कतारने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातील प्रेक्षकांवर इस्लामचे श्रेष्ठत्व ठसविण्याचा प्रयत्न केला. हा अनुभव लक्षात घेऊन अशा स्पर्धांचे आयोजन करणार्या ‘फिफा’सारख्या संघटनांनी धर्मप्रसारासाठी अशा स्पर्धांचा गैरफायदा कोणी घेणार नाही याची दक्षता घेऊनच स्पर्धांचे स्थान निश्चित करावे!
सध्या कतार या देशामध्ये ‘फिफा विश्वचषक 2022’ फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत. दर चार वर्षांनी या विश्वचषकासाठी जे स्पर्धक येतात त्यांच्यासाठी आणि या महोत्सवासाठी गर्दी करणार्या प्रेक्षकांसाठी हा एक महोत्सवच असतो. ज्यांना प्रत्यक्ष सामन्यांच्या स्थानी उपस्थित राहणे शक्य नसते, असे जगभरातील कोट्यवधी प्रेक्षक दूरचित्रवाणीच्या माध्यमातून या सामन्यांचा आनंद लुटत असतात. पण यंदाच्या स्पर्धेदरम्यान कतार प्रशासनाने या महोत्सवाचे निमित्त करून इस्लाम धर्माचे धडे देण्याचा विचार करून प्रत्यक्षात तशी योजनाही आखली असल्याचे दिसून आले आहे.
या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, इस्लाम धर्म कसा श्रेष्ठ आहे, हे फुटबॉलप्रेमींच्या मनावर बिंबविण्यासाठी कतारने वादग्रस्त इस्लाम धर्म प्रसारक डॉ. झाकीर नाईक यास प्रवचने देण्यासाठी निमंत्रित केले आहे. झाकीर नाईक हा धर्मप्रसारक भारतातून पळून गेला असून त्याने मलेशियामध्ये आश्रय घेतला आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि द्वेष निर्माण करणारी भाषणे केल्याबद्दल भारताला तो हवा आहे. पण त्यापूर्वीच त्याने भारतातून पलायन केले. 2017पासून त्याने मलेशियात आश्रय घेतला आहे. मलेशियन सरकार त्याच्यामागे ठामपणे उभे आहे.
झाकीर नाईक यास कतारमध्ये येणार्या फुटबॉलप्रेमींवर इस्लामचा प्रभाव पाडण्यासाठीच निमंत्रण देण्यात आले हे उघड आहे. या विश्वचषक स्पर्धेची संधी साधून कतारने हा जो उद्योग आरंभिला आहे तो निश्चितच निषेधार्ह आहे. याच दरम्यान, बीबीसी आणि गार्डीयनसाठी काम करणार्या मजीद फ्रीमन याने ट्विट करून जी माहिती दिली आहे ती धक्कादायक अशीच आहे. ़“फुटबॉल स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या 500 हून अधिक लोकांनी गेल्या 22 नोव्हेंबर रोजी इस्लाम धर्म स्वीकारला,” असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. जगभरातून हजारो फुटबॉलप्रेमी येथे आले आहेत.
या निमित्ताने त्यांना इस्लामचे सौंदर्य पाहण्याची संधी मिळेल आणि त्यांना अल्लाह मार्गदर्शन करू शकेल, असेही मजिद फ्रीमन याने म्हटले आहे. ट्विटर वापरणार्या अबू सिद्दिक यानेही मजिद फ्रीमन यांच्या म्हणण्यास दुजोरा दिला आहे. त्याचप्रमाणे डॉ. झाकीर नाईक आणि त्याच्या तुकडीचे येथे आगमन झाल्याने हजारो युरोपियन जनतेला इस्लामचा प्रकाश दिसेल आणि ते इस्लाम स्वीकारतील, असेही अबू सिद्दिक याने म्हटले आहे.
याआधी कोरियन प्रजासत्ताक, जपान, ब्राझील, अमेरिका आणि अन्य युरोपियन देशांमध्ये विश्वचषक स्पर्धा संपन्न झाल्या आहेत. पण त्या कोणत्याही देशामध्ये ही संधी साधून येणार्या पाहुण्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला नाही. पण त्यास कतारचा अपवाद म्हणावा लागेल. कतारकडून अत्यंत आक्रमकपणे इस्लामी संस्कृतीचा पाठपुरावा या स्पर्धेच्या निमित्ताने केला जात आहे. इस्लामसंदर्भातील माहिती देणारी पत्रके त्या देशाकडून वितरित करण्यात आली आहेतच. पण येथे जे प्रेक्षक आले आहेत त्यांनी काय करावे, कसे वागावे, कोणता वेष परिधान करावा या संबंधीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. महिलांनी कोणता वेष परिधान करावा याच्या विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
या स्पर्धेच्या कालावधीत डॉ. झाकीर नाईक हा, इस्लाम धर्म कसा चांगला आहे, यावर प्रवचने देणार आहे. सक्तीने धर्मांतर करणारा म्हणून झाकीर नाईक प्रसिद्ध आहे. त्याच्याकडून दहशतवादाचेही समर्थन करण्यात आले आहे. तसेच, काही मुस्लीम कट्टरतावाद्यांचा तो मार्गदर्शक आहे, त्यांना प्रेरणा देणारा आहे. डॉ. झाकीर नाईक याच्या उपस्थितीसंदर्भात भारताने निषेध नोंदविला असता, त्यास कोणतेही अधिकृत निमंत्रण देण्यात आले नाही, असे स्पष्टीकरण कतारच्या राजनैतिक सूत्रांकडून देण्यात आले. असे असले तरी कतारने या स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातील प्रेक्षकांवर इस्लामचे श्रेष्ठत्व ठसविण्याचा प्रयत्न केला. हा अनुभव लक्षात घेऊन अशा स्पर्धांचे आयोजन करणार्या ‘फिफा’सारख्या संघटनांनी धर्मप्रसारासाठी अशा स्पर्धांचा गैरफायदा कोणी घेणार नाही याची दक्षता घेऊनच स्पर्धांचे स्थान निश्चित करावे!
काश्मीर : दहशतवाद नष्ट होण्याच्या मार्गावर!
“जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी जी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम हाती घेतली आहे त्यामुळे या प्रदेशातील दहशतवाद अखेरच्या घटका मोजू लागला असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘लष्कर-ए- तोयबा’ आणि ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटना नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काशीर खोर्यातील तीन जिल्हे आता संपूर्णपणे दहशतवादमुक्त झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये सध्या एकही दहशतवादी सक्रिय नाही. एवढेच नव्हे, तर ‘लष्कर -ए- तोयबा’ आणि ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनांची सूत्रे सांभाळणारा एकही कमांडर काश्मीर खोर्यात शिल्लक राहिलेला नाही. या दोन्ही दहशतवादी संघटना काश्मीरमध्ये नेतृत्वहीन झाल्या आहेत.
काश्मीर खोर्यामध्ये सध्या केवळ 81 अतिरेकी सक्रिय आहेत,” अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक विजयकुमार यांनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत दिली. “जे अतिरेकी सक्रिय आहेत त्यामध्ये 52 विदेशी आणि 29 स्थानिक आहेत. जे विदेशी अतिरेकी आहेत त्यातील सर्व पाकिस्तान किंवा पाकव्याप्त काश्मीरमधून आलेले आहेत. या दहशतवाद्यांची संख्या 50 पर्यंत खाली आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत,” अशी माहितीही विजयकुमार यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना विजयकुमार म्हणाले की, “हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर फारूक नल्ली हा एकमात्र सर्वात जुना अतिरेकी उरला आहे. हा अतिरेकी 2015पासून खोर्यामध्ये सक्रिय आहे. हा अतिरेकी सध्या सुरक्षा दलांच्या निशाण्यावर आहे. दोन वर्षे आधी काश्मीर खोर्यात विविध दहशतवादी संघटनांशी संबंधित 80 कमांडर सक्रिय होते. पण आता त्यांची संख्या दोन वा तीन इतकी घसरली आहे. तसेच ज्या दहशतवाद्यांना ‘हायब्रीड’ म्हणून ओळखले जाते असे 15 - 18 अतिरेकी सक्रिय आहेत. सोशल मीडियावरून दहशतवाद्यांच्या संपर्कात येऊन जे तरुण दहशतवादी झाले त्यांचा उल्लेख ‘हायब्रीड’ असा केला जातो. खोर्यामध्ये दहशतवाद्यांविरुद्ध जी मोहीम हाती घेण्यात आली आहे ती पाहता आगामी दोन वर्षांमध्ये काश्मीर खोर्यातून अतिरेक्यांचे पूर्ण उच्चाटन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावर्षी आतापर्यंत 99 तरुण अतिरेकी बनले. त्यातील 64 जणांना ठार करण्यात आले आणि 17 जणांना अटक करण्यात आली,” अशी माहितीही त्यांच्याकडून देण्यात आली.
“जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ‘कलम 370’ रद्द करण्यात आल्यानंतर सुरक्षा दलांनी हाती घेतलेल्या मोहिमेदरम्यान कसलाही ‘बंद’ झाला नाही, इंटरनेट सेवा बंद झाली नाही किंवा दगडफेकीची घटना घडली नाही,” अशी माहितीही देण्यात आली. ही सर्व माहिती पाहता काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने निवळत असलेली दिसून येते. फारुक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्यासारखे काही असंतुष्ट आत्मे जनतेला भडकविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण या नेत्यांना विशेष प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
चिनी जनतेच्या मागे उभे राहण्याचा तिबेटींचा निर्धार
“चीनने जे ‘झिरो कोविड’ धोरण अवलंबिले आहे त्यामुळे चिनी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. त्या धोरणाच्या निषेधार्थ चिनी जनता आंदोलनही करीत आहे. या आंदोलन करणार्या चिनी जनतेला विजनवासातील तिबेटी सरकारने आपला पाठिंबा दिला आहे. विजनवासातील तिबेटी सरकारचे मुख्यालय धर्मशाला येथे आहे. मध्यवर्ती तिबेटी प्रशासनाने या संदर्भात तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तसेच या आंदोलन करणार्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ‘कोविड’संदर्भातील चीनच्या धोरणामुळे तिबेटी जनतेचा जीव धोक्यात आला आहे,” असेही तिबेटी प्रशासनाने म्हटले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून 30 कोटी जनतेला चिनी प्रशासनाने ‘लॉकडाऊन’मध्ये ठेवले आहे. यामध्ये ल्हासा आणि तिबेटमधील अन्य शहरांचा समावेश आहे. काही शहरात 100 दिवसांपेक्षा अधिक काळ ‘लॉकडाऊन’ आहे. चीन सरकारने लादलेल्या या कडक निर्बंधांमुळे नागरिकांच्या हिंडण्या-फिरण्यावर निर्बंध आले आहेत. अन्नधान्य, औषधे अशा जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. चीनच्या या टोकाच्या निर्बंधांमुळे जनता संतापली आहे. त्या निषेधार्थ चिनी जनतेने विविध शहरांमध्ये तसेच विद्यापीठांमध्ये उग्र आंदोलने करून आपला निषेध नोंदविला आहे. शांघायपासून बीजिंगपर्यंत आणि ग्वान्गझोऊ ते चेंगडूपर्यंतच्या भागात सरकारविरोधातील असंतोषाची लाट पसरली आहे.
चिनी सरकारने ही समस्या हाताळताना मानवीय दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. चीनमध्ये सध्या जी निदर्शने होत आहेत त्यामुळे 1989मध्ये तियाननमेन चौकात झालेल्या उग्र निदर्शनांचे स्मरण व्हावे! त्या घटनेनंतर प्रथमच चिनी जनतेच्या असंतोषाने असे रूप धारण केले आहे. कोरोना महामारीचा उगम ज्या चीनमधून झाला त्या चीनला या महामारीवर अद्याप नियंत्रण प्रस्थापित करता आले नाही. या महामारीमुळे संत्रस्त झालेल्या जनतेवर चिनी सरकारकडून जबरदस्ती केली जात आहे. त्यामुळेच असंतोषाचा वडवानल चीनमध्ये सर्वत्र पसरत चालल्याचे दिसून येत आहे.