मुंबई : "सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करताना घटनांचं ठळक चित्र डोळ्यांसमोर उभं होतं, म्हणून ही कादंबरी मला महत्वाची वाटते. अर्थात ही एकच गोष्ट नाही तर लेखकाची लेखनशैली, एखाद्या प्रदेशाबद्दल दिलेले संदर्भ डोळ्यासमोर चित्र उभं करतात." असे साहित्य प्रकाशनच्या मुग्धा कोपर्डेकर पुस्तकाबद्दल सांगताना म्हणाल्या." लेखनासोबतच अनेक कलांमध्ये पारंगत असणारे लेखक वसंत वसंत लिमये यांची तिसरी कादंबरी नुकतीच पुण्यात व मुंबईत दिनांक २४ व २५ जानेवारी रोजी प्रकाशित झाली. यावेळी सुनील बर्वे यांनी कार्यक्रमाची सूत्रे उत्तम रित्या सांभाळली. मुंबईतील सावरकर स्मारक येथे तर पुण्यातील पांडुरंग कॉलनीच्या कर्नाटक हायस्कुल मधील शकुंतला शेट्टी सभागृहात पार पडले. साहित्य प्रकाशनच्या मुग्धा कोपर्डेकर यावेळी उपस्थित होत्या.
पुस्तकाविषयी जिव्हाळ्याने सांगत मुग्धा पुढे म्हणाल्या, "हा फक्त राजकीय विषय नाही, यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आहे, सशस्त्र सेनेच्या मोहिमा होतात, गुप्त मोहिमा होतात याबद्दल विस्तृतपणे लिहिले आहे. हे सगळं मांडताना लेखकाने मानवी संबंधांचे जे चित्रण केले आहे ते अत्यंत तरल पणे मांडलं आहे. देशातल्या राजकारणावर मराठीत मत मांडणारी पुस्तकं विरळाच. काही पुस्तकं काही अनोखं घेऊन येतात, साहित्यिक मूल्ये इतकी असतात की त्या पुस्तकाला एक ताकद प्राप्त होते. हे पुस्तकं त्या तोडीचं आहे असे मला वाटते."
इंद्रायणी साहित्य प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या कार्यक्रमाला अभिनेते सचिन खेडेकर, ले. जन. राजेंद्र निंभोरकर, अभिनेत्री नीना कुलकर्णी, संपादक डॉ. उदय निरगुडकर, संपादक दिनकर गांगल, अभिनेते दिनकर करंजीकर यांनी उपस्थिती लावली. तर पुणे येथील प्रकाशन सोहळ्यास अभिनेते मोहन आगाशे, एअर मार्शल भूषण गोखले, अभिनेते सतीश आळेकर, संपादक विजय कुवळेकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, दिनकर गांगल आणि प्रवीण पाटील उपस्थित होते.
दिनकर गांगलांनी लेखकाबद्दल सांगताना त्यांच्या बालपणीच्या नावाने आणि कारामतींचे वर्णन करत अभिमान व प्रेम व्यक्त केले. लोक ग्रिफिन व विश्वास या दोन प्रचंड खपाच्या कादंबर्यांनंतर 'टार्गेट असद शेख' ही त्यांची तिसरी कादंबरी. पुस्तकाचे प्रकाशन अनोख्या पद्धतीने झाले. खाडीजवळ एक खोके सापडलेले घेऊन आलो आहे असे सांगत एक इन्स्पेकटर ते तडक व्यासपीठावर घेऊन आला व त्यानंतर मान्यवरांनी खुशमस्करी करत पुस्तकांचे अनावरण करून प्रकाशन केले.