इंग्रजी नववर्ष आता अवघ्या दहा दिवसांवर... त्यामुळे या नवीन वर्षांत तरी मागील वर्षीच्या आठवणी मागे पडतील, अशी एक आशा होती. खासकरून कोरोना महामारीच्या त्या काळ्या आठवणी इतिहासजमा होतील आणि एका नवीन प्रारंभाला जग सज्ज होईल, असे एक सकारात्मक चित्र निर्माण झाले होते. परंतु, चीनमधील कोरोनाच्या प्रचंड मोठ्या उद्रेकाने केवळ या देशासमोरच नव्हे, तर अख्ख्या जगासमोर महामारीच्या जुन्या संकटाचा नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे.
साथरोगतज्ज्ञांनी दिलेल्या एका इशार्यानुसार, पुढील तीन महिन्यांत चीनमधील ६० टक्के आणि जगाची दहा टक्के लोकसंख्या ही पुन्हा एकदा कोरोनाने ग्रस्त होणार आहे. साथरोगतज्ज्ञांच्या या इशार्यामुळे आता चीनसमवेत अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांच्या डोकेदुखीतही भर पडलेली दिसते. खासकरून चीनचे शेजारी देश असलेल्या आणि व्यापारासाठी चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबित्व असलेल्या पाकिस्तानसारख्या देशांना चीनमधील या कोरोनाच्या लाटेचा जोरदार तडाखा बसणार आहे, हे निश्चित.
चीनमध्ये पुन्हा कोरोनाच्या महामारीने डोके वर का काढले, यावर जागतिक स्तरावरही उहापोह सुरू आहे. पण, काही साथरोगतज्ज्ञांच्या मते, इतर देशांप्रमाणे चीनमधून कोरोनाचा शून्य नायनाट कधी झालाच नव्हता. परंतु, चीनच्या लपवाछपवीच्या धोरणामुळे दरम्यानच्या काळात याविषयी फारशा चर्चा रंगल्या नाहीत. पण, आता पुन्हा एकदा चीनमधील महामारीच्या स्थितीने २०१९-२०२० सारखेच भीषण रुप धारण केले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी चिनी नागरिकांच्या उद्रेकानंतर, आंदोलनानंतर तेथील सरकारने काही निर्बंध जरूर शिथिल केले. परिणामी, नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला असला तरी सरकारची दडपशाही कमी झालेली नाहीच.
उलटपक्षी एकूणच चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांची मोठ्या संख्येने वाढत असल्याचेच निदर्शनास आले आहे. राजधानी बीजिंगचे हाल तर कुणी पुसावे... चीनची राजधानी असलेले हे शहर पुन्हा ‘लॉकडाऊन’च्या छायेखाली असून रुग्णांची संख्या हजारोंनी वाढल्याचे दिसते. काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगमधील परिस्थिती सध्या इतकी बिकट आहे की, मृतदेहांच्या अंत्यसंस्कारांसाठीही दोन दोन दिवस बघावी लागते. इतकेच नाही, तर दररोज स्मशानभूमीत दाखल होणार्या मृतदेहांची संख्याही एकाएकी वाढल्याने तेथील कर्मचार्यांवर याचा प्रचंड ताण आला असून काही कर्मचार्यांना कोरोनाची लागणही झाली आहे.
चीनमधूनच समोर आलेल्या माहितीनुसार, मृतांचे अंत्यसंस्कार करायचीही आता चिनी नागरिकांना परवानगी नाही. कोरोना झालेल्या मृतदेहांची शक्य तितक्या लवकर विल्हेवाट कशी लावता येईल, यासाठीच तेथील सरकारचे प्रयत्न असून हे काम आता तिथे २४ तास सुरू आहे. महत्त्वाच्या औषधांसह, मोठमोेठाली बर्फाची कंटेनर्स यांची मागणीही एकाएकी वाढली असून एकूणच अन्नधान्य पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.आधी म्हटल्याप्रमाणे चीनने ‘शून्य कोरोना धोरणा’वर प्रचंड भर दिला.
पण, त्याचाही फारसा परिणाम दिसून आला नाहीच. त्याचबरोबर लसीकरणाबाबत नागरिकांची उदासीनता, लसींच्या परिणामकारकतेवर उपस्थित झालेले प्रश्नचिन्ह यामुळेही चीनमध्ये कोरोनाचा पुनश्च उद्रेक झालेला पाहायला मिळतो. त्यामुळे कोरोनाच्या प्रारंभी काळात मोठमोठे ‘कोविड सेंटर्स’, ‘कोविड’शी संबंधित वैद्यकीय उपकरणे, मास्क, लसी अशा सगळ्यांची निर्मिती करून शेकी मिरवणारा चीन अजूनही या महामारीच्या दुष्टचक्रातून बाहेर निघू शकलेला नाही, हेच वास्तव.
एखादी गोष्ट फार खेचली की ताणते अन् तुटते. तशीच आज चीनची गत. म्हणूनच आता चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने होतोय कोरोना तर होऊन दे, वाढतोय तर वाढू दे, लोकं मरतायत तर मरू दे, अशाप्रकारचे धोरण अंगीकारल्याचे दिसते. परिणामी, चिनी नागरिकांमध्ये कोरोनाची भीती आता तीन वर्षं उलटली तरी अद्याप कायम असून पुन्हा जुन्याच आठवणींचे भूत त्यांच्या मानगुटावर बसले आहे. त्यातच नागरिकांनी चिनी सरकारच्या धास्तीपोटी कोरोनाच्या सार्वजनिक चाचण्या करण्यास दाखवलेल्या अनेच्छेमुळे आणि सरकारने नियमित कोरोनाबाधितांची आकडेवारी जारी करण्यासाठी दिलेल्या नकारामुळे, एकंदरच या देशात अनागोंदी माजली आहे. तेव्हा, चीनमध्ये आधीपेक्षाही भयंकर स्वपरुपात परतलेल्या या महामारीमुळे जगाच्याही चिंतेत भर पडली आहे.