मुंब्रा खाडीतील कांदळवनांवरील अतिक्रमणावर हातोडा; 'मॅंग्रोव्ह सेल'ची धडक कारवाई

11 Feb 2022 19:59:00
MUMBRA MANGROVE

 
मुंबई ( विशेष प्रतिनिधी) - मुंब्रा येथील देसाई खाडीत भूमाफियांनी कांदळवनांची तोड करुन त्यावर रस्ता तयार केला होता. जून, २०२१ मध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ स्वरुपातील ग्राऊंड रिपोर्ट 'दै. मुंबई तरुण भारत'ने (महा MTB) प्रसिद्ध केला होता. त्यानंतर महसूल विभागाकडून ही कांदळवन आच्छादित जमीन वन विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. सरतेशेवटी जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर शुक्रवारी (११ फेब्रुवारी) कांदळवन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी येथील अतिक्रमण जमीनदोस्त केले.



लाॅकडाऊनचा फायदा घेऊन मुंब्य्रातील भूमाफियांनी देसाई खाडीतील कांदळवनांवर भराव टाकण्यास सुरुवात केली. मुंब्रा ते दिवा यांना जोडणारा दोन किलोमीटरचा रस्ता याठिकाणी राजरोसपणे बांधला गेला. कांदळवन कापून त्यावर शेकडो ट्रक राडारोडा टाकण्यात आला. त्यावर रस्ता बांधून गाळे तयार करण्यात आले. मुंब्रा येथून थेट दिव्याला जोडणारा रस्ता तयार झाला. त्यामुळे वाळू माफिया आणि रेती उपसा तयार करण्याऱ्यांची सोय झाली. या बाबतची माहिती ठाण्याचे पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहित जोशी यांना मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार प्रशासनाकडे केली.




रोहित जोशी यांच्यासोबत 'मुंबई तरुण भारत'ची व्हिडीओ टीम घटनास्थळी वार्तांकनाकरिता गेली होती. त्यावेळी देखील राडारोड्याचा भराव हा कांदळवनांवर टाकला जात होता. या प्रकरणाची माहिती प्रकाशझोतात आल्यानंतर प्रशासनाला जाग आली. अतिक्रमण झालेली ही जमीन महसूल विभागाच्या ताब्यात होती. या प्रकरणानंतर २७ हेक्टर क्षेत्रफळ असलेली ही जमीन वन विभागाच्या कांदळवन कक्षाच्या ताब्यात देण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात आला. जमीन ताब्यात येण्याची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी 'कांदळवन कक्षा'चे विभागीय वन अधिकारी आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी (भिवंडी) चेतना शिंदे यांनी वनकर्मचारी आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने तयार केलेला रस्ता, मंडप, रेती उपशाच्या साहित्यावर हातोडा मारला.

Powered By Sangraha 9.0