चतुरस्र ‘कीर्ति’वंत

29 Dec 2022 11:55:16

प्रा. विजय आपटे



भाषा, संगीत, तत्त्वज्ञान आणि साहित्य विषयात लेखन, संशोधनाचा वसा घेतलेले निवृत्त प्राध्यापक विजय सदानंद आपटे यांच्याविषयी...
 
ब्बल चार दशके विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पण वृत्तीने आणि सर्जनशीलपणे कार्य बजावलेले ठाण्यातील प्रा. विजय आपटे यांचा जन्म नाशिक येथे 7 नोव्हेंबर, 1949 रोजी झाला. त्यांचे वडील सदानंद आपटे हे नोकरी निमित्ताने कल्याणच्या ‘नॅशनल रेऑन’ कंपनीत आले. इथेच विजय यांचे बालपण आणि प्राथमिक ते अकरावीपर्यंतचे शिक्षण झाले.

नाशिकला आजोळ असल्याने त्यांचे मामा बाळ भाटे हे नाशिक परिसरात काव्य गायक आणि गीत रामायण गायक म्हणून लौकिक पावले होते. दरवर्षी नाशिकला सुट्टीतील वास्तव्यामुळे बालपणापासूनच कलेचे संस्कार विजय यांच्यावर घडत गेले. मामा-मामी दोघेही शिक्षकी पेशात, तर विजय यांच्या आई आशा आपटे यादेखील ‘नॅशनल रेऑन’ च्या शाळेत शिक्षिका होत्या. कुटुंबच शिक्षकी पेशात असल्याने ’आपण शिक्षक व्हावे’ ही ऊर्मी त्यांच्या मनात निर्माण झाली. पुण्यात एक वर्ष महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर 1967 पासून मुंबईतील कीर्ती महाविद्यालयात कला शाखेत त्यांनी प्रवेश घेतला. ‘एमए’नंतर त्याच वर्षापासून कीर्ती महाविद्यालयाच्या मराठी विभागात ते व्याख्याता म्हणून रुजू झाले. ‘एमए’चा अभ्यास करता करता 1970 ते 1972 या दोन वर्षात सरस्वती विद्या मंदिर, चेंबूर येथे मराठी आणि संस्कृतचे त्यांनी अध्यापन केले. पुण्यात शिकत असताना रा. शं. वाळिंबे, अनुराधा पोतदार, चंद्रशेखर बर्वे या मराठी विषयाच्या शिक्षकांनी प्रभावित केले.



कीर्ती महाविद्यालयात आल्यानंतर प्राचार्य मेघश्याम पुंडलिक रेगे, रमेश तेंडुलकर, डॉ. होस्कोट, डॉ. गोपाळ राणे, सुभाष सोमण, अरुण कुलकर्णी असे उत्तमोत्तम शिक्षक लाभल्याने अध्यापनातील विजय यांची रूची वाढली. 1972 ते 2009 सलग 37 वर्षे अध्यापनाचे काम करून प्रा. विजय आपटे दि. 30 नोव्हेंबर, 2009 या दिवशी कीर्ती महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले.
मराठी भाषा साहित्य शिकवणे या बरोबरीने दोन दशकांहूनही अधिक काळ ’मास कम्युनिकेशन’, ’जर्नालिझम’ हे विषय त्यांनी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून शिकवले. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. यामुळे अनेक विद्यार्थी नावारूपाला आले किंबहुना, अनेक नामवंत पत्रकार, समीक्षक, नट यांना घडवण्यात त्यांचा खारीचा वाटा असल्याचे ते सांगतात.
’रमेश तेंडुलकर काव्यचिंतन-माला’ या उपक्रमांतर्गत केशवसुत, भा. रा.तांबे, रविकिरण मंडळातील कवी चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या कवितांवर आधारित सांगीतिक कार्यक्रमही विजय यांनी आयोजित केले. त्या कार्यक्रमांची संकल्पना, संयोजन, संचालन आणि लेखनही केल्याचे ते सांगतात. ठाणे महापालिकेच्या ’जिद्द’ या शाळेत काही वर्षांपूर्वी कवितांचा कार्यक्रमही त्यांनी केला होता. शिकवणे, उपयुक्त उपक्रम करणे, प्रौढ साक्षरता, मुंबई शहर साक्षरता अभियान, कामगार साक्षरता, राष्ट्रीय सेवा योजनेचे कॅम्प यांच्या बरोबरीने संशोधनाचे कामही ते करीत आहेत. महाराष्ट्राचे दुसरे वेड- नाटक असे म्हटले जाते. विसाव्या शतकातील उत्तरार्धातील नाटककार वसंत कानेटकर यांच्या 25 नाटकांवर त्यांनी संशोधन केले आणि ते संशोधन 2004 मध्ये प्रसिद्ध झाले. मात्र, कानेटकरांचे जन्मशताब्दी वर्ष (2021-22) याची पुरेशी दखल घेतली गेली नसल्याची खंतही विजय व्यक्त करतात.
1982 ते 1987 या काळात ’मुंबई ग्राहक पंचायती’च्या ’ग्रंथमित्र’ योजनेचे मानद संचालक पद त्यांच्याकडे होते आणि त्यात ’गुरुनानक ते गुरुगोविंद सिंग’ असे एक महत्त्वाचे पुस्तकही त्यांनी प्रसिद्ध केले. निवृत्तीनंतर ’एशियाटिक सोसायटी’चे आजीव सभासद बनल्याने गेली सलग चार वर्षे त्यांना ‘रिसर्च टेबल’ दिले आहे आणि छोटे प्रकल्प तयार करायचे, अशी एक योजना सुरू केली आहे.2013 पासून ते आजतागायत त्यांच्याजवळ चार महत्त्वाचे प्रकल्प तयार आहेत. युवा संशोधकांनी अशा ‘प्रोजेक्ट’वर काम करावे, अशी त्यांची मनापासून इच्छा असून यासाठी लागणारे मार्गदर्शन करण्यास ते तयार आहेत.

’‘संकोची नसलो, तरी भिडस्तपणा आड येतो. ’अहो रुपम् अहो ध्वनी असे म्हणत कंपू करणे आवडत नाही,” अशी प्रांजळ कबुली ते देतात. पुरस्कारांबाबत बोलताना जिथे अर्ज आणि शिफारशी कराव्या लागतात, अशा गावी जायचेच नाही, असे त्यांनी ठरवले आहे. तरी ’गुरुदत्त’ वरील ग्रंथातील लेखाबद्दल प्रख्यात सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हस्ते तेव्हा सत्कार झाल्याने हाच मोठा पुरस्कार असल्याचे ते मानतात. 2013 पासून ’फिल्म अ‍ॅप्रिसिएशन’ या नव्या क्षेत्राबद्दल ते माहिती करून घेत आहेत.
नव्या पिढीला संदेश देताना ते, “कठोर मेहनत करा, परिश्रम करा, सेवाव्रती व्हा, तरच समाधान मिळेल,” असे सांगतात. अशा या चतुरस्र ‘कीर्ति’वंत गुरुला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

Powered By Sangraha 9.0