मुक्या सोबत्यांची माय : निधी सावंत

21 Dec 2022 21:53:08
 Nidhi Sawant


उच्चभ्रू संस्कृतीत राहूनही दररोज शेकडो भटक्या श्वानांच्या मायबनलेल्या निधी सावंत यांच्याविषयी...


‘समर्थाघरचे श्वान, त्याला सर्व देती मान’ असा प्रघात असला, तरी भटक्या श्वानांच्या नशिबी अपमानच येत असतो. मात्र, भटक्या श्वानांवर नि:स्वार्थी आणि निरपेक्षपणे प्रेम करणार्‍या ठाण्यातील निधी सावंत यांना रस्त्यावरील कुत्र्यांच्या ’युनिव्हर्सल मॉम’ म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
ठाण्यातील ’लोढा लक्झेरीया’ येथे राहणार्‍या निधी सावंत हे नाव ठाण्यातील एखाद्या कुत्र्याला विचारा, तो तुम्हाला अचूकपणे त्यांच्या घरी नेऊन पोहोचवेल, असे गमतीने म्हटले जाते. कॉर्पोरेट क्षेत्रात तसेच ‘हाय प्रोफाईल’ असूनदेखील बडेजावात न रमता श्वानांसाठी त्या जातीनिशी रस्त्यावर उतरतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांसाठी आधारवड ठरल्या आहेत.निधी सुरज सावंत मूळच्या कोकणातल्या असल्या तरी त्यांचे बालपण, शिक्षण, कर्मभूमी मुंबईच राहिली आहे. निधी यांचे वडील ‘एअर इंडिया’त होते. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवीधर होऊन सिडनी विद्यापीठात ‘आर्किटेक्ट’ बनल्या.

एका बहुराष्ट्रीय कंपनीत ’आर्किटेक्ट’ म्हणून नोकरी करताना ’इंटेरिअर’ची कामेही करतात. निधी यांचे पती एका बड्या ऑईल अ‍ॅण्ड गॅस कंपनीत उच्चपदावर असून मुलगी फायनान्सचे शिक्षण घेत आहे. निधी यांना खरंतर कुत्र्यांची मुळीच आवड नव्हती. एकदिवस पतीने लेकीच्या हट्टापाई घरात आणलेल्या कुत्र्याच्या पिल्लाच्या त्या जवळही जात नसत. पण हे पिल्लू कितीही बाजूला केलं, तरी परत परत त्यांना बिलगत असे. एक-दोन वेळा निधी यांच्या हातचा मार खाऊनही त्या पिल्लाने लळा सोडला नाही. पिल्लाची ही माया पाहून निधी यांचे मनपरिवर्तन झाले. एवढे निरपेक्ष प्रेम जाणून त्या श्वानांच्या प्रेमात पडल्या.

कुत्रा हे नाव माणूस नावाच्या प्राण्याने बदनाम केलंय, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. पुढे मग घरातील श्वानाला अन्न घालून शिल्लक राहिलेले अन्न फुकट न घालवता कॉलनीतील भटक्या श्वानांना घालायला सुरुवात केली. निधी यांच्याकडून चांगलं खायला मिळते म्हणून परिसरातील आणखीन काही भटके श्वान दररोज निधी येण्याची वाट पाहू लागले. मग निधीच्या घरात दररोज या रस्त्यावरच्या श्वानांसाठी तब्बल १० ते १५ किलो चिकनभात शिजू लागला.

दरम्यान, कोरोनामुळे लागलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये घराबाहेर पडणे मुष्कील बनले असताना रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांवर उपासमारीची वेळ आली, अशा परिस्थितीत निधी यांनी या भटक्या श्वानांना ‘फीडिंग’ करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष परवानगी मिळवत. अनेक महिने कुत्र्यांसाठी अन्नदान केले. दररोज तब्बल ४०० ते ५०० कुत्र्यांना अन्नदान करण्यासाठी त्यांची मुलगी आर्या, तसेच अश्विनी, उल्का व आणखीन दोन मैत्रिणी त्यांना सहकार्य करीत. सायं. ४ ते रात्री ११ पर्यंत हा अन्नदानाचा त्यांचा शिरस्ता आजही कायम आहे.

निधी यांचे काम केवळ ‘फीडिंग’ पुरते मर्यादित नाही. रस्त्यावरील जखमी श्वानांवर उपचार करणे, लसीकरण, निर्बीजीकरण करणे, त्यांच्या हक्काविषयी जनजागृती करणे ही सर्व कामे त्या आपला व्याप सांभाळून स्वखर्चातून करतात. महिनाकाठी यासाठी त्यांना किमान ६० ते ६५ हजार रुपये खर्च येत असल्याचे सांगतात.

निधी यांनी आपला कार्यविस्तार आता आपल्या जन्मभूमीकडे म्हणजेच तळकोकणात नेला आहे. भटक्या श्वानांची होणारी परवड रोखण्यासाठी सिंधुदुर्गात त्यांचे जोरदार काम सुरू आहे. सावंतवाडीतील चराठा गावी त्यांनी ’सुनिधी आश्रय’ हे भटक्या कुत्र्यासाठी अनाथालय सुरु केले आहे. रस्त्यावर बेवारस फिरणारी पिल्ले, अपघातात जखमी झालेले श्वान, अंध, अपंग व खूप वयोवृद्ध झालेल्या श्वानांचे या अनाथालयात संगोपन सुरू आहे. याशिवाय स्वखर्चातून तब्बल १८० श्वानांची निर्बिजीकरण शस्त्रक्रीया व शेकडो श्वानांचे लसीकरण त्यांनी केले आहे. तसेच, पाल-मुंबई या संस्थेसोबत काम करत त्यांनी नगरपालिका व नगर पंचायतींना निर्बिजीकरणाचे महत्व पटवून देत श्वान निर्बीजीकरणाची मोठी मोहीम हाती घेतली आहे. यातून तळकोकणात आता श्वानप्रेम आणि श्वानहक्काची मोहीम बाळसं धरीत आहे.

निधी यांचे हे कार्य म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणे आहे. परंतु, कुणाकडून कसलीही अपेक्षा न ठेवता त्या कार्यरत आहेत. उच्चभ्रू संस्कृतीत वाढल्या असल्या तरी त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर आहेत. श्वानांप्रमाणेच अन्य प्राण्यांवरही त्यांचं प्रेम आहे. कुठल्याही प्राण्यांचा छळ होतोय, असे लक्षात आले की त्या थेट भिडतात. प्राण्यांविषयीच्या कायद्याचे ज्ञान असल्याने पोलीसही त्यांचा आदर करतात. नेहमीच प्रसिद्धी आणि पुरस्कारापासून जाणीवपूर्वक दूर राहत, जे करायचे ते निरपेक्ष भावनेतून याकडे त्यांचा कटाक्ष असतो.

कुत्रा हा प्राणी प्रेमळ आणि जीवाला जीव देणारा मुका सोबती आहे. जीव लावला तर कैकपटीने तो आपल्यावर जीव लावतो. तेव्हा, मुक्या प्राण्यांवर दया करा, त्यांना सन्मान द्या, असे आवाहन युवा पिढीला करणार्‍या निधी सावंत यांना पुढील वाटचालीसाठी दै.‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा !







Powered By Sangraha 9.0