आणखी जागतिक वारसा स्थळे

22 Dec 2022 21:27:09
 Modi remarkable work towards preservation of cultural heritage


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा कारभार हाती घेतल्यानंतर सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणाच्या दिशेने उल्लेखनीय काम केले. नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक प्रयत्नांनी चोरी वा तस्करी केलेल्या शेकडो प्राचीन वस्तू आणि मूर्ती परदेशातून परत आणण्यात यश आले आहे. आज मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे भारतातील कितीतरी स्थळांचा युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.


आता भारतातील आणखी तीन सांस्कृतिक स्थळांना संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक तथा सांस्कृतिक संघटना-युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या संभावित यादीत सामील करण्यात आले आहे. यात मोढेराचे ऐतिहासिक सूर्यमंदिर, गुजरातचे ऐतिहासिक वडनगर शहर आणि त्रिपुरातील उनाकोटीच्या पाषाणांवर कोरलेल्या मूर्तींचा समावेश आहे. यामुळे भारतीय सांस्कृतिक वारशाला प्रोत्साहन मिळेल. उल्लेखनीय म्हणजे याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळेच २०१४ ते २०२१ दरम्यान भारताच्या दहा वारसास्थळांना युनेस्कोने आपल्या वारसास्थळ यादीत सामील केले. २०२१मध्ये गुजरातच्या धोलावीरा आणि तेलंगणाच्या रामप्पा मंदिराचा युनेस्कोने आपल्या वारसा स्थळ यादीत समावेश केला होता. यामुळे युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीत आता भारताची ४० वारसा स्थळे झाली आहेत.

२०१४ आधी युनेस्कोच्या यादीत भारताची ३० वारसा स्थळे होती, तर मोदींनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर आणखी दहा वारसा स्थळांचा समावेश करण्यात आला.आताच्या संभावित यादीतील मोढेराचे सूर्यमंदिर गुजरातमध्ये असून त्याची निर्मिती १०२६ मध्ये सोलंकी राजा भीमदेव प्रथमने केली होती. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मंदिरावर सूर्यकिरणे पडतील, अशाप्रकारे याची रचना करण्यात आलेली आहे. या मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतींवर अतिशय सुंदर नक्षीकाम करण्यात आले असून अनेक पौराणिक कथांचे चित्रण करण्यात आले आहे. मोढेराचे सूर्यमंदिर तीन भागात असून यात सूर्य कुंड, सभा मंडप आणि गूढ मंडप तयार करण्यात आलेला आहे. कुंडात जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. या मंदिरात वास्तुकलेचा अद्भूत नमुना पाहायला मिळतो. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, त्याच्या निर्मितीसाठी चुन्याचा वापर केलेला नाही.

 मोढेराचे सूर्यमंदिर प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून त्याची देखभाल आता पुरातत्त्व विभागाकडून केली जाते. गुजरातमधील २५०० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक वडनगर शहराचाही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे. पुरातत्त्वेत्त्यांच्या मते इथे हजारो वर्षांपूर्वी शेती केली जात असे. उत्खननादरम्यान इथे हजारो वर्षांपूर्वीची मातीची भांडी, दागिने आणि तर्‍हेतर्‍हेची अवजारे-हत्यारे मिळाली आहेत. अनेक पुरातत्त्ववेत्त्यांच्या मते वडनगर हडप्पा संस्कृतीच्या पुरातत्त्व स्थळांपैकी एक आहे. हडप्पा संस्कृती भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती मानली जाते. नरेंद्र मोदींचे गृहनगर असलेल्या वडनगरमध्ये उत्खननावेळी बौद्ध स्तुपदेखील मिळाले होते. उत्खननादरम्यान इथून जवळपास दोन हजार वर्ष जुने दोन बौद्ध कक्ष आणि चार भिंती आढळल्या आहेत. त्यासभोवतीची परिस्थिती पाहून पुरातत्त्ववेत्त्यांनी इथे बौद्ध विहार असावे, असा अंदाज व्यक्त केला आहे. नुकतेच इथे उत्खननावेळी तिसर्‍या व चौथ्या शतकातील बौद्ध स्तुपाचे अवशेष आणि सातव्या-आठव्या शतकातील एक मानवी सापळाही आढळला होता.

दरम्यान, त्रिपुराच्या रघुनंदन हिल्समधील उनाकोटीच्या मूर्ती प्रसिद्ध असून डोंगरावर पाषाणात कोरलेल्या आहेत. इथले सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, इथे एक, दोन अथवा दहा मूर्ती नसून त्यांची संख्या ९९ लाख, ९९ हजार, ९९९ आहे. बंगाली भाषेत उनाकोटीचा अर्थ एक कोटी पूर्ण होण्यासाठी एक कमी. संशोधकांच्या मते, या मूर्ती आठव्या अथवा नवव्या शतकात कोरल्या असाव्यात. पण, या मूर्ती कोणी कोरल्या याविषयीची ठोस माहिती उपलब्ध नाही. तथापि, यातल्या काही मूर्ती खराबही झालेल्या आहेत. इथे बहुतांश मूर्ती भगवान गणेश, भगवान शिव आणि अन्य हिंदू देवी-देवतांच्या आहेत. सध्या या जागेच्या सुरक्षेची जबाबदारी पुरातत्त्व विभागाकडे आहे. इथल्या काही मूर्ती इतक्या विशाल आहेत की त्यावरून झरा, धबधबे वाहतात. इथे एप्रिल महिन्यात अशोकाष्टमीची यात्राही भरते. या ठिकाणाचाही जागतिक वारसास्थळांत समावेश होऊ शकतो.




Powered By Sangraha 9.0