अण्णा हजारे यांनी दि. १४ फेब्रुवारीपासून किराणामालाच्या दुकानात दारु विकण्याच्या निर्णयाविरुद्ध उपोषणाचे शस्त्र उगारले. परंतु, १४ फेब्रुवारी तारीख आली आणि गेली. पण, अण्णांचे उपोषण काही सुरू झाले नाही. याचे कारण असे की, महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी लगेचच न करण्याचा निर्णय घेतला, जनतेची मते मागविण्याचे त्यांनी ठरविले. मर्यादित अर्थाने का होईना, हा अण्णांच्या न झालेल्या उपोषणाचा विजय आहे.
सत्तेची ऊब अशी असते की, ती सत्ताधिशांना अत्यंत उग्र बनविते. सत्ताधारी, मग तो हुकूमशहा असो किंवा लोकशाहीतील मुख्यमंत्री असो, त्याच्या निर्णयाविरुद्ध कुणी आवाज उठविता कामा नये, असे त्याला वाटत राहते. जो कुणी आवाज करील त्याला ‘शांत’ कसे करता येईल, याचा विचार सत्तेवर बसलेला माणूस करतो. तो जर हुकूमशहा असेल, तर टीका करणारी व्यक्ती एकतर यमसदनी पाठविली जाते, नाहीतर तुरूंगात पाठविली जाते आणि तो जर लोकशाही पद्धतीचा राज्यकर्ता असेल, तर अत्यंत असभ्य भाषेत टीका करणाऱ्यांचे वाभाडे तो काढीत राहतो, त्याचा ‘सामना’ होतो.
सत्ताधारी शिवसेनेचे मुखपत्र म्हणते, “महाराष्ट्र राज्यात त्यांना जगायची इच्छा नसल्याचे जाहीर केले आहे. अण्णांना का जगायचे नाही, त्यांना असले कसले वैफल्य आले आहे, त्यांच्या मनात नैराश्याचे काळे ढग का उभे राहिले आहेत? अण्णा हे भाजपचीच भाषा बोलू लागले आहेत. अण्णांचे वैफल्य हे आहे की, अण्णांच्या प्रत्येक आंदोलनातील हवा निघून गेली आहे. मोदी-शाहंचे सरकार केंद्रात आल्यापासून त्यांना कुणी फारसे विचारत नाही. महाराष्ट्रावर अण्णा कसल्या गुळण्या टाकत आहेत, कोणाच्या प्रेरणेने, हे त्यांनाच माहीत! अधूनमधून ते देशभक्तीचा बाणा दाखवित असतात. चिनी सैन्य सध्या लडाखमध्ये घुसले आहे. चिनी आक्रमण पाहून अण्णांमधील राष्ट्रभक्त जेव्हा जागा होईल, तेव्हा केंद्र सरकारला सवाल विचारील असे वाटले होते. देशाच्या सीमा दुश्मनांनी पार केल्या, ते पाहून मला जगावेसे वाटत नाही, असे अण्णांनी म्हणायला हवे होते.”
कालचक्र थोडे उलटे फिरवूया. महाराष्ट्रात सत्तेवर काँग्रेस किंवा राष्ट्र्रवादी काँग्रेस असती आणि शिवसेना विरोधी बाकावर असती व पवार किंवा नाना पटोले यांनी दारू किराणा मालाच्या दुकानातून विकण्याचा निर्णय घेतला असता, तर शिवसेनेने उग्र आंदोलन करण्याची धमकी दिली असती. अण्णा हजारे यांचे उपोषणाचे जंगी स्वागत केले असते आणि ‘सामना’चा अग्रलेख ‘अण्णा, महाराष्ट्र वाचवा!’ असा असता. सत्तेचे राजकारण असे असते. सत्तेची दारू जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत सगळेच शुद्धीवर असतात आणि सत्तेची दारू चढली की, मग दुकानात दारू का विकायची नाही, असा विषय पुढे येतो. या सत्ताकारणाचा आपण आनंद घ्यायला पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधी बाकावर बसणाऱ्यांच्या भूमिका सतत कायम राहतील, या भ्रमात राहू नये आणि दोघांच्या मागे बुद्धी गहाण ठेवून किती जायचे, याचा विचार आपला आपण करायला पाहिजे.
या सत्ताकारणाचा दारू विषय थोडासा बाजूला ठेवूया आणि अण्णा हजारे व त्यांचे उपोषण याकडे येऊया. अण्णा हजारे आणि त्यांचे उपोषण हा विषय काहींनी थट्टेचादेखील केला आहे. अण्णा हजारे गांधीजींची नक्कल करतात, उपोषणाचे त्यांचे ‘टायमिंग’ चुकते. ज्या कारणासाठी उपोषण केले, ते कारण तडीस जात नाही, असे अनेक विषय लिहिले आणि बोलले जातात. संपुआच्या काळात अण्णांनी दिल्लीला उपोषण केले. ते भ्रष्टाचार आणि लोकपाल विधेयकासाठी होते. या एका उपोषणाने तेव्हा सर्व देश ढवळून निघाला. एवढेच नव्हे, तर झोपेतून जागा झाला. सगळ्या प्रकारची विविधता असणाऱ्या भारतात सर्व राज्यांत आणि भाषिकांत अशी जागृती निर्माण करण्याचे सामर्थ्य ज्याच्याकडे आहे, त्याला ‘सामान्य माणूस’ म्हणता येणार नाही आणि सामनाकार म्हणतात त्याप्रमाणे ते भाजपची भाषा बोलणारे आहेत, असेही नाही. एखाद्या पक्षाची भाषा बोलणारी व्यक्ती सर्वमान्य होणे अशक्य आहे. अण्णा भाजपचे नाहीत आणि भाजप अण्णाचा नाही, अण्णा देशाचे आहेत.
अण्णा ही देशाची नैतिक शक्ती आहे. सत्तेवर बसलेल्या माणसाकडे सत्तेची शक्ती येते. कुणालाही अटक करणे, वाटेल ते आरोप ठेवून तुरूंगात पाठविणे. ते नाही जमले, तर भन्नाट आरोप करीत राहणे. त्याच्या समर्थकांना त्रास देणे. समर्थक जर व्यावसायिक असेल, तर त्याची व्यावसायिक कोंडी करणे. ही सगळी कामे सत्तेच्या दारूमुळे करता येतात. अर्णब गोस्वामीला तुरूंगात पाठविता येते. कंगना राणावतचे कार्यालय उद्ध्वस्त करता येते. राणेंना अटक करता येते आणि त्यांच्या मुलांवर खटले भरता येतात.
ही सत्ता आळवाच्या पाण्यासारखी असते. तिचे अस्तित्त्व दीर्घकाळाचे नसते. सत्ता कधीतरी जाणार आहे आणि आज ज्यांना आपण त्रास देत आहोत, ते उद्या सत्तेत येण्याची शक्यता आहे. ते सत्तेवर आल्यानंतर सूडाचे राजकारण सुरु होईल. सत्तेवर असणारे आज जे करत आहेत, त्याची परतफेड करणे सुरू होईल. पुन्हा पुनरावृत्ती करायची, तर हे सत्तेचे राजकारण आहे. ते असेच चालणार. परंतु, अण्णा हजारेंसारखी व्यक्ती याच्यापलीकडे असते. अशा व्यक्तीकडे कोणतीही दंडशक्ती नसते. अज्ञांतिक पोलिसदल नसते. मदतीला सचिन वाझे किंवा परमवीर सिंह नसतो. असतात ती सामान्य माणसे. अण्णांकडे शक्ती असते. ती एका शब्दात सांगायचे, तर नैतिकता हीच त्यांची शक्ती आहे. ही शक्ती साधनेने प्राप्त होते. त्यासाठी तपस्या करावी लागते. आपल्या प्राचीन इतिहासात तपस्वी मुनी, महर्षींची नावे येतात. भगवान गौतम बुद्धांच्या शिष्यांचीही नावे येतात. जैनमुनींची नावे येतात. या परंपरेतील तपस्वी अंगावरील दोन वस्त्रे, हाताता कमंडलू, झोळीत थोडीबहुत औषधे, सुईदोरा, एवढ्या संपत्तीवर मरेपर्यंत जगत. अतिशय आनंदात जगत. शांतीचा आंतरबाह्य अनुभव ते घेत. म्हणून असा एखादा तपस्वी, जैनमुनी, बौद्ध भिक्कू चुकून राजदरबारी गेला तर राजा सिंहासनावरुन उठून त्याचे स्वागत करी. त्याला उच्च आसनावर बसवी. काहीवेळा त्याचे पायदेखील धूत असे. त्याच्या भोजनाची व्यवस्था करीत असे आणि नम्रपणे आपली काय आज्ञा आहे, हे विचारी. राजसत्तेने धर्मसत्तेपुढे म्हणजे नैतिक शक्तीपुढे नम्र असले पाहिजे, ही आपली थोर परंपरा आहे.
आधुनिक काळात हिमालयात जाऊन तपस्या करणारे तपस्वी जसे आहेत, तसे जनात राहून तपस्या करणारे योगीदेखील आहेत. अण्णा हजारे त्यापैकीच एक! यादवबाबांच्या मंदिरात त्यांचा निवास, अंगावरील वस्त्रे ही त्यांची संपत्ती आणि जनकल्याणाचा श्वासोच्छवास हे त्यांचे जीवन. त्यांचे उपोषण एखाद्या राजकीय पक्षाला सोयीचे नसेल, तर त्यात त्यांचा दोष नाही. पूर्वीचे तपस्वी अहंकारी राजाला शाप देत. इंद्रालाही शापवाणी भोगावी लागलेली आहे. राजा परिक्षितालादेखील तक्षकाच्या हातून मृत्यूची शापवाणी भोगावी लागली. आता एवढे सामर्थ्य असणारे तपस्वी अभावानेच सापडतील. परंतु, लोकशाहीत अण्णा हजारेंसारख्या तपस्वींची शक्ती लोकशक्तीत असते. ही लोकशक्ती नैतिक अंगाने जेव्हा जागी होती, तेव्हा सत्तेची दारू प्यायलेल्यांची सिंहासने डळमळू लागतात. २०१४च्या परिवर्तनात अण्णांनी जागृत केलेल्या लोकशक्तीचा प्रभाव नाही, असे म्हणणे म्हणजे अज्ञान प्रकट करण्यासारखे होईल.
यासाठी ज्यांना सत्तेवर राहायचे आहे किंवा यायचे आहे, त्यांनी नैतिक लोकशक्तीचा आदर करण्याचे सोडता कामा नये. ही लोकशक्ती लोकशाहीतील परिवर्तनाची शक्ती असते. दुकानात दारू ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचे भले होईल, त्यांना चार पैसे मिळत असले तरी युक्तिवाद म्हणजे देहविक्री करून अधिक पैसे मिळतील, असे सांगण्यासारखे आहे. शेतकऱ्यांना धनप्राप्ती करून देणयाची मार्ग समाजाला दारूचे व्यसन लावणे नव्हे. एका दारूमुळे यादव कुळाचा नाश झाला आणि भारतातील अनेक सुलतान दारूच्या पिंपात बुडून मेले. महाराष्ट्र, ‘महाराष्ट्र’च राहिला पाहिजे. तो जेव्हा ज्ञानदेवांचा, तुकाराम महाराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन उभा राहील, तेव्हाच तो ‘महाराष्ट्र’ या पदवीस पात्र होईल. अण्णा हजारे वर दिलेल्या तिघांची परंपरा जपणारे असल्यामुळे त्यांच्या उपोषणाचा नैतिक संदेश, सत्तेची नशा थोडी कमी करून घेतला पाहिजे होता. त्यात सत्ताधाऱ्यांचे कल्याण आहे.