‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’

20 Dec 2022 22:46:18

MahaMTB




‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’ ही संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवित गेल्या 28 वर्षांपासून कार्यरत आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी ‘रोटरीयन’ सतत झटत असतात. क्लबच्या वाटचालीविषयी जाणून घेऊया...

 
रोटरी क्लब’ ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’ची स्थापना डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्या हस्ते दि. 8 डिसेंबर रोजी 1994 साली झाली. त्यावर्षी बापूसाहेब जाधव हे प्रथम अध्यक्ष आणि आर्किटेक्ट पद्मनाभ गोखले हे सचिव होते. या क्लबची स्थापना प्रामुख्याने पर्यावरण संरक्षण करण्याच्या हेतूने करण्यात आली. ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’ या संस्थेने गेल्या 28 वर्षांत अनेक उपक्रम हाती घेत गरजूंना मदतीचा हात दिला आहे. गरेलपाडा येथे ‘चेक डॅम’ बांधले. या ‘चेक डॅम’चा 100 हून अधिक कुटुंबांना आजही फायदा होत आहे.
 
 

2005 साली मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा इतर शहरांप्रमाणो बदलापूर शहरालादेखील फटका बसला. या पावसामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यामुळे अनेकांना त्यांचा संसार पुन्हा उभा करता यावा, याकरिता क्लबने त्यात खारीचा वाटा उचलेला आहे. वरप गावात 100 घरांची पुनर्बांधणी केली. वनवासी बांधवांना त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी क्लबतर्फे मोफत बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. ‘डिमेंशिया’ने बाधित व्यक्ती आणि त्यांचे कुटुंब किंवा मदतनीस यांना मदत करण्यासाठी क्लबने ‘अंतरंग’ हा एक ग्रुप तयार केलो.

 
 

डोंबिवली पूर्वेच्या बाजूला स्थानक परिसरात एक शौचालय क्लबच्यावतीने बांधण्यात आले आहे. ते शौचालय कायमस्वरूपी स्वच्छ राहावे, याकरिता ‘मेंटेन्स’ ही क्लबतर्फे केला जातो. क्लबने बदलापूर जवळील एक गाव दत्तक घेतले होते आणि तिथे एक शाळा उघडली. तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण ही दिले. त्यात ‘फॅब्रिकेशन’, ‘ड्रायव्हिंग’, ‘नर्सिंग’, प्रथमोपचार इत्यादी व्यवस्था केली होती. गावासाठी सौरदिवे दिले. 2017 साली क्लबचे अध्यक्ष विनोद बारी असताना 54 गर्भवती महिलांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली होती. पर्यावरण संरक्षण हा क्लबचा मुख्य उद्देश होता. त्यासाठीच क्लबने पर्यावरण जागरूकता यासंदर्भात एक चर्चासत्र आयोजित केले होते.

 
 

या सेमिनारला मेनका गांधी यांनी उपस्थिती लावली होती. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे कृत्रिम तलाव वापरून विसर्जन आणि जनजागृतीसाठी विविध चर्चासत्रे आयोजित केली आहेत. ‘रेबीज’ निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून ‘रेबीज’ या रोगाविषयी जनजागृती केली जाते. डॉ. मनोहर अकोले यांच्या संकल्पनेतून गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत भटक्या कुत्र्यांचे ’रेबीज’ लसीकरण केले जाते. यावर्षी 1584 कुत्र्यांचे व मांजरांचे लसीकरण करण्यात आले आहे. अंत्यसंस्काराला जाण्यासाठी स्वर्गारोहण ही एक ‘व्हॅन क्लब’ने उपलब्ध करून दिली आहे. विविध सोयी असलेली ही ‘व्हॅन’ अखेरचा प्रवास चांगला व्हावा, या हेतूने बनविली गेली आहे.


 
 
‘रोटरी क्लब’ने संजय पाटील हे अध्यक्ष असताना अनिल हिरावत यांच्या संकल्पनेतून ‘रोटरी हेल्थ सेंटर’ची स्थापना केली. या सेंटरमध्ये लघवी, थुंकी, रक्त तपासणी केली जाते. दाताचा विभागदेखील आहे. फिजिओथेरपी केली जाते. तसेच डोळ्यांचा विभागदेखील आहे. महिन्याभरात 500 रुग्ण या सेवेचे लाभ घेतात. ही सेवा त्यांना अल्पदरात उपलब्ध करून दिली जाते. सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत हे सेंटर सर्वांसाठी खुले असते. नामांकित डॉक्टर याठिकाणी रुग्णांना सेवा देत आहेत. ‘कोविड’ काळात याठिकाणी ‘कोविड’ लसीकरणाची सोय करण्यात आली होती. क्लबला यापुढील काळातदेखील अनेक सामाजिक उपक्रम हाती घेऊन वाटचाल करायची आहे. ज्यात ‘टाटा मेमोरियल रुग्णालया’साठी कर्करोग निदान चाचणी बस पुरविणे, जिल्हा परिषद शाळेसाठी ‘टॉयलेट ब्लॉक’ बांधणे, शहापूर येथे शाळेची इमारत बांधणे, ‘रोटरी हेल्थ सेंटर’चे एका रुग्णालयामध्ये रुपांतर करणे इत्यादी काही प्रमुख प्रकल्प साकारण्याचा मानस आहे.



‘रोटरी इंटरनॅशनल’ अनेक उपक्रमांना निधी उपलब्ध करून देत असते. तसेच एखाद्या उपक्रमाला निधी कमी पडल्यास क्लबचे सदस्य न डगमगता स्वत: ते उपलब्ध करतात. या क्लबमध्ये 64 सदस्य आहेत. त्यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, वकील, उद्योजक, रिअल इस्टेट, निर्यातदार, खाद्य उद्योग, मीडिया, मेडिकल वस्तू, सीए, बांधकाम, पशुवैद्यक, आयटी, आर्किटेक्ट, औषध उद्योग, इन्शुरन्स, शिक्षण, प्रिंटिंग व इतर क्षेत्रांतील सदस्यांचादेखील समावेश आहे. ‘रोटरी’च्या सदस्यांना ‘रोटरीयन’ असे संबोधले जाते. सध्या क्लबची धुरा अध्यक्ष अजय कुलकर्णी, सचिव किशोर अढळकर, खजिनदार अनिल हिरावत, सहसचिव तेजल थोरवे यांच्या खांद्यावर आहे. क्लब या पुढील काळातसुद्धा विविध समाजोपयोगी कामे करीत राहील, अशी खात्री सर्व ‘रोटरीयन्स’ना आहे.





Powered By Sangraha 9.0