ख्रिसमसचे पर्यावरणावर भीषण दुष्परिणाम!

26 Dec 2022 21:32:33
Christmas terrible impact on the environment

नाताळच्या काळात होणारी नासाडी, निर्माण होणार कचरा यामुळे पर्यावरणाची किती मोठ्या प्रमाणात हानी होत असेल, याचा विचार हा सण साजरा करणारे करतात का? हा सण साजरा करणार्‍या ख्रिस्ती समाजास आपल्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही, असा संदेश देण्याचे काम त्या समाजाच्या धर्मगुरूंनी केले तरी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे रक्षण होईल! पण, ते त्या समाजाच्या लक्षात यायला हवे ना!


जगभरातील ख्रिस्ती समाज ख्रिसमस अथवा नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो. पण, या सणाच्या दरम्यान जी वृक्षतोड होते, अन्नाची नासाडी होते, कागदाचा जो प्रचंड कचरा होतो, त्यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत असल्याचे लक्षात आले आहे. नाताळच्या काळात दरवर्षी वेष्टनांना गुंडाळण्यात येणारा २ लाख, २८ हजार मैल लांबीचा कागद फेकून दिला जातो. २०१८ सालच्या एका आकडेवारीनुसार, ब्रिटिश जनता नाताळच्या निमित्ताने वेष्टनास गुंडाळण्यात येणार्‍या रॅपिंग पेपरचे १०८ दशलक्ष रोल वापरात आणते. अमेरिकेमध्ये नाताळमुळे ५० लाख टन इतका अतिरिक्त कचरा निर्माण होतो. त्या कचर्‍यातील सुमारे ४० लाख टन कचरा हा शॉपिंग बॅग्ज आणि रॅपिंग पेपरचा असतो. नाताळमुळे दरवर्षी प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. या काळात कागदाची प्रचंड प्रमाणात हानी होते. तसेच असंख्य झाडे तोडली जातात. तसेच या काळात अन्नाची जी नासाडी होते ती निराळीच! तीन हजार ख्रिसमस कार्डे बनविण्यासाठी एका झाडाचा वापर होतो. हे लक्षात घेता जगभरात ख्रिसमस कार्डे बनविण्यासाठी ३ कोटी, ३० लाख झाडे तोडली जातात. अमेरिकेत नाताळच्या काळात साडेतीन कोटी ते चार कोटी झाडांची विक्री केली जाते.

एका अहवालानुसार, केवळ इंग्लंडमध्ये एक अब्ज ख्रिसमस कार्डे विकली जातात. ब्रिटनच्या ‘रॉयल मेल’च्या माहितीनुसार, नाताळच्या काळात दीड कोटी ख्रिसमस कार्डे टपालाद्वारे पोहोचविली जातात, तर हॉलमार्क आणि ग्रीटिंग कार्ड असोसिएशनच्या माहितीनुसार, अमेरिकेत दीड अब्ज कार्डे एकमेकांकडे धाडली जातात. अमेरिकेत नाताळमुळे अतिरिक्त ५० लाख टन कचरा निर्माण होतो.नाताळच्या काळात जो प्लास्टिक कचरा निर्माण होतो, त्यामुळे पर्यावरणाची जी हानी होते ती निराळीच! जो प्लास्टिक कचरा निर्माण होतो, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी २६ दशलक्ष पौंड एवढा खर्च होतो. इंग्लंडमध्ये या काळात २० लाख टर्की, ५० लाख ख्रिसमस पुडिंग्ज, ७ कोटी, ४० लाख मीन्स पाय हे पदार्थ खाण्यालायक असले तरी फेकून दिले जातात. फेकून दिलेल्या या गोष्टींमुळे २ लाख, ७० हजार टन अन्नपदार्थांची नासाडी होते. नाताळच्या काळात होणारी नासाडी, निर्माण होणार कचरा यामुळे पर्यावरणाची किती मोठ्या प्रमाणात हानी होत असेल, याचा विचार हा सण साजरा करणारे करतात का? हा सण साजरा करणार्‍या ख्रिस्ती समाजास आपल्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही, असा संदेश देण्याचे काम त्या समाजाच्या धर्मगुरूंनी केले तरी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे रक्षण होईल! पण, ते त्या समाजाच्या लक्षात यायला हवे ना!
 

८४ टक्के मुस्लीम महिलांचा बहुपत्नीत्वास विरोध!


‘भारतीय मुस्लीम महिला आंदोलन’ या संस्थेने गेल्या मंगळवार, दि. २० डिसेंबर या दिवशी एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला. हे सर्वेक्षण राष्ट्रव्यापी करण्यात आले होते. या सर्वेक्षणानुसार, जे मुस्लीम पुरुष अनेक विवाह करतात, त्यामुळे महिलांना जबरदस्त मानसिक त्रास, कष्ट सहन करावे लागतात, असे निदर्शनास आले आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ८४ टक्के महिलांनी बहुपत्नीत्वास विरोध दर्शविला आहे. बहुपत्नीत्वावर बंदी आणण्यात आली पाहिजे, असे स्पष्ट मत या महिलांनी नोंदविले आहे. बहुपत्नीत्वामुळे महिलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोच; त्याचप्रमाणे आपल्याला योग्य वागणूक मिळाली पाहिजे, अशी मागणी करण्याच्या किंवा आपले म्हणणे मांडण्याच्या स्थितीतही अशा महिला नसतात. आपला विश्वासघात झाल्याची, आपली अप्रतिष्ठा झाल्याची, आपल्या स्वाभिमानास ठेच पोहोचल्याची भावना महिलांमध्ये निर्माण होते, असेही या सर्वेक्षणाद्वारे आढळून आले आहे.

 मुस्लीम महिलांमध्ये जागृतीचे कार्य करीत असलेल्या भारतीय मुस्लीम महिला आंदोलनाच्या झाकिया सोमण आणि नूरजहां साफिया यांनी या सर्वेक्षणाचा अहवाल तयार केला आहे. या सर्वेक्षणासाठी २८९ प्रश्न तयार करण्यात आले होते. दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगण, ओडिशा, प. बंगाल आणि उत्तर प्रदेशात हे सर्वेक्षण करण्यात आले होते. हे सर्वेक्षण करून बराच कालावधी झाला होता. ‘कोविड’ आणि अन्य विविध कारणांमुळे तो अहवाल प्रसिद्ध करणे लांबणीवर पडले होते. पण, जे निष्कर्ष काढण्यात आले आहेत ते विद्यमान काळातही तेवढेच लागू आहेत. मुस्लीम पुरुषास चार पत्नी करण्याची अनुमती आहे. पण, भारतीय दंड संहितेच्या ‘कलम ४९४’ नुसार बहुपत्नी करणे हा फौजदारी गुन्हा आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार अनेक विवाह करण्यास बंदी आहे. हा कायदा हिंदू, शीख, जैन, बौद्ध धर्मीयांना लागू आहे. पण, मुस्लीम मात्र चार विवाह करू शकतात. पण, जे सर्वेक्षण करण्यात आले आहे ते लक्षात घेता बहुसंख्य मुस्लीम महिलांचा बहुपत्नीत्वास विरोध असल्याचे लक्षात येते. मुस्लीम समाजात आणि विशेषतः मुस्लीम महिलांमध्ये जितक्या अधिक प्रमाणात जागृती निर्माण होईल, त्यावेळीच बहुपत्नी करण्याच्या प्रकारास आळा बसू शकेल.


ख्रिस्ती धर्मगुरूस अटक


उत्तर प्रदेशामध्ये सक्तीने धर्मांतर केल्याच्या कथित आरोपावरून एका चर्चच्या धर्मगुरूस उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. रामपूर येथील चर्चच्या धर्मगुरूस बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक कायद्याखाली अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आली. एका स्थानिक रहिवाशाने केलेल्या तक्रारीवरून सदर धर्मगुरूस अटक करण्यात आली. ज्या धर्मगुरूस अटक करण्यात आली, त्याचे नाव पोलो मसीहा असे आहे. अन्य समाजाच्या लोकांना एकत्रित करून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न सदर धर्मगुरू करीत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. अशाच प्रकारे सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील सीतापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत गेल्या २१ डिसेंबर रोजी घडला होता. त्या ठिकाणी दोन भारतीय आणि चार ब्राझिलियन नागरिकांनी शाहबाजपूर गावामध्ये गावकर्‍यांना गोळा करून त्यांना काही आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला होता.

 त्याआधी मेरठ येथे सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. या घटना लक्षात घेता उत्तर प्रदेशामध्येही ख्रिस्ती धर्मगुरू धर्मांतराचे काम विविध ठिकाणी करीत असल्याचे दिसून येत आहे. एका मिशनर्‍यास अटक झाल्याने या पाद्री लोकांचे काम थांबणार नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. सरकारने त्यांचा बंदोबस्त करायलाच हवा, पण त्याचबरोबर जनतेनेही जागृत राहून प्रलोभने दाखवून धर्मांतर करणार्‍यांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी. संघटित, जागृत हिंदू समाजच या मिशनर्‍यांना पायबंद घालू शकेल. धर्मांतराचे प्रकार रोखू शकेल.





Powered By Sangraha 9.0