अंतराळात कधी होणार नववर्षाचे स्वागत?

29 Dec 2022 14:37:31

अंतराळ

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत प्रत्येक देशात त्या-त्या टाईम झोननुसार केले जाते. परंतु, अंतराळात संशोधन करणारे अंतराळवीर कोणत्यावेळी नववर्षाचे स्वागत करतील, याची प्रचंड उत्सुकता नेटकर्‍यांत दिसून आली आहे. जगभरात नवीन वर्षाचे वेगवेगळ्या पद्धतीने जल्लोषात स्वागत केले जाते. पण, आंतरराष्ट्रीय ‘स्पेस स्टेशन’ मधील अंतराळवीर जे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर फिरत आहेत त्यांचे काय, असा प्रश्न केला जातो.

 
अंतराळवीरांचे नवीन वर्ष दि. १ जानेवारीला सकाळी ५.३० वाजता सुरु होणार आहे. कारण, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन सुमारे ७.६ किलोमीटर प्रतिसेकंद या वेगाने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते. याचा अर्थ असा की, ‘स्पेस स्टेशन’ दिवसातून १६ वेळा पृथ्वीभोवती फिरते. १६ सूर्योदय आणि सूर्यास्तातून प्रवास करते. तसेच, स्पेस स्टेशनवर असलेले अंतराळवीर अमेरिका ते जपानपर्यंत विविध ‘टाईमझोन’ असलेल्या देशांतील असून सध्या या स्थानकात सात ‘क्रू’ सदस्य आहेत.
अंतराळात ‘ग्रीनविच’नुसार कालगणना

अंतराळवीर दि. १ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी ५.३० वाजता नववर्षाचे स्वागत करतील. कारण, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे ग्रीनविच टाईमझोननुसार चालते. त्यामुळे मध्य युरोपीय वेळेपेक्षा एक तास आणि भारतीय वेळेपेक्षा साडेपाच तास मागे हे अंतराळवीर नवीन वर्ष साजरे करतील.

Powered By Sangraha 9.0