भाषा वाङ्मय विभागाच्या ‘त्या’ वादग्रस्त पुरस्काराचा पुनर्विचार करणार

09 Dec 2022 15:22:06
deepak kesarkar



मुंबई
: महाराष्ट्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारा’वर साहित्य क्षेत्रातून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. नक्षलवादी विचारसरणीचे उदात्तीकरण करणार्‍या लेखक कोबाड गांधींच्या पुस्तकाला राज्य सरकारचा पुरस्कार जाहीर करण्यात आल्यानंतर राज्यातील साहित्य क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यावर सरकारने भूमिका जाहीर केली आहे. नक्षलवादी विचारसरणीचे उदात्तीकरण करणार्‍या कोबाड गांधी लिखित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम ः तुरुंगातील आठवणी व चिंतन’ या पुस्तकाला पुरस्कार देण्यात आल्याने साहित्य क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे.

 त्यावर राज्य सरकारने आपली भूमिका जाहीर केली असून भाषा वाङ्मय विभागाच्या ‘वादग्रस्त पुरस्कार’चा पुनर्विचार करणार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिली आहे. तसेच संबंधितांच्या चौकशीचे आदेश देण्यात आली असून योग्य ती कारवाई करण्याचे संकेत देखील केसरकर यांनी दिले आहेत.राज्य सरकारच्या भाषा आणि वाङ्मय पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. त्यात पात्र ठरविण्यात आलेल्या 35 पैकी 33 साहित्यिकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात प्रौढ वाङ्मय प्रकारातील अनुवादित प्रकारासाठी ‘तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पुरस्कार’ वादग्रस्त आणि नक्षली विचारांचा प्रचार करणार्‍या कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम ः तुरुंगातील आठवणी व चिंतन’ या पुस्तकाचा अनुवाद करणार्‍या लेखिका अनघा लेले यांना जाहीर करण्यात आला होता.

यावर साहित्य परिषदेसह दिग्गज साहित्यिकांनी आक्षेप घेतला असून नक्षलवादी विचारसरणीचा पुरस्कार करणार्‍या साहित्याला प्रोत्साहन का देण्यात येत आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. साहित्यिकांकडून नोंदवण्यात आलेल्या नाराजीची राज्य सरकारनेदेखील तत्काळ दखल घेत जाहीर करण्यात आलेले संबंधित पुरस्कार आणि पुरस्कार जाहीर करण्यासाठी राबवण्यात आलेल्या प्रक्रियेचा पुनर्विचार करण्यात येणार असल्याची घोषणाच मंत्री दीपक केसरकर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना केली आहे.



Powered By Sangraha 9.0