भारतीय साहित्यात प्राचीन काळापासून एकाहून एक उत्कृष्ट प्रेमकथा वाचायला मिळतात. वैदिक साहित्यात, पुराणात, नाटकात, कथांत आणि काव्यात अनेक तरल प्रेमकथा आल्या आहेत. दि. १४ फेब्रुवारीला कित्येक वर्षांपासून पाश्चात्य देशांत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो, तर आता भारतातही त्याचा प्रसार झाला आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर पाश्चात्य नव्हे तर भारतीय प्रेमकथांचा आढावा या लेखात घेतला आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’, ‘प्रॉमिस डे’ हे मागच्या काही दशकात तरुणाईत लोकप्रिय झालेले उत्सव. तिसर्या शतकाच्या आसपास होऊन गेलेल्या किमान दोन ‘व्हॅलेंटाईन’ नावाच्या सेंटच्या नावाचा हा उत्सव. त्यापैकी एकाने रोमन राज्यात सैनिकांच्या लग्नाला असलेल्या बंदीला न जुमानता, तरुणांची लग्ने लावून दिली होती. दुसर्या एका ‘व्हॅलेंटाईन’ला ख्रिस्ती धर्माचा प्रसार केल्याबद्दल तुरुंगात डांबले होते. तुरुंगात असताना त्याने तेथील अधिकार्याच्या मुलीचा रोग बरा केला होता. त्याने मृत्यूपूर्वी त्या मुलीला पत्र लिहून खाली ‘तुझा व्हॅलेंटाईन’ अशी सही केली होती. या दोन वेगवेगळ्या ‘व्हॅलेंटाईन’च्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘व्हॅलेंटाईन फीस्ट’ला सुरुवात झाली. पुढे प्रेमिकांनी वा पती-पत्नीने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. युरोपमध्ये अनेक चर्च दावा करतात की, त्यांच्याकडे सेंट व्हॅलेंटाईनच्या अस्थी आहेत. काहींच्या मते, फार पूर्वी रोमन प्रेमी युगुले या दिवशी वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्सव साजरा करत असत. चौथ्या शतकात चर्चने त्या उत्सवाचे एका सेंटच्या ‘धार्मिक फीस्ट’मध्ये रुपांतर केले. पुढे त्याचे धार्मिक महत्त्व मागे पडून तो एक प्रेमाच्या आणाभाका घेण्याचा ‘निधर्मी डे’ झाला. दरम्यान, कॅथलिक चर्चने १९६९ मध्ये घोषणा केली की, ‘व्हॅलेंटाईन’बद्दल आम्हाला काहीच माहिती उपलब्ध नसल्याने १४ फेब्रुवारी हा दिवस महत्त्वाच्या फीस्टच्या यादीतून वगळण्यात येत आहे. त्यानंतर अगदी अलीकडच्या ४०-५० वर्षांत अमेरिकन consumerism ने या उत्सवाचे रुपांतर ‘प्रेयसीसाठी खरेदी डे’मध्ये केले. आता ग्रीटिंग कार्ड्स, चॉकलेट, गुलाबाची फुले, खेळण्यातील अस्वलं इत्यादी गोष्टींची घाऊक प्रमाणात १४ फेब्रुवारीला खरेदी केली जाते.
‘व्हॅलेंटाईन डे’निमित्तएक आढावा भारतीय प्रेमकथांचा
भारतीय साहित्यात प्राचीन काळापासून एकाहून एक उत्कृष्ट प्रेमकथा वाचायला मिळतात. वैदिक साहित्यात, पुराणात, नाटकात, कथांत आणि काव्यात अनेक तरल प्रेमकथा आल्या आहेत. ऋग्वेदात सूर्या-सावित्री नावाच्या ऋषिकेने विवाह सूक्त (१०.८५) लिहिले आहे. त्यामध्ये सूर्यकन्या सूर्या व चंद्राच्या विवाहाचे वर्णन केले आहे. वधू-वरांच्या आणाभाका, त्यांना वधूच्या पित्याने दिलेला उपदेश व आशीर्वाद आला आहे. या सूक्तात पाणिग्रहण सोहळ्याच्या वेळी, चंद्र (वर) म्हणतो - “अग्नीच्या साक्षीने मी माझ्या वधूचा हात हातात घेतो. सर्व देवता माझ्या वधूचे मंगल करोत! हे सूर्या, तू नेहमी माझ्यासोबत राहा. आपण दोघे मिळून आपले घरटे बांधू. आपण दोघे मिळून उत्तम संतती निर्माण करू. तू मला आयुष्यभर साथ दे. गृहस्थाश्रमाची कर्तव्ये पार पाडण्यात तुझी साथ मिळणार आहे, हे माझे भाग्य आहे. तू आणि मी मिळून अर्थ (आरोग्य, धेनु, धन, धान्य, घर इत्यादी धनसंपदा) मिळवू. तू व मी मिळून १०० शरद ऋतू पाहू. आपण परस्परांपासून भिन्न नाही. मी आकाश, तर तू पृथ्वी आहेस. मी पुरुष तत्त्व, तर तू प्रकृती आहेस. मी सामवेद, तर तू ऋग्वेद आहेस. मी गीत, तर तू शब्द आहेस. आपण त्यांच्यासारखे प्रेमाने जगू.” आजही या सूक्तातील मोहक आणाभाका विवाहात गायल्या जातात.
अथर्ववेदात आपले जिच्यावर प्रेम आहे, ती मुलगी आपल्या प्रेमात पडावी, याकरता म्हणायचे मंत्र आहेत. तसेच मुलींसाठीसुद्धा आपल्या आवडत्या मुलाच्या मनात आपल्याविषयी प्रेम जागृत व्हावे याकरिता म्हणायचे मंत्र आहेत. अथर्ववेदात एक पती-पत्नी सूक्त आहे (२.३०). यामध्ये पती प्रार्थना करतो की, “माझी पत्नी सदैव माझ्याबरोबर असावी, तिने मजवर प्रीती करावी, तिने माझ्यापासून दूर जाऊन मला कधीही विरहाचे दु:ख देऊ नये.” याच सूक्तात परस्परांवर प्रेम करणार्या पती-पत्नीला ऋषी सांगतात - “तुम्ही दोघे एकत्र राहा, एकत्र चाला, एकत्र कर्म करा, एकत्र पराक्रम करा व दोघे मिळून ऐश्वर्य प्राप्त करा. तुमचे चित्त एकमेकांवर जडू दे. तुम्ही दोघे एकमेकांशी निष्कपटपणे वागा. आत एक आणि बाहेर एक असे वर्तन ठेवू नका. जिथे सुंदर पक्षी मंजुळ गायन करत असतील अशा रम्य ठिकाणी फिरायला जा किंवा एखाद्या सुंदर उद्यानात एकत्र फिरायला जा. एकमेकांशी प्रेमपूर्वक वार्तालाप करा. तुम्ही दोघे आदर्श पती-पत्नी व्हा.” प्रेम म्हणजे काय? ते कसे व्यक्त करावे? पती-पत्नीचे एकमेकांशी कसे वागणे असावे? याविषयी ऋषींनी दिलेला उपदेश आजही लागू होतो. ऋग्वेद (१०.९५), शतपथ ब्राह्मण (११.५.१) आणि काही पुराणात पुरुरवा व उर्वशीची ‘ट्रॅजिक’ प्रेमकथा आली आहे. मर्त्यलोकातील राजा पुरुरवा आणि इंद्राच्या दरबारातील अमर लावण्यवती अप्सरा उर्वशी यांची प्रेमकहाणी. कालिदासानेसुद्धा या प्रेमकथेवर आधारित ‘विक्रमोर्वशीय’ हे नाटक लिहिले. या कथेत एकदा राजा पुरुरवा इंद्राकडे जात असता त्याची आणि उर्वशीची भेट होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. पुरुरवासाठी उर्वशी पृथ्वीतलावर येते खरी, पण पुरुरवासोबत दीर्घकाळ राहू शकत नाही. तिला पुनश्च स्वर्गात जावे लागते आणि इकडे पुरुरवा तिच्या विरहात खंगत जातो. कालिदासाच्या कथेत तिचे एका वेलीत रुपांतर होते. तिच्यासाठी झुरणारा पुरुरवा वेलीच्या रूपातील उर्वशीच्या शोधात वणवण हिंडतो...
महाभारतात तर प्रेमाची अनेक आख्याने येतात. कृष्णाला प्रेमपत्र लिहून “मी तुला मनाने वरले आहे, पण माझा भाऊ दुसर्याच कुणाशी माझे लग्न लावून देत आहे. तू काहीही करून मला येथून घेऊन जा. मी लग्न करीन तर तुझ्याशीच, नाही तर जीव देईन,” असे सांगणारी रुक्मिणी कसली ‘डेअरिंगबाज’ वाटते! तेवढ्या प्रेमपत्रावर रुक्मिणीला लग्नातून युक्तीने पळवून नेणारा कृष्ण यांची कथा अनेक नाटक कादंबर्यांचा विषय झाली. कृष्णाच्या मदतीने द्वारकेत घडणार्या सुभद्रा व अर्जुनाच्या विवाहाचे आख्यान असेच रोचक आहे. घटोत्कचाच्या मायावी शक्तीने भरलेला मायाबाजार, त्यामध्ये वर्हाड्यांची उडणारी धमाल आणि शेवटी एकमेकांवर लहानपणापासून प्रेम करणार्या वत्सला व अभिमन्यूचा विवाह हे तर एक उत्कृष्ट ’ठेालेा’ आहे. अजून एक आख्यान आहे दुष्यंत-शकुंतलेचे. गांधर्व विवाह करून नंतर शकुंतलेला नाकारणारा दुष्यंत आणि त्याला न घाबरता आणि मुळूमुळू न रडता ‘ओपन्ली चॅलेंज’ करणारी शकुंतला. अशा एकापेक्षा एक रोचक प्रेमकथा आल्या आहेत. यामधील मला आवडणारी प्रेमकथा आहे, नल-दमयंतीची! स्वयंवरात नलाचा वेश घेऊन इंद्र, अग्नी, वरुणासारखे देव असतानासुद्धा दमयंती चलाखीने नलाची निवड करते. नलाला सुखात आणि दु:खात साथ देते. वनवासात असताना ती तरी सुखात राहावी म्हणून नल तिला सोडून जातो. पण ती माहेरी परत येऊन युक्तीने नलाचा शोध घेते. पुढे नल पुन्हा राज्य मिळवतो आणि ते सुखाने राहतात. एकमेकांची काळजी वाहणारे, एकमेकांसाठी त्याग करणारे हे जोडपे वेगळेच आहे.
कालिदासाच्या ‘रघुवंशा’मध्ये येणारी अज-इंदुमतीची कथासुद्धा एक उत्कट ‘ट्रॅजेडी’ आहे. त्याची मालविका आणि अग्निमित्राची प्रेमकथा आणि ‘मेघदूत’मधील यक्षाची आणि त्याच्या पत्नीची विरह कथा हे प्रेमाच्या आविष्काराचे विविध नमुने आहेत. नाटकांमधून उदयन राजाच्या तर अनेक प्रेमकथा जसे - ‘स्वप्नवासवदत्ता’, ‘प्रतिज्ञायौगंधरायण’, ‘प्रियदर्शिका’, ’रत्नावली’ या तर एकदम भारी आहेत. या नाटकांमधून व इतर साहित्यातून वसंतात साजरा केल्या जाणार्या ‘मदन’ उत्सवाचे भरभरून वर्णन येते. उसाचा मधुर धनुष्य आणि सुमनांचे बाण धारण करणारा मदन हा प्रेमाचा देव. मदनबाणांनी युवांना एकमेकांच्या प्रेमात पाडणार्या मदनाचा फार मोठा उत्सव पूर्वी साजरा होत असे. पण या सर्वात श्रेष्ठ कुठली प्रेमकथा असेल तर ती आहे सीता आणि रामाची. राम आणि सीतेच्या एकमेकांप्रति असलेल्या एकनिष्ठ प्रेमाला तोड नाही. सीता रामाच्या मागे राजवाड्यातील सुख सोडून वनवासात येते. वनवासात असताना राम सीतेला सुखात ठेवण्यासाठी अतिशय काळजी घेतो. तिचे सर्व हट्ट अगदी सुवर्णमृगाचा हट्टदेखील पुरवतो. विवाहाचा प्रस्ताव घेऊन आलेल्या शूर्पणखेच्या सौंदर्याची रामाला भुरळ पडत नाही. विवाहाचा प्रस्ताव मांडणार्या रावणाच्या ऐश्वर्याला सीता भुलत नाही. रावणाने अशोकवनात कैद केले असता, सीता मृत्यू पत्करायला तयार होते, पण रामाशी एकनिष्ठ राहते. राम सीतेला परत मिळवण्यासाठी दूताकरवी सीतेचा शोध घेतो, सैन्य जमवतो, समुद्रावर सेतू बांधतो आणि महाबलाढ्य रावणाशी युद्ध करतो. प्रेमामध्ये किती प्रचंड ताकद असू शकते, हे दाखवणारे याहून उत्तम व उदात्त उदाहरण शोधूनही सापडणार नाही.
गंमत पाहा, अशा अनेक प्रेमकथांचे सण साजरे केले जातात. जसे ‘विवाहपंचमी’ हा राम-सीतेच्या विवाहाचा सण. ‘वटपौर्णिमा’ हा सत्यवान-सावित्रीच्या अमरप्रेमाचा सण. हरतालिका हा शिव-पार्वतीच्या प्रेमळ वैवाहिक जीवनाचा सण. झालंच तर अजून ‘करवा चौथ’ आहे, दिवाळीतला पाडवा आहे, विवाहाच्या आधी गौरीहराची पूजा आहे, विवाहानंतर मंगळागौरीची पूजा आहे. घरी कुठली मोठी पूजा करायची म्हटलं, तर पती-पत्नीला जोडीने बसून पूजा करायला सांगितले आहे. व्रताचे उद्यापन असेल किंवा कुलाचार असेल, तर नवरा-बायकोला जोडीने जेवायला बोलावले जाते. नवर्याचे किंवा बायकोचे नाव काव्यात गुंफून उखाण्यात घेणे म्हणजे चार लोकात उघडपणे ‘आय लव्ह यू’ म्हणायची व्यवस्था केली आहे. वर्षभरात एकापाठोपाठ एक येणारे हे प्रसंग पती-पत्नीला एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी संधी देत राहतात. हे सण आदर्श प्रेमाचे धडे गिरवायला लावतात. अशी समृद्ध परंपरा लाभलेल्या आपल्या भाग्याचे वर्णन, ज्ञानदेवांच्या या अभंगात आहे -
कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला।
काय वानू त्याला सांगा जी जो॥
राजयाची कांता काय भीक मागे।
मनाचिया जोगे सिद्धी पावे॥
सर्व मनोकामना पूर्ण करू शकेल, अशा कल्पतरूच्या पायी आपण बसलो आहोत. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करेल, अशी उदार संस्कृती आपल्याला लाभली असताना, हे कसले भीकेचे डोहाळे आहेत की - प्रेमिकांचे कौतुक करायचे सोडून, ‘बॅचलर’ असलेल्या, लग्न लावणार्या एका काझीच्या, ज्याच्या कवटीशिवाय आम्हाला काहीच माहिती नाही म्हणून चर्चने हात वर केले आहेत, अशा ‘व्हॅलेंटाईन’च्या नावाने प्रेमाचा उत्सव करतो! एखाद्या राणीला शोभेल असे असलेले आपले सणांचे वैभव मिरवायचे सोडून परकीयांकडून निकृष्ट दर्जाचा सण भीक म्हणून मागून घेऊन आपली तरुणाई साजरा करतेय ... खचित आपण कुठेतरी चुकलो आहोत. आपण या तरल व उदात्त प्रेमकथा आजच्या तरुण पिढीला ऐकवल्याच नाहीत...