आरोग्य विमा पॉलिसी परिपूर्ण करणारे ‘अ‍ॅड-ऑन्स’!

11 Feb 2022 14:31:50

insurance policies
आरोग्य विमा पॉलिसी असली की आपण निर्धास्त होतो. पण, बरेचदा विमा पॉलिसी घेतल्यानंतरही ‘अ‍ॅड-ऑन्स’च्या सूचना, सल्ले कंपनीतर्फे किंवा एजंटतर्फेही दिले जातात. पण, बरेचदा पॉलिसीव्यतिरिक्त चार पैसे अधिक मोजावे लागतील म्हणून या ‘अ‍ॅड-ऑन्स’कडे दुर्लक्ष तरी केले जाते किंवा अधिकचे पैसे आकारुन विमा कंपनी ग्राहकांचा खिसा कापतेय, असा एक समज असतो. म्हणूनच आजच्या भागात जाणून घेऊया या ‘अ‍ॅड-ऑन्स’विषयी...
भारतातील शहरी, निमशहरी भागात, ग्रामीण भागांच्या तुलनेत आरोग्य विमा उतरविणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ‘बेसिक विमा पॉलिसी’ परिपूर्ण नसते. ती परिपूर्ण व्हावी म्हणून अतिरिक्त प्रीमियम भरून काही ‘अ‍ॅड-ऑन क्लॉज’ पॉलिसीत समाविष्ट करुन घ्यावेत. ते समाविष्ट केल्यास दावा संमत होण्यास अडचणी येत नाहीत.
‘बेसिक आरोग्य विमा पॉलिसी’ तुमच्या सर्व गरजा भागवू शकत नाही. ‘बेसिक आरोग्य विमा पॉलिसी’त जर गरजेचे ‘अ‍ॅड-ऑन’ समाविष्ट केले, तर ‘प्रीमियम’ कमी भरावा लागतो. काही ‘अ‍ॅड-ऑन’साठी वेगळी ‘पॉलिसी’ घेतल्यास त्याचा वेगळा ‘प्रीमियम’ भरावा लागतो. परिणामी, पैसा जास्त खर्च होऊ शकतो. ‘अ‍ॅड-ऑन क्लॉज’मुळे पॉलिसीधारकाला जास्त फायदे मिळतात. गंभीर स्वरुपाच्या आजारांमध्ये संरक्षण, रुग्णालयांमध्ये असताना खर्चासाठी रोखरक्कम मिळणारे व अन्य ‘अ‍ॅड-ऑन’ पॉलिसीधारक अतिरिक्त ‘प्रीमियम’ भरुन आपल्या ‘आरोग्य विमा पॉलिसी’त समाविष्ट करुन घेतात. काही ‘अ‍ॅड-ऑन’ हे विशिष्ट प्रकारच्या पॉलिसींमध्येच समाविष्ट करून घेतले जातात. सर्व प्रकारांच्या पॉलिसींमध्ये समाविष्ट केले जात नाही.
गंभीर स्वरुपाचे आजार
‘कॉम्प्रेहेन्सिव्ह आरोग्य विमा पॉलिसी’त गंभीर स्वरुपाच्या आजांराच्या खर्चाचे दावे संमत होऊ शकतात. ‘बेसिक आरोग्य विमा पॉलिसी’त अशा आजारांवर एक ठरावीक रकमेपर्यंत निश्चित केलेल्या कमाल रकमेपर्यंत दावे संमत केले जातात. हा ‘अ‍ॅड-ऑन क्लॉज’ केल्यास कर्करोग किंवा अन्य कोणत्याही गंभीर स्वरुपात आजारांचा प्रादुर्भाव झाल्यास, तर एक ठरावीक रक्कम पॉलिसीधारकाला मिळू शकते, हा ‘क्लॉज’ समाविष्ट करुन घेण्यासाठी वर्षाला रु. १८०० ते रु. १८५० वेगळा अतिरिक्त ‘प्रीमियम’ भरावा लागतो. काही पॉलिसीत गंभीर स्वरुपाचा आजार झाल्यावर लगेच पॉलिसीधारकाला रक्कम मिळू शकते, तरी काही पॉलिसींत पॉलिसीच्या नूतनीकरणाऱ्या वेळी रक्कम दिली जाते. गंभीर स्वरुपाच्या आजारात पैसा भरपूर खर्च होतो. मानसिक स्वास्थ्य रुग्णाचे व नातलगांचे कमी होते. रुग्ण कार्यरत होऊ शकत नसल्यामुळे उत्पन्नही बंद होते. त्यामुळे विमा कंपनीकडून मिळणारी रक्कम उपचारासाठी वापरता येऊ शकते किंवा वैयक्तिक गरजांसाठी वापरता येऊ शकते.
रुग्णालयात रोज रोख रक्कम
रुग्णालयात असलेला रुग्ण कामावर जाऊ शकत नाही, अशावेळी असंघटित कामगार असल्यास किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे आर्थिक नुकसान होेते. हा ‘क्लॉज’ समाविष्ट केल्यास रुग्णाला एक ठरावीक रकमेचा भत्ता दररोज विमा कंपनीकडून दिला जातो. विमा कंपनी एक ठरावीक रक्कम ठरविते व ती रुग्णाला रुग्णालयामध्ये रोज दिली जाते. हा ‘क्लॉज’ समाविष्ट करण्यासाठी वर्षाला ५५० ते ६०० रुपये अतिरिक्त ‘प्रीमियम’ भरावा लागतो. ‘आयसीयु’मधील रुग्णांना दुप्पट भत्ता दिला जातो. रुग्णालयात असताना काही अतिरिक्त खर्च करावा लागल्यास ही मिळणारी रक्कम उपयोगी पडू शकते.
कन्झ्युमेबल संरक्षण
हा नवीन ‘क्लॉज’ आहे. आधुनिक उपचार पद्धती हवी असल्यास त्याचा खर्चाच्या संरक्षणासाठी हा ‘क्लॉज’ आहे. या ‘क्लॉज’मुळे ’कन्झ्युमेबल’वस्तूंसाठीचे संरक्षण मिळते. यासाठीचे संरक्षण ‘कॉम्प्रेहेन्सिव्ह’ आरोग्य विम्यात समाविष्ट नसते. ‘ग्लोव्होज्’, ‘पीपीई किट’, शस्त्रकियेसाठीच्या वस्तू या एकदा वापरून फेकून दिल्या जातात. यांचा सर्व खर्च ‘बेसिक आरोग्य विम्या’त संमत होत नाही. ‘कन्झ्युमेबल’ संरक्षण घेतले, तरच अशा बाबींचा खर्च मिळू शकतो. ‘कोविड-१९’साठी प्रामुख्याने हा ‘क्लॉज’ समाविष्ट करण्यात आला आहे. ‘कोविड-१९’मध्ये एक वेळ वापरून फेकायच्या वस्तू जास्त लागतात. याचा भार म्हणून पॉलिसीधारकावर पडत असे म्हणून हा नवीन ‘क्लॉज’ समाविष्ट करण्यात आला आहे. हा क्लॉज समाविष्ट करण्यासाठी वर्षाला ४५० ते ५०० रुपये अतिरिक्त ‘प्रीमियम’ भरावा लागतो. हा ‘क्लॉज’ अस्तित्त्वात आल्याचा बराच फायदा ‘कोविड-१९’च्या रुग्णांना झाला.
रुग्णालयाच्या खोलीचे भाडे
नेहमीच्या पॉलिसीत उतरविलेल्या विमा रकमेच्या एक टक्का रुग्णालयाच्या खोलीचे भाडे म्हणून संमत होते. जर एखाद्याची एक लाख रुपयांची पॉलिसी असेल, तर त्याला रोजच्या रुग्णालयातील खोलीचे भाडे फक्त रुपये एक हजार मिळणार. मुंबईसारख्या महानगरांत व अन्य शहरांत छोट्यातल्या छोट्या रुग्णालयात खोलीचे भाडे एक हजार रुपयांहून जास्त असते. त्यामुळे हा ‘क्लॉज’ समाविष्ट करायला प्राधान्य दिले जाते. हा ‘क्लॉज’ समाविष्ट केला नाही, तर नियमापेक्षा अधिक भाड्याची रक्कम पॉलिसीधारकाला त्याच्या खिशातून भरावी लागते. यामुळे रुग्ण ‘स्पेशल रुम’, ‘डिलक्स रुम’मध्येही भरती होऊ शकतो. यासाठी सुमारे रुपये एक हजार अतिरिक्त ‘प्रीमियम’ भरावा लागतो.
प्रसुतीसाठीचा ‘क्लॉज’
या ‘क्लॉज’मुळे रुग्णालयाचा खर्च प्रसुतीचा खर्च, प्रसुतीपूर्व व प्रसुतीनंतरचा खर्च मिळू शकतो. यात प्रसुतीपूर्व ३० दिवसांचा व प्रसुतीनंतरचा खर्च मिळू शकतो. यात प्रसुतीपूर्व ३० दिवसांचा व प्रसुतीनंतर ६० दिवसांचा खर्च मिळू शकतो. ‘बेसिक आरोग्य विमा पॉलिसी’त प्रसुतीच्या खर्चाचा दावा मंजूर होत नाही, यासाठी ‘मॅटर्निटी रायडर क्लॉज’ समाविष्ट करून घ्यावाच लागतो. या ‘क्लॉज’मुळे ‘नॉर्मल’ व ‘सिझेरियन’ दोन्ही स्वरुपाच्या प्रसुतींसाठीचा खर्च मिळू शकतो. नवजात बालकाला काही उपचार करावे लागल्यास त्याचाही खर्च मिळतो. प्रसुतीसाठी आलेला पूर्ण खर्च दावा म्हणून संमत होत नाही. किती रक्कम दाव्यासाठी मंजूर करायची याचे नियम आहेत.
‘एनसीबी’ संरक्षण रायडर
या ‘क्लॉज’मुळे ‘नॉन-क्लेम बोनस’ (दावा न केल्यामुळे बोनस) चा फायदा मिळतो. जर पॉलिसी वर्षात दावा केलेला नसेल, तरच ‘बेसिक आरोग्य विमा पॉलिसी’त ‘एनसीबी’ मिळतो, पण जर हा ‘क्लॉज’ घेतला असेल, तर दावा केलेला असला, तरीही ‘एनसीबी’ मिळतो. एखाद्याला त्याच्या शारीरिक आजारांमुळे रुग्णालयात भरती व्हावे लागण्याची शक्यता असेल, तर अशांनी हा ‘क्लॉज’ समाविष्ट करुन घ्यावा. ‘नो क्लेम बोनस’ तीन प्रकारे दिला जातो. पहिला प्रकार म्हणजे, अतिरिक्त संरक्षण, ‘प्रीमियम’च्या रकमेत ‘डिस्काऊंट’ किंवा उतरविलेल्या विम्याच्या रकमेत वाढ. हा ‘एनसीबी’ पॉलिसी नूतनीकरणाच्या वेळी दिला जातो. हा ‘क्लॉज’ समाविष्ट करुन घेण्यासाठी ६५० ते ७०० रुपये वर्षाला अतिरिक्त ‘प्रीमियम’ भरावा लागतो.
 
 
Powered By Sangraha 9.0