाद्या उंच झाडावरून, मचाणावरून टेहळ्या समोरच्या शत्रूच्या पथकाचं व्यवस्थित निरीक्षण करून, खालच्या आपल्या गोलंदाज तोपचीला विशिष्ट खाणाखुणा (सिग्नल) करीत असे. तोपची त्यानुसार तोफेचा निशाणा बांधून गोळा डागत असे. उत्तरोत्तर हे टेहळणीचं काम इतकं वाढत गेलं की, ‘सिग्नल कोअर’ असं स्वतंत्र पथकच उभं करून ते इंजिनिअरिंग पथकाच्या हाताखाली ठेवण्यात आलं.
 
 
सन १८४४ मध्ये अमेरिकन संशोधक सॅम्युअल मोर्स याने ‘टेलिग्राफिक मोर्स कोड’ शोधून काढलं. त्याचा प्रचंड फायदा जगभरच्या लष्करांना झाला. १८५७चं क्रांतियुद्ध भारतीय क्रांतिकारक हरले, याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे इंग्रजांना उपलब्ध असलेलं टेलिग्राम-तार हे अत्यंत वेगवान संदेशवहन तंत्र आपल्याकडे नव्हतं. लगेचच झालेल्या १८६१च्या अमेरिकन यादवी युद्धातही राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनला तार तंत्रज्ञानाचा खूप फायदा झाला.
 
 
यानंतर जगभरच्या लष्करी आणि नाविक दलांमध्ये सिग्नल पथकांची झपाट्याने सुधारणा झाली. आजच्या आपल्या सिग्नल कोअरची स्थापना अर्थातच इंग्रजांनी केली. दि. १५ फेब्रुवारी, १९११ या दिवशी इंग्रजांनी लेफ्टनंट कर्नल पॉवेल याच्या अधिपत्याखाली ‘इंडियन सिग्नल सर्व्हिस’ची स्थापना केली. पुढे पथकाचं नाव ‘इंडियन सिग्नल कोअर’ असं झालं. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धात; तसंच स्वातंत्र्यानंतर १९४७-४८, १९६२, १९६५, १९७१ आणि १९९९ अशा सर्व युद्धांमध्ये ‘सिग्नल कोअर’ने उत्कृष्ट कामगिरी बजावून ‘स्विफ्ट अ‍ॅण्ड अ‍ॅलर्ट’ हे आपल्या पथकाचं घोषवाक्य सार्थ ठरवलं आहे. परवा दि. १५ फेब्रुवारी, २०२२ला पथकाने आपला १११वा वाढदिवस साजरा केला.
 
 
Powered By Sangraha 9.0