सॅम्युअल पेपीसच्या दैनंदिनीतून १७व्या शतकातल्या इंग्लंडमधल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, नाविक अशा अनेक क्षेत्रांवर प्रकाश पडतो. त्यामुळे त्या दैनंदिनीचं साहित्यिक कलाकृती म्हणून महत्त्व आहेच, पण सन १६०० ते १६६९ या कालखंडाचा इतिहास म्हणूनही तिला फार महत्त्व आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला विविध उपक्रमांचे निश्चय मोठ्या उत्साहाने केले जातात. रोज सकाळी ठीक ५ वाजता उठणे, सकाळी फिरायला जाणे, व्यायाम करणे नियमित वेळेवर खाणे इत्यादी. त्यातलाच एक निश्चय असतो, नियमित दैनंदिनी लिहिणे. साधारणपणे हे सगळेच निश्चय आठवडाभर टिकतात. नव्या वर्षाच्या नव्या महिन्याच्या मागे पडणार्या दिवसांबरोबरच हे निश्चयही मागे पडत जातात. पहिल्यांदा काही दिवस त्याबद्दल दु:ख होतं. फेब्रुवारी उजाडेपर्यंत ते दु:खही नाहीसं होतं आणि मंडळी पूर्वीच्याच निबरटपणे आयुष्याची चाकोरी चालू लागतात. यापैकी सर्वात पहिल्यांदा मोडला जाणारा निश्चय म्हणजे रोज दैनंदिनी लिहिण्याचा. कारण, बहुसंख्य लोकांना सर्वाधिक कंटाळा कसला असेल, तर तो म्हणजे लिहिण्याचा. वर्षाच्या सुरुवातीचे काही दिवस रोज उत्साहाने दैनंदिनी उर्फ डायरी लिहिली जाते. पण, चारच दिवसांत काय लिहायचं दैनंदिनीत, असा सोईस्कर विचार मनात येतो आणि दैनंदिनी अडगळीत जाते.
अलीकडच्या काळात जागतिक साहित्यात फार गाजलेली दैनंदिनी म्हणजे ‘डायरी ऑफ अॅन फ्रँक.’ अॅन फ्रँक ही एक डच-ज्यू मुलगी होती. नाझींच्या छळापासून वाचण्यासाठी अॅन फ्रँकचा बाप ऑट्टो फ्रँक आणि त्याचा एक मित्र आपापल्या कुटुंबासह हॉलंडमधल्या अॅम्स्टरडॅम शहरात भूमिगत होतात. दोन वर्षांनी नाझी गुप्त पोलिसांना त्यांचा छडा लागतो. मग त्यांना पकडून छळ छावणीत पाठवलं जातं. या दोन वर्षांच्या भूमिगत अवस्थेतल्या काळाचं अॅन फ्रँकने लिहून ठेवलेलं वर्णन म्हणजेच ही अॅन फ्रँकची दैनंदिनी. अॅन फ्रँकचा बाप ऑट्टो आणि त्याचा मित्र यांच्या कुटुंबातल्या एकूण आठ लोकांपैकी फक्त ऑट्टो फ्रँकंच छळ छावणीतून जीवंत बाहेर आला. बाकी सगळे मेले. ऑट्टो फ्रँकने १९४७ साली सर्वप्रथम आपल्या मुलीची ही दैनंदिनी प्रकाशित केली. ती जगभर अत्यंत लोकप्रिय ठरली आणि आजही आहे. आतापर्यंत जगभरातल्या ७० भाषांमध्ये ती भाषांतारित झालेली आहे. आता तिला विश्वसाहित्यातही एक उत्कृष्ट कलाकृती असा मान आहे.अशीच किंवा याहूनही अधिक प्रसिद्ध असणारी दैनंदिनी म्हणजे सॅम्युअल पेपीसची डायरी. सॅम्युअल पेपीसच्या दैनंदिनीतून १७व्या शतकातल्या इंग्लंडमधल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, नाविक अशा अनेक क्षेत्रांवर प्रकाश पडतो. त्यामुळे त्या दैनंदिनीचं साहित्यिक कलाकृती म्हणून महत्त्व आहेच, पण सन १६०० ते १६६९ या कालखंडाचा इतिहास म्हणूनही तिला फार महत्त्व आहे.
इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला हा सन १२६५ मध्ये सिंहासनावर आला. इंग्लंडमध्ये सरदार मंडळींनी राजाला आपल्या नियंत्रणात ठेवल्याला ४०० वर्षं उलटून गेलेली होती. अन्य देशांप्रमाणे इंग्लंडच्या राजाला अनियंत्रित सत्ता गाजावता येत नसे. तो पार्लमेंटला उत्तरदायी होता. चार्ल्सने ही स्थिती बदलून सत्ता पूर्णपणे आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला. सरदार मंडळींना हे न आवडल्यामुळे इंग्लंडमध्ये चक्क यादवी युद्ध झालं. त्यात चार्ल्सचा पराभव झाला आणि १६४९ साली सरदार लोकांनी राजधानी लंडनमध्ये व्हाईटहॉल राजवाड्यासमोरच्या चौकात राजा चार्ल्सचा जाहीरपणे शिरच्छेद केला.मग सरदारांचा आणि सामान्य जनतेचा प्रतिनिधी असलेला ऑलिव्हर क्रॉमवेल हा सत्ताधीर बनला. त्याने स्वत:ला ‘सिंहासनाचा संरक्षक- लॉर्ड प्रोटेक्टर’ अशी पदवी घेतली. अगदी सामान्य लोकांमधून मोठा झालेलाक्रॉमवेल राज्यकर्ता म्हणून तसा बरा होता. त्याच्या १६५३ पासून सुरु झालेल्या कारकिर्दीत इंग्लंडचा कारभार एकंदरीत बरा चाललेला, पण सन १६५८ मध्ये म्हणजे पाचच वर्षांत क्रॉमवेल नैसर्गिक मृत्यूने मेला. आता पुन्हा प्रश्न आला.
राजा कोण? सगळी सरदार आणि मुत्सद्दी मंडळी डोकी खाजवायला लागली. मग त्या खाजवण्यातून चुकलो, डोक्यातून सुपीक कल्पना निघाली. राजा चार्ल्सला ठार मारल्यावर त्याचं कुटुंब प्रथम फ्रान्समध्ये आणि नंतर हॉलंडमध्ये स्थलांतरित झालं होतं. त्यापैकी चार्ल्स याच नावाच्या राजपुत्राला पुन्हा इंग्लंडमध्ये आणायचं आणि ‘चार्ल्स दुसरा’ या नावाने त्याला राज्यभिषेक करायचा.मग मूर्खांनो, त्या पहिल्या चार्ल्सला एवढा वाजत-गाजत ठार कशाला मारलात? होता तोच बरा होता की! यावर सरदार मंडळीचं म्हणणं असं की, पहिला चार्ल्स आमच्या म्हणण्याबाहेर जायला लागला म्हणून त्याला उडवला. दुसरा चार्ल्स तसं करणार नाही. कारण, हे चिरंजीव अत्यंत आळशी, फेदी, स्वार्थी आणि स्त्रीलंपट आहेत. ते कायम विलासात मग्न असतात. त्यांना सत्ता गाजवण्याची वगैरे महत्त्वाकांक्षा नाही. त्यांना छानपैकी कपडालत्ता, दिखाऊ भपका, दारू आणि बाया मिळल्या की पुरे!
हे सगळं तपशीलवार लिहिण्याचं कारण म्हणजे याच दुसर्या चार्ल्सला पोर्तुगीज राजा जॉन याने आपली बहीण कॅथरिन ब्रॅगान्झा दिली आणि बरोबर आंदण म्हणून मुंबई बेट दिलं. दुसर्या चार्ल्सचा जन्म सन १६३०चा आणि मृत्यू १६८५ सालचा. म्हणजे इंग्लंडचा हा राजा अगदी सरळ आपल्या लाडक्या शिवछत्रपतींचा समकालीन होता. शिवरायांनी अक्षरशः शून्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. मे-जून १६६० मध्ये इंग्रज सरदार मंडळींनी मोठ्या सन्मानाने चार्ल्सला लंडनला बोलवून आणलं आणि सिंहासनावर बसवलं. कोणताही पराक्रम न करता चार्ल्सला इंग्लंडचं राजपद वाढून आणलेल्या ताटासारखं फुकट मिळालं. नेमक्या त्याच वेळेला शिवराय पन्हाळगडावर सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकले होते आणि इंग्रजांच्या ‘ईस्ट इंडिया’ कंपनीच्या राजापूर वखारीचा प्रमुख हेन्री रीव्हींग्टन हा पन्हाळगडावर इंग्लिश तोफा डागत होता.
असो. तर चार्ल्सला सन्मानपूर्वक इंग्लंडमध्ये आणण्यासाठी जो एक आरमारी ताफा हॉलंडला गेला, त्यात सॅम्युअल पेपीस हा नेव्हल बोर्डचा प्रमुख या नात्याने हजर होता. रॉयल नेव्ही किंवा लष्करी खात्याच्या अखत्यारितील आरमार, त्याच्या हालचाली, माणसं हे सगळं अॅडमिरल मंडळी बघायची. पण, या लष्करी नौदलाला नागरी प्रशासनातून जे जे हवं, ते ते तत्परतेने पुरवणं हे या नेव्हल बोर्डाचं काम होतं. म्हणजेच सॅम्युअल पेपीस हा नौदल अधिकारी नसून नागरी अधिकारी होता. परंतु, इंग्लंड हे आरमारी राष्ट्र असल्यामुळे त्याची जबाबदारी मोठी होती. हे पद ग्रहण करण्यापूर्वी ऑलिव्हर क्रॉमवेलच्या राजवटीतही पेपीसने अनेक नागरी, प्रशासकीय उत्तम रीतीने हाताळल्या होत्या. सरदार मंडळींमधला एक फारच वजनदार उमराव अर्ल ऑफ सँडविच याचा पेेपीस हा अगदी उजवा हात होता. शिवाय पेपीस हा मोठा दर्दी रसिक होता. तो उत्तम गात असे. कविता करीत असे. काही तंतुवाद्यं, सुषिर वाद्यं (म्हणजे बासरीप्रमाणे फुंकर घालून वाजवण्यची वाद्यं), ऑर्गन हेसुद्घा तो चांगलं वाजवत असे. गाणी-बजावणी, नाटकं, साहित्य अशा लंडनच्या सांस्कृतिक वर्तुळातही तो रमलेला असे. अशा लोकांनी कमी-जास्त दारू ढोसणं आणि बायकोखेरीज इतर बायकांशीही संबंध ठेवणं, हे त्या काळात अजिबातच वर्ज्य समजलं जात नसे. उदा. राजा चार्ल्सचंच पाहा. त्याला पोर्तुगीज राणी कॅथरीन ब्रॅगान्झापासून मूल झालं नाही. पण, अन्य स्त्रियांपासून किमान १४ ते २० मुलं झाली.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सर्व करीत असताना पेपीस आपल्या नियम कार्यामध्ये कुठेही कसूर करीत नसे. साहजिकच सरदार मंडळी आणि राजा दोघांचीही त्याच्यावर मर्जी होती. मे-जून १६६० मध्ये चार्ल्स दुसरा गादीवर बसला. पण, १ जानेवारी, १६६० या दिवसापासूनच सॅम्युअल पेपीसने दैनंदिनी लिहायला सुरुवात केली होती आणि तो निश्चय त्याने पुढची सलग नऊ वर्षे म्हणजे सन १६६९ पर्यंत पाळला. इंग्लंडच्या इतिहासात या कालखंडाला ‘रिस्टोरेशन पीरिएड-जीर्णोद्घार कालखंड’ असं म्हटलं जातं. पहिल्या चार्ल्सला ठार मारून इंग्लिश लोकांनी ज्या स्टुअर्ट राजघराण्याचा उच्छेद केला होता, त्याच राजघराण्यातल्या दुसर्या चार्ल्सला परत राज्यपद देऊन त्यांनी स्टुअर्ट घराण्याचा जीर्णोद्घार केला. त्यामुळे १६६० ते १६६९ या कालखंडात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या. नेव्हल बोर्डाचा प्रमुख या महत्त्वपूर्ण प्रशासकीय पदावरून सॅम्युअल पेपीस त्या सर्व घटना डोळसपणे निरखत होता आणि दैनंदिनीत नोंदवत होता, हे त्याच्या दैनंदिनीचं महत्त्व.
१६६९ साली पेपीसने दैनंदिनी लिहिणं थांबवलं. कारण, त्याला असं वाटू लागलं की, आपली दृष्टी मंद होतेय. दिवसाची सगळी कामं संपल्यावर, रात्री मेणबत्त्यांच्या प्रकाशात पेपीस दैनंदिनी लिहीत जागत राहायचा. त्या मंद प्रकाशात दौत आणि टाक यांच्या साहाय्याने बराच काळत लिहीत राहिल्यामुळे बहुधा पेपीसला नजर मंदावल्यासारखं वाटू लागलं असावं. त्यामुळे त्याने लिहिणं बंद केलं. प्रत्यक्षात तसं काही नव्हतं, पण लिहिणं थांबलं ते थांबलंच.पुढच्या काळात त्याच्या जबाबदार्या वाढतच गेल्या. तो ब्रिटिश पार्लमेंटमध्ये खासदार झाला. १६८४ मध्ये तो लंडनच्या अत्यंत ख्यातनाम अशा रॉयल सोसायटीचा अध्यक्ष झाला. त्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीतल्या सोसायटीने सर आयझॅक न्यूटनचा ‘प्रिन्सिपिआ मॅथमेटिका’ हा विख्यात ग्रंथ प्रकाशित केला. साहजिकच त्याच्यावर लेखक म्हणून आणि प्रकाशन संस्थेचा अध्यक्ष म्हणून सॅम्युअल पेपीसचं नाव आहे.
आणखी पुढे काळ पालटला. १६८५ साली दुसरा चार्ल्स मेला. राजकारणाने पुन्हा कलाटणी घेतली. काही एका अफरातफर प्रकरणात पेपीसवर खटला झाला. तो निर्दोष सुटला, पण सन १६९० मध्ये त्याने सार्वजनिक जीवनातून निवृत्ती पत्करली आणि तो लंडनजवळ क्लॅपहॅम इथे राहू लागला. तिथेच तो १७०३ मध्ये मरण पावला. त्याला इतर अनेक छंदांबरोबरच उत्तमोत्तम पुस्तक जमवण्याचा आणि ती वाचण्याचाही छंद होता. तो प्रचंड ग्रंथसंग्रह त्याच्या वारसांनी केम्ब्रिज विद्यापीठाला दिला. त्यात त्याच्या दैनंदिनीचे सहा जाडजूड बांधीव खंड, संगीत नाटकं, नौदलविषयक, नौकानयन विषयक दुर्मीळ ग्रंथ, असंख्य मध्ययुगीन हस्तलिखित ग्रंथ यांसह १८०० पोवाडे असं अमूल्य ग्रंथधन आहे. पोवाडा किंवा ‘बॅलड’ हा काव्यप्रकार इंग्लंडमध्ये १२व्या शतकापासून रूढ आहे. त्यामुळे पेपीसचा पोवाडा संग्रह हा संपूर्ण इंग्लंडमधला एक अत्यंत दर्जेदार संग्रह मानला जातो.असो. कल्पना करा की, शिवरायांच्या जीवनातल्या १६६० ते १६६९ पन्हाळगड वेढा, पावनखिंड, शाहिस्तेखानावरची झडप, पुरंदरचा तह, आग्रा भेट, अटक सुटका अशा अत्यंत रोमहर्षक काळातही दैनंदिनी त्याकाळाच्या एखाद्या मुलकी म्हणजे प्रशासकीय अधिकार्याने लिहून ठेवली असती तर?