किशन याने आपल्या कथित आक्षेपार्ह पोस्टबद्दल दिलगिरी व्यक्त केली असताना, कायदा हातात घेऊन त्याला जीवे मारण्याचा अधिकार या धर्मांध मुस्लिमांना कोणी दिला? अशा प्रकारे कायदा हाती घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, हे काय त्या मौलवींना माहीत नाही? खरे म्हणजे मुस्लीम समाजातील जाणत्या नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करायला हवा. तसेच मानवतेची हत्या होत असल्यावरून सतत गळे काढणार्यांनी या घटनेचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध करायला हवा.
समाजमाध्यमांवर मुस्लीम धर्माच्या प्रेषितावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यावरून, कायदा हातात घेऊन गुजरातमधील अहमदाबादच्या ग्रामीण भागातील धंधुका येथे दि. २५ जानेवारी रोजी किशन भारवाड (बोलिया) नावाच्या २७ वर्षे वयाच्या हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली. या हत्येमागे एका मशिदीचा आणि मौलवीचा हात असल्याचा आरोप प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत हिने फेसबुक पोस्टद्वारे केला आहे. “कायदा हाती घेतल्याबद्दल नेहमी गळे काढणारे कथित ‘मानवतावादी’ आता कोठे आहेत? ते का मूग गिळून गप्प बसले आहेत,” असा प्रश्न या अभिनेत्रीने विचारला आहे. सदर तरुणाची हत्या योजनाबद्धरीत्या करण्यात आली असून या हत्येला जबाबदार असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणीही कंगना राणावत हिने केली आहे. किशन भारवाड (बोलिया) याने फेसबुकवर जी पोस्ट टाकली ही परमेश्वराला आवडली नसल्याचे समजून एका मौलवीने मशिदीच्या पाठबळावर या तरुणाची हत्या केली. परमेश्वराच्या नावावर होत असलेल्या अशा हत्या थांबायलाच हव्यात. आपण कोणत्या काळात वावरत आहोत? अशा हत्यांच्या विरुद्ध सरकारने कठोर कारवाई करायला हवी, अशी मागणी या अभिनेत्रीने केली आहे. हत्या करण्यात आलेला किशन २७ वर्षांचा होता. त्याला दोन महिन्यांची मुलगीही आहे. किशनला फेसबुकवरील ‘ती’ पोस्ट डिलीट करण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे त्याने ती पोस्ट डिलीटही केली. तरीही चौघा मारेकर्यांनी किशनची अमानुष हत्या केली. एकप्रकारे इतरांच्या स्वातंत्र्यासाठी किशनने हौतात्म्य पत्करले, असे नागरिक देशाला अफगाणिस्तान होण्यापासून वाचवीत आहेत. किशनच्या विधवा पत्नीला सरकारने आर्थिक मदत द्यायला हवी, अशी मागणीही कंगना राणावत हिने केली आहे.
किशनच्या हत्येसंदर्भात तथाकथित ‘मानवतावादी’ मौन बाळगून असल्याबद्दल कंगनाने त्यांच्यावर टीका केली आहे. मानवतेचा पुळका असल्याचे दाखविणार्या कोणीही किशनच्या हत्येचा निषेध केला नाही, याकडे कंगनाने लक्ष वेधले आहे. “देवाच्या नावावर किती अमानुष कृत्य! आपल्याला ती पोस्ट आवडली नसल्याचे देवाने त्या लोकांना सांगितले होते की काय! एखाद्या फेसबुक पोस्टमुळे ईश्वर नाराज होत असेल, तर अशा देवाची आराधना कशाला करायची? असा देव व्यक्त केलेली दिलगिरी वा खेदही स्वीकारीत नाही, याला काय म्हणायचे! शेम!!” अशा शब्दात या घटनेबद्दल कंगनाने आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. किशन याच्या हत्येच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेने गेल्या २७ जानेवारी रोजी ‘अहमदाबाद बंद’चे आयोजन केले होते. किशन याच्या हत्येसंदर्भात गुजरात पोलिसांनी शब्बीर, इम्तियाझ पठाण आणि मौलाना महंमद अयुब यांना अटक केली आहे. मौलाना महंमद अयुब याने या हत्येचा कट रचल्याची आणि किशनची हत्या करण्यासाठी शस्त्र उपलब्ध करून दिल्याची माहिती पोलीस चौकशीत उघड झाली आहे. किशन याच्या हत्येच्या कटात आणखी एक मौलवी सहभागी असल्याचे आणि तो मुंबईचा असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस त्या मौलवीच्या मागावर आहेत. किशनने दि. ६ जानेवारी रोजी ती कथित आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्याबाबत तक्रार करण्यात आल्यानंतर किशनविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली होती. किशन जामिनावर सुटल्यानंतर धर्मांध मौलवी आणि अन्य तरुणांनी किशनची हत्या करण्याचा कट रचला आणि त्यानुसार किशनची अमानुष हत्या केली.
किशन याने आपल्या कथित आक्षेपार्ह पोस्टबद्दल दिलगिरी व्यक्त केली असताना, कायदा हातात घेऊन त्याला जीवे मारण्याचा अधिकार या धर्मांध मुस्लिमांना कोणी दिला? अशा प्रकारे कायदा हाती घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, हे काय त्या मौलवींना माहीत नाही? खरे म्हणजे मुस्लीम समाजातील जाणत्या नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करायला हवा. तसेच मानवतेची हत्या होत असल्यावरून सतत गळे काढणार्यांनी या घटनेचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध करायला हवा. पण, या मानवतावाद्यांची मानवता ही काही निवडक प्रश्नांसंदर्भात उफाळून येत असल्याचा अनुभव या देशातील हिंदू जनतेला अनेकदा आला आहे. अशा मानवतावाद्यांचे मौन खूप काही सांगून जाणारे आहे. अशा मानवतावाद्यांचे ढोंगी बुरखे फाडून त्यांचे खरे रुप जनतेला दाखवायलाच हवे!
राम मंदिराचे चित्र पाहून भडकले राकेश टिकैत!
काही नेत्यांना राजकारणाशिवाय काही दिसतच नाही. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांचाही अशा व्यक्तींमध्ये अंतर्भाव करणार्या हरकत नाही. कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करून ते कायदे केंद्र सरकारला मागे घेण्यास भाग पाडल्यामुळे तर ‘जीतम मया’च्या भूमिकेत ते वावरत असल्याचे दिसून येत आहे. दि. २९ जानेवारी रोजी राकेश टिकैत हे एका चित्रवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी ते गेले असता, त्यांना तेथे लावलेल्या पडद्यावर राम मंदिराचे चित्र दिसले. आपण ज्या कार्यक्रमात सहभागी होत आहोत, तेथे राम मंदिराच्या चित्राचे प्रदर्शन कशाला, यावरून हे महाशय भडकले. ‘इंडिया टीव्ही’ने हा कार्यक्रम योजला होता. राम मंदिराचे चित्र पाहून संतापलेल्या टिकैत यांनी ‘इंडिया टीव्ही’चे ज्येष्ठ कार्यकारी संपादक आणि त्या कार्यक्रमाचे मॉडरेटर सौरव शर्मा यांनाच धारेवर धरले. तुम्ही राजकीय पक्षाचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी शर्मा यांच्यावर केला. मंदिराचे चित्र तुम्ही का दाखविता? तो काही चर्चेचा मुद्दा नाही. सदर चित्र दाखविण्याचा आदेश आपणास कोणी दिला? तुम्ही माध्यमातील लोकांनी कोणासाठी प्रचार करता कामा नये. तुम्ही माध्यमे देशाचा विध्वंस करायला निघाले आहात...! अशी बरीच बडबड राकेश टिकैत यांनी त्या ठिकाणी केली. सौरव शर्मा यांनी तेवढ्याच कडक भाषेत टिकैत यांना उत्तर दिले. “निवडणुकीचे विषय आणि कार्यक्रम हे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते ठरवितात. टीव्ही अँकर ते ठरवित नाहीत,” असे त्यांनी सुनावले. “शेतकर्यांचे नेते म्हणून आम्ही तुम्हाला येथे निमंत्रित केले. पण, तुम्ही मंदिर आणि मशीद यावर बोलायला लागलात,” असे शर्मा त्यांना म्हणाले.
राकेश टिकैत हे माध्यमातील प्रतिनिधींशी बेमुवर्तखोरपणे वागल्याचे हे काही पहिलेच उदाहरण नाही. या आधीही त्यांनी अनेक पत्रकारांना अवमानित केले आहे. त्यांच्यावर किंवा त्यांनी हाती घेतलेल्या शेतकरी आंदोलनावर कोणा पत्रकाराने विरोधी सूर लावला की, त्या पत्रकारास किंवा त्या माध्यम समूहास टिकैत यांनी केलेल्या टीकेस सामोरे जावे लागत असे. गेल्या मार्च महिन्यात एका महाविद्यालयीन तरुणीने, प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता, त्या विद्यार्थिनीच्या अंगावर टिकैत आणि त्यांचे समर्थक धावून गेले होते. राजकारणात पाय रोवू पाहाणारे राकेश टिकैत सार्वजनिक जीवनात किती उथळ व्यवहार करतात, ते अशा उदाहरणांवरून दिसून येते.
पश्चिम बंगाल म्हणजे ‘गॅस चेंबर!’ राज्यपाल धनखड यांची कडवट टीका
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पश्चिम बंगालमध्ये कायद्याचे राज्य नसल्याचे सर्वसामान्य नागरिक म्हणत नसून प्रत्यक्ष त्या राज्याचे राज्यपाल जगदीश धनखड म्हणत आहेत. ममता सरकारच्या कारकिर्दीत सातत्याने हिंसाचार होत असून, हे राज्य म्हणजे ‘गॅस चेंबर’ झाले असल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे. राज्याच्या घटनात्मक प्रमुख्याने आपल्याच अखत्यारीतील राज्याबद्दल असे मत व्यक्त करावे याचा अर्थ राज्यात कायद्याचे राज्य नसल्याचेच दिसून येत आहे. महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्याच्या अवस्थेबद्दल राज्यपाल धनखड यांनी वरील भाष्य केले. “राज्यपाल या नात्याने मी हे सहन करणार नाही,” असा इशाराही त्यांनी ममता सरकारला दिला. “हे राज्य मी रक्तलांच्छित होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी वेळ काढावा आणि आपल्यासमवेत चर्चा करावी,” लोकशाहीमध्ये संघर्षाला वाव नसल्याकडेही राज्यपालांनी शासनकर्त्यांचे लक्ष वेधले. ममता बॅनर्जी ज्या प्रकारे राज्यपालांवर भाष्य करतात, त्याबद्दलही धनखड यांनी नाराजी व्यक्त केली. आपण गेल्या दोन वर्षांमध्ये जी माहिती सरकारकडे मागितली होती, ती आपणास मिळाली नसल्याचेही राज्यपालांनी स्पष्ट केले. घटनेने नियुक्त केलेल्या राज्यपालांना ममता बॅनर्जी कशी वागणूक देतात हे यावरून लक्षात येते. पण, सत्तेची गुर्मी फार काळ टिकून राहात नाही, हे ममता बॅनर्जी यांना कोणी तरी सांगायला हवे!
९८६९०२०७३२