वध हा थरारक चित्रपट येत्या ९ डिसेम्बरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मुख्य भूमिकेत असलेले अभिनेते संजय मिश्रा यांची मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर भाष्य केलं. तसेच स्त्री पुरुष संबंध आणि पालक पाल्य नात्यातला भावनिक गोडवा किती महत्वाचा आहे हे सांगितलं. एका माणसाला एका वेळी अनेक आघाड्यांवर कशा अनेक भूमिका बजवाव्या लागतात हे या चित्रपटातून दाखवण्याचा त्यांचा मानस आहे.
या चित्रपटासाठी तुम्ही किती उत्सुक आहात?
- उत्सुक आहेच, पण त्यापूर्वी मला हे सांगायला आवडेल की, आमच्या सारख्या लहान निर्मात्यांचे चित्रपट लोकांनी पाहायला हवेत. कमी बजेट असणारे चित्रपट काही अनोखी/वेगळी कथा घेऊन येतात. समाजातील दुर्लक्षित घटकावर ते प्रकाश टाकतात. आणि म्हणूनच ते जनमानसात पोहोचायला हवेत याची काळजी आपण सर्वानी घेतली पाहिजे. लहान चित्रपटात काम करताना आणि या चित्रपटांची निर्मिती करताना बऱ्याच मर्यादा असतात. हे चित्रपट कानाकोपऱ्यातून नव्या नव्या गोष्टी जगासमोर आणतात. त्यामुळे प्रशासनाकडूनही त्यांच्या काही अपेक्षा असतात. २०० कोटींच्या चित्रपटावर जेवढा कर लावता तेवढा कर ३ कोटींच्या चित्रपटावर लावून कसं भागेल? हे लहान चित्रपट सुद्धा अनेक रोजगारांची निर्मिती करतात.
तुमच्या वास्तवातील प्रतिमेला साजेशी भूमिका या चित्रपटात नाही, ही भूमिका गंभीर आहे. या भूमिकेविषयी तुमचं काय म्हणणं आहे?
- ही एक चांगली गोष्ट आहे, मी हसवू शकतो, रडवू शकतो, घाबरवू शकतो, विचार करायला लावू शकतो. नाही का? ही गोष्ट माझ्यासाठी जेवढी आव्हानात्मक होती तेवढीच प्रेक्षकांसाठीही असेल. माझ्याकडे जेव्हा एखाद्या चित्रपटासाठी प्रस्ताव येतो, तेव्हा मी संहिता कधीच वाचत नाही. दिग्दर्शकाला वाचतो. दिग्दर्शक मला जेव्हा कथा ऐकवतो त्यावेळी त्यात जर मला तथ्य वाटलं, उत्सुकता वाटली तर मी भूमिका कोणती हा विचार न करता तात्काळ होकार देतो. जर मला दिग्दर्शकाच्या कथाकथनात माझ्या भूमिकेची कल्पना करता येत असेल तरच ती भूमिका मी साकारू शकतो.
ही नकारात्मक भूमिका आहे. या भूमिकेचा प्रस्ताव तुमच्यासमोर ठेवल्यावर तुमची प्रतिक्रिया काय होती?
- वध चित्रपटात मी फक्त हत्या करत नाही नाही. तर त्यात एक वडील म्हणून भूमिका भूषवितो. या चित्रपटात आम्ही एका तरुणाचे आई वडील आहोत. हे एका सर्वसाधारण कुटुंबातील माणसांचे आणि त्यांच्या नात्यांचे भावविश्व् आहे.
आफताब श्रद्धा दुर्घटना आपण पाहतो, ही तर वास्तवात झालेली हत्या. तुमच्या चित्रपटात सुद्धा हत्या करणाऱ्या माणसाची भूमिका आहे. तर या घटनेचे आणि तुमच्या चित्रपटाचे समर्थन तुम्ही कसे कराल?
- मी लहान असताना पटणा मध्ये एका नागमणी नामक पुरुषाने त्याच्या पत्नीची हत्या करून मृतदेह आठ दिवस फ्रिजमध्ये ठेवला होता. घटना तेव्हाही घडत होत्या. घटना चित्रपट पाहून घडत नाहीत तर चित्रपट घडत असलेल्या घटनांना पडद्यावर दाखवतात. चित्रपट म्हणजे समाजात घडत असलेल्या गोष्टींचा आरसा. वध च्या निमित्ताने माझ्या मनातील आफ्ताबचा मृत्यू झाला असा मला वाटतं.
या चित्रपटाचं नाव वध का?
- हत्या हा नकारात्मक शब्द आहे. आणि नकारात्मक शक्तींचा नाश करून केला जातो तो वध. वध म्हणजे शेवट. पुढे जाऊन अजून हत्या होऊ नयेत म्हणून केलेला हा वध. तुम्ही जर चित्रपट पाहिलात तर तुम्हाला वाटेल की हा देवच आहे. मी माझ्या इच्छेसाठी कुणाचे आयुष्य दबावाखाली ठेवणार नाही तर इतरांच्या खुशीसाठी नकारात्मक शक्तींचा नाश करेन असे मला यातून दाखवायचे होते. शेवटी प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन. म्हणजॆ बघा, मला डोळ्यांचा त्रास होत असेल आणि म्हणून जर मी रात्री काळा चष्मा लावून फिरलो तर लोकांना वाटतं रात्रीही हा मोठा हिरो म्हणून मिरवून घ्यायला चालला. त्यामुळे कोणत्या कथेचा किंवा शब्दाचा अर्थ तुम्ही काय घेता यावर तुमची प्रतिक्रिया अवलंबून असते.
चांगला अभिनेता बनण्यासाठी बऱ्याच आवडी निवडीवर पाणी सोडावा लागत. तुम्हाला आज तुम्ही जिथे आहेत त्या स्थानावर येण्यासाठी कशाचा त्याग करावा लागला आहे का?
- हो तर ! कालच झालं असं, तुला सांगतो, काल माझ्या मुलांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. त्यांना इच्छा होती फार की मी जावं. परंतु २ चित्रपटांच्या कामात व्यस्त असल्याने मी जाऊ शकलो नाही. अशा काही कौटुंबिक जबाबदाऱ्या आपल्याला सांभाळता येत नाहीत. कधी गेलोच छोटीसोबत बाहेर तर सगळे माझ्यासोबत फोटो काढायला म्हणून येतात. अशावेळी त्यांना नाराज करवत नाही. मग छोटी वैतागते. हात सोडून दूर जाते. रुसते. सगळंच पाहावं लागतं. परंतु वधसाठी ज्या कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या त्यातून ही सल बरीच कमी झाली. आमिर खान म्हणाला होता की ट्रेलर पाहूनच मजा आली.
आजकालच्या चित्रपटातून कोणता अजेंडा दाखवला जातो का? बहुतांश चित्रपट प्रोपोगांडा आहेत असे वाटतं का? असेल तर ते चूक की बरोबर?
- नक्कीच! प्रत्र्येक चित्रपट हा एक प्रोपोगांडाच असतो. तसा नसेल तर तो चित्रपट कसा होईल. चित्रपट म्हणजे मघा म्हंटल्याप्रमाणे समाजात काय घडत आहे समोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न. त्यामुळे विविध कानाकोपऱ्यातल्या गोष्टी चित्रपटांतून समोर यायलाच हव्यात.
आज शॉर्ट फिल्म, टीव्ही सिरीज च्या जमान्यात प्रदीर्घ चित्रपटांचं काय भवितव्य आहे?
- बरोबर. पूर्वी लोक चालत्या फिरत्या धर्मेंद्रला पाहण्यासाठी सर्वजण चित्रपट गृहात जायचे. आज ही परिस्थिती नाही. त्यामुळे ओटीटी माध्यमे आणि सोशल मीडियाला लोकांची मनोरंजनासाठी पहिली पसंती असणं स्वाभाविक आहे. हळूहळू घरा घरात टीव्ही आला. चित्रपट गृहात चालणारा धर्मेंद्र मग घरा-घरातून बैठकीच्या खोलीत चालू लागला. मग या कलाकारांची सवयच झाली. आधी चित्रपटाला बाहेर जाऊ म्हणताना किती उत्साह असायचा, मग असं झालं की रविवारी टीव्हीवर आहेच चित्रपट, पैसे खर्च करण्यापेक्षा तो पाहू. त्यानंतर लोक आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले आणि कमी काळाचा लघुपट पाहून त्यात आनंद मानू लागले. परंतु चित्रपटनातून आपण ज्या कथा सांगतो, जी संस्कृती दाखवतो, ती इतर कोणत्या माध्यमातून पाहायला मिळत नाही.