नवा गडी अन् नवा डाव...

12 Feb 2022 12:29:16
 
raghuvanshi
 
 
भारतीय युवा संघाचा नवा कर्र्तृत्ववान शिलेदार दिल्लीचा १७ वर्षीय अंगकृष्ण रघुवंशी याच्या क्रिकेटमधील उल्लेखनीय कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख...
 
मूर्ती लहान, पण कीर्ती महान’ ही म्हण क्रिकेट क्षेत्रात अनेकदा प्रत्यक्षात आलेली दिसते. कारण, वयापेक्षा कर्तृत्वाने, कौशल्याने आणि कामगिरीने मोठे होणारे अनेक खेळाडू भारतीय क्रिकेट क्षेत्राला लाभले आहेत. सध्या सुरु असलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये भारतीय युवा संघाची कामगिरी पाहता, अनेक खेळाडूंच्या क्षमतेची अनुभूती यावी. कोणतेही मोठे चेहरे नसताना, या संघाने १९ वर्षांखालील ‘आयसीसी’ विश्वचषक स्पर्धेच्याविजेतेपदावर पाचव्यांदा आपले नाव कोरुन इतिहास रचला आहे. कोणी प्रभावी फलंदाजी करत, तर कोणी उत्तम गोलंदाजी करत, बलाढ्य संघांना धूळ चारत या विजेतेपदाला गवसणी घातली. यावेळीही भारतीय युवा संघाने आपली सांघिक कामगिरी सिद्ध केली. असे असताना यामध्ये एका खेळाडूच्या बॅटमधून निघणार्‍या धावांचे मोठे योगदान आहे, तो खेळाडू म्हणजे या संघाचा सलामीवीर अंगकृष्ण रघुवंशी. भारतीय फलंदाजीची एक बाजू सांभाळत त्याने संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा केल्या. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या प्रवासाबद्दल...
 
 
अंगकृष्ण रघुवंशी याचा जन्म दि. ६ मे, २००५ रोजी दिल्लीमध्ये झाला. संपूर्ण कुटुंबच क्रीडा क्षेत्राशी संबंधित असल्याने त्याला अनेक खेळांमध्ये लहानपणापासूनच रस होता. त्याचे वडील अविनाश टेनिसपटू, तर आई मलिका रघुवंशीदेखील बास्केटबॉल खेळाडू होती. तसेच, त्याचा धाकटा भाऊ कृष्णांग हादेखील टेनिसपटू. लहानपणापासूनच अंगकृष्णला क्रिकेटमध्ये रस होता. त्याने मुंबईत येण्यापूर्वी गुडगावमध्ये मन्सूर अली खान यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे प्राथमिक शिक्षणही घेतले. पुढील प्रशिक्षणासाठी वयाच्या दहाव्या वर्षी त्याने मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा निर्णय घेणे कठीण होते. तो आठवडाभर मुंबईला यायचा आणि विल्सन महाविद्यालय जिमखाना येथे माजी क्रिकेटपटू अभिषेक नायर याच्या हाताखाली पुढचे प्रशिक्षण घ्यायचा. त्याचे काका म्हणजे मुंबई क्रिकेट संघाचे माजी सलामीवीर साहिल कुकरेजा यांनी अंगकृष्णची शिफारस अभिषेक नायरकडे केली होती. यावेळी अंगकृष्णच्या वडिलांनी ’त्याचे भविष्य चांगल्या हातात आहे’ असा आत्मविश्वासही व्यक्त केला होता. हे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे पाऊल होते. या काळात सुरुवातीला अंगकृष्ण हा अभिषेक नायरच्या घरीच राहून क्रिकेटचे धडे गिरवत होता. यादरम्यान त्याने अनेक स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
 
 
अंगकृष्ण रघुवंशी हा बोरिवलीच्या ‘स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल’मध्ये शिक्षण घेत होता. याचवेळी २०१९ मध्ये त्याची निवड १६ वर्षांखालील ‘विजय मर्चंट चषक’च्या संघामध्ये करण्यात आली. यावेळी त्याने हे चषक आपल्या नावावर केले. यामध्ये अंगकृष्णच्या फलंदाजीचा खूप मोठा वाटा होता. पुढे २०२१च्या सप्टेंबरमध्ये अहमदाबाद येथे झालेल्या १९ वर्षांखालील ‘विनू मांकड चषक स्पर्धे’च्या चार सामन्यांमध्ये अंगकृष्णने २१४ धावा केल्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश होता. पुढे त्याने १९ वर्षीय ‘चॅलेंजर ट्रॉफी’मध्ये ’भारत-ई’ संघाचे प्रतिनिधित्त्व केले. यामध्ये त्याने पाच सामन्यांत १४१ धावा केल्या. पुढे कोलकातामध्ये झालेल्या तिरंगी मालिकेत ४४च्या सरासरीने १३२ धावा केल्या.
 
 
१७ वर्षीय रघुवंशीची निवड पुढे संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार्‍या ‘अंडर-१९ आशिया चषक स्पर्धे’साठी करण्यात आली. यावेळी त्याने संधीचा फायदा घेत, चार सामन्यात १०७ धावा केल्या. यावेळी त्याने एक अर्धशतकदेखील झळकावले होते. तसेच, भारतीय संघाने हे चषक आपल्या नावावर केले. पुढे त्याची निवड विश्वचषक स्पर्धेसाठी १९ वर्षांखालील भारतीय संघात करण्यात आली. यामध्ये त्याने सर्वोत्तम कामगिरी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारतीय संघाने पाचव्यांदा १९ वर्षांखालील ‘आयसीसीविश्वचषक’ विजेतेपद आपल्या नावावर केले. यामध्ये रघुवंशीने सहा सामन्यात ४६च्या सरासरीने २७८ धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच, युगांडाविरुद्धच्या सामन्यात त्याने एकाच डावात १४४ धावांची दमदार खेळी केली. त्याची हीच खेळी त्याला प्रकाशझोतात घेऊन आली. आता अंगकृष्ण ‘आयपीएल’च्या हंगामात कोणत्या संघातर्फे खेळताना दिसेल, याची उत्सुकता सर्व क्रिकेटप्रेमींना लागली आहे. तसेच, आगामी काळात येणार्‍या १९ वर्षांखालील स्पर्धा आणि मालिकांमध्ये अंगकृष्ण रघुवंशी काय कमाल करतो, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...
Powered By Sangraha 9.0