पुणे : नवभारताच्या निर्मितीसाठी युवकांनी इतिहासाच्या बरोबरीने साहित्य, लोककला, वास्तुशिल्प यासारख्या आदि बाबींचा अभ्यासपूर्ण मागोवा घेण्याची गरज आहे, असे मत लेखक आणि इतिहासकार डॉ. विक्रम संपथ यांनी आज येथे व्यक्त केले. डॉ. संपथ यांच्या ब्रेव्हहार्टस ऑफ भारत व्हीग्नीटीज फ्रॉम इंडियन हिस्ट्री या पुस्तकाचे प्रकाशन चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक संचालक आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
प्रसिद्ध लेखिका व माध्यम तज्ज्ञ शेफाली वैद्य यांनी मुलाखतीच्या माध्यमातून डॉ. संपथ यांच्याबरोबर संवाद साधला. या कार्यक्रमास चाणक्य मंडल परिवाराचे विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलाखती नंतर डॉ. संपथ यांच्याबरोबरील प्रश्नोत्तर कार्यक्रम देखील रंगतदार झाला. डॉ. संपथ यांचे हे तिसरे पुस्तक आहे. यापूर्वी त्यांनी स्वा, वि. दा. सावरकर यांचे चरित्र दोन खंडात लिहिले आहे. याखेरीज भारतीय शास्त्रीय गायिका गौहर जान यांचे चरित्र, वाडियार राजवंशाचा इतिहास आणि वीणा वादक एस बालाचंदर यांचे आत्मचरित्राचे लेखन केले आहे. त्यांना साहित्य अकादमीचा प्रथम युवा पुरस्कार मिळाला आहे, याचा मुलाखतकार शेफाली वैद्य यांनी आवर्जून उल्लेख केला.
या पुस्तकाच्या माध्यमातून अनेकविध घटनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे असे नमूद करून डॉ. संपथ यांनी सांगितले की, घडलेल्या घटनाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलत आहे. त्यावेळची शिक्षण पद्धती, सामाजिक रचना, नागरीकरण, लोककला, साहित्य, वास्तुशिल्प, कागदपत्रे, संस्थाने आणि आपला इतिहास अशा अनेक घटनांचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न आहे. किती लढाया आपण जिंकलो अथवा अयशस्वी झालो याबाबत कारणमीमांसा केली आहे. या लेखनाला संशोधांनाची जोड दिली आहे. मुळात भारत या संकल्पनेला व्यापक अशी पार्श्वभूमी आहे. ती आजच्या युवा पिढीने समजावून घेणे आवश्यक आहे. आजच्या काळातही त्यावेळची साहित्य, मौलिक कागदपत्र यांची जपणूक करून संशोधन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्याकाळात महिलांनी देखील तितकेच मोलाचे योगदान दिले आहे, त्याची नोद अभ्यासकांनी घेणे आवश्यक आहे.
आजच्या काळात नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे, असे स्पष्ट करून ते म्हणाले, सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. फेसबुक, ट्विटर यासारखी प्रभावी माध्यमे उपलब्ध झाली असून त्याचा देखील अभ्यासकानी उपयोग करावा. ज्या ज्या वेळी पुण्यात येतो त्यावेळी पुणेकरांनी अलोट प्रेम दिले याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.