चंद्रपूर: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते चंद्रपुरातील रामाळा तलावाला भेट देणार आहेत. भेटीदरम्यान त्यांना भेटणाऱ्या संघटनांमध्ये वाल्मिकी मच्छीमार संघटनेचा समावेश नसल्याने या संघटनेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. संघटनेने आदित्य ठाकरे यांच्याकडे भेटीची मागणी करताना ६५ वर्षांपासून रामाळा तलावाचे संवर्धन करण्याचे काम करत असून सुद्धा जिल्हा प्रशासनाने आम्हांला डावलले असा आरोप संघटनेने केला आहे.
१४ नोव्हेंबर १९५७ रोजी स्थापन झालेल्या या वाल्मिकी मच्छीमार सहकारी संघटनेकडे राज्य सरकारने रामाळा तलावात मासेमारी करण्याचा अधिकार दिला आहे. या अधिकाराच्या बदल्यात या संघटनेने या तलावाच्या संरक्षणाचे काम करायचे आहे. तलावाची सफाई करणे, तलावात कुठल्याही घातक वनस्पती वाढू न देणे, गणपती, देवी विसर्जनानंतर तलावातील गाळ काढणे इ. कामे ही संघटना गेली ६५ वर्षे करत आहे. आता पर्यंत कुठल्याच सरकारी यंत्रणेने या संघटनेला डावलून रामाळा तलावाच्या बाबतीत कुठलेही काम किंवा निर्णय दिलेला नाही असे या संघटनेचे म्हणणे आहे. मग आताच आमच्याकडे दुर्लक्ष का? असा सवाल या संघटनेने केला आहे.
कोरोना काळापासून तलावाच्या खोलीकरणासाठी पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे तलावावरच अवलंबून असलेल्या या संघटनेच्या ३०० सभासदांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे असे या संघटनेचे म्हणणे आहे. "आम्ही या तलावाच्या रक्षणासाठी अथक परिश्रम घेऊन सुद्धा जिल्हा प्रशासन आम्हांला या दौऱ्याबद्दल कळवत सुद्धा नाही असे का? आमच्यावर होणार अन्याय आम्हांला पर्यावरण मंत्र्यांसमोर मांडायचा आहे. पर्यावरण मंत्र्यांनी आमच्या मागण्या ऐकून घ्याव्यात आणि आम्हांला दिलासा द्यावा" अशी मागणी वाल्मिकी मच्छीमार संघटनेने केली आहे.