गुहागर किनाऱ्यावर कासवाला लावले 'सॅटलाईट ट्रान्समीटर'; नामकरण केले...
15 Feb 2022 20:13:28
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर किनाऱ्यावर मंगळवारी (१५ फेब्रुवारी) सागरी कासवाला 'सॅटलाईट ट्रान्समीटर' ( konkan sea turtle ) लावून पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन' आणि 'भारतीय वन्यजीव संस्थान (डब्लूआयआय) यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विशेष अभ्यास प्रकल्पाअंतर्गत 'सॅटलाईट ट्रान्समीटर' लावलेले हे तिसरे कासव आहे. येत्या काही दिवसांमध्ये अजून दोन कासवांना ट्रान्समीटर लावण्याचा मानस आहे. ( konkan sea turtle )
दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यादरम्यान 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीची मादी कासवे कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात. अरबी समुद्रातील या कासवांचा अधिवास आणि स्थलांतर जाणून घेण्यासाठी त्यांना 'सॅटलाईट ट्रान्समीटर' लावण्याचा निर्णय 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'ने घेतला आहे. याअंतर्गत गेल्या महिन्यात वेळास आणि आंजर्ले किनाऱ्यावर प्रत्येकी एक मादी कासवाला 'सॅटलाईट ट्रान्समीटर' लावण्यात आले होते. त्यांचे नामकरण 'प्रथमा' आणि 'अवनी' करण्यात आले. या मादी कासवांचे समुद्रातील भ्रमण सुरू असतानाच मंगळवारी गुहागर किनाऱ्यावर अजून एका मादी कासवाला 'सॅटलाईट ट्रान्समीटर' लावण्यात आले.
'डब्लूआयआय'चे शास्त्रज्ञ डाॅ. आर.सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत या कासवाला 'सॅटलाईट ट्रान्समीटर' लावण्यात आले. त्यानंतर सायंकाळी तिला पुन्हा समुद्रात सोडले. यावेळी कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी, विभागीय वनाधिकारी आदर्श रेड्डी, रत्नागिरी वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पाटील, मॅंग्रोव्ह फाऊंडेशनचे उपसंचालक डाॅ. मानस मांजरेकर, सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे, संशोधन समन्वयक मोहन उपाध्ये उपस्थित होते. गुहागर किनाऱ्यावरुन सोडलेल्या मादी कासवाचे नाव वनश्री असे करण्यात आल्याची माहिती तिवारी यांनी दिली. तर येत्या काही दिवसात अजून दोन कासवांना सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ( konkan sea turtle)