मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची सहकारी दिशा सालियानच्या संशयास्पद मृत्यु प्रकरणी माजी मंत्री आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानभवनात दाखल होताच राणेंनी आदित्य ठाकरेंवर प्रहार केला आहे.
नितेश राणे म्हणाले की, 'अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियानच्या संशयास्पद मृत्युनंतर जेव्हा या विषयाची चर्चा होते, तेव्हा त्यात केवळ आणि केवळ आदित्य ठाकरेंचे नाव का घेतले जाते याचे कारण काय ते त्यांनी सांगावे.' असा सवालही राणेंनी विचारला आहे.
तो AU म्हणजे आदित्य ठाकरेच !
'फक्त नितेश राणे किंवा नारायण राणे नाही तर राज्यातील अनेक नेतेमंडळींनी आदित्य ठाकरेंच्या या प्रकरणातील सहभागावर टिप्पणी केलेली आहे. केवळ आम्हीच नाही तर कधीकाळी 'मातोश्री'च्या किचन कॅबिनेटमध्ये असलेले आणि महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष असताना मातोश्री वर खोके पोहोचवणार्या खासदार राहुल शेवाळेंनी काल लोकसभेत यावर गंभीर आरोप केले आहेत. दिशाला तिच्या मृत्यूपूर्वी ४४ कॉल करणारे AU कोण आहे यावर शेवाळेंनी खुलासा केला असून AU म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असल्याचा दावा त्यांनी केल्याचे नितेश राणेंनी म्हटले आहे.
A फॉर आफताब आणि A फॉर आदित्य
'श्रद्धा वाळकर हत्येतील आरोपी असलेला आफताब असो किंवा दिशा प्रकरणात आदित्य ठाकरे असोत या दोन्हीही विकृती आहेत. ज्या प्रमाणे आफताबची श्रद्धा हत्येत नार्को टेस्ट करण्यात आली तशीच दिशा प्रकरणात आदित्य ठाकरेंचीही नार्को टेस्ट करावी. A फॉर आफताब आणि A फॉर आदित्य यात साम्य आहे कारण या दोन्ही विकृती आहेत' असा घणाघतही राणेंनी आदित्यवर केला आहे.
दिशाची केस पुन्हा ओपन करा
'दिशा सालियानच्या हत्या प्रकरणाचा चौकशी आयोग दोन वेळा बदलण्यात आला. दिशाच्या घराच्या परिसरातील त्या दोन दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब का आहे ? इमारतीच्या व्हिजिटर बुकमधील पाने का फाडली गेली ? अद्यापही दिशा सालियानचा अंतिम पोस्टमार्टेम रिपोर्ट आलेला का नाही ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणे अजून बाकी आहे. ही केस मुंबई पोलिसांकडे असून ती पुन्हा ओपन करून त्याची पुन्हा एकदा नव्याने चौकशी करण्यात यावी,' अशी मागणी नितेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.