सातारा : दिगपाल लांजेकर यांच्या शिवष्ट्कातील पाचवा चित्रपट 'सुभेदार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संहिता पूजन तानाजी मालुसरे यांच्या जन्मगावी आणि कर्मभूमीवर सर्व मालुसरे कुटुंबियांसोबत झाले. यावेळी एक वंशज आपले मनोगत सांगताना भावुक झाला. अत्यंत उत्साहात दिग्दर्शक दिगपाल यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देत म्हणाला, "तुम्ही इतिहासाची मोडतोड करू नका, आणि जर नेमका इतिहास सांगितल्यावरही तुम्हाला कोणी दूषणे देत असेल तर प्रसंगी आम्ही सर्व मावळे रक्त सांडायलाही मागे पुढे पाहायचो नाही."
५२ गावातील मालुसरे या सोहळ्यास उपस्थित होते. तानाजीची जन्मभूमी म्हणजे वाई जवळील गोडोली गाव येथे तसेच त्यांची कर्मभूमी, कोकणातील पोलादपूर येथील उमरठ या गावी त्यांच्या समाधीनजीक संहितेच्या प्रतीचे पूजन करण्यात आले. यावेळी तानाजीच्या प्रतिमेला आणि पुतळ्याला पुष्पहार घालून गौरविण्यात आले.
सदर सोहळ्यात दिगपाल लांजेकरांसोबतच समीर धर्माधिकारी, अजय पुरकर, स्मिता शेवाळे हे कलाकारही उपस्थित होते. सर्व कलाकारांनी यावेळी आपण चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहोत असे सांगितले. कलाकारांसोबतच दोन्ही गावांतील मालुसरे कुटुंबीय चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अत्यंत उत्सुक असल्याचे जाणवले. यावेळी चित्रपटामध्ये आपल्या गावाचा उल्लेख यावा अशी इच्छा गावकर्यांनी व्यक्त केली.