माणसाने नुसतेच जगू नये, जगताना कर्तृत्व गाजवावे - आप्पा परब

19 Dec 2022 16:54:56

Chaturang Pratishthan's Jeevan Gaurav Award
 
 
 
 
डोंबिवली : कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले, कसे मरावे हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवले, तर उत्तरेकडून आलेले हिरवे वादळ कसे रोखावे हे राणी ताराबाई यांनी स्त्री शक्तीची ताकद दाखवून शिकवले. त्यामुळे नुसते जगण्यापेक्षा काहीतरी कर्तृत्व करुन जगा असे प्रतिपादन दुर्ग अभ्यासक आणि इतिहास संकलक - संशोधक लेखक बाळकृष्ण उर्फ आप्पापरब यांनी रविवारी डोंबिवलीत केले.
 
 
 
परब यांना चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले कलामंदिरात पार पडलेल्या चतुरंगच्या ३२ व्यारंगसंमेलनातआप्पापरब यांना जीवनगौरव पुरस्काराने दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख पोलिस आयुक्त सदानंद दाते यांच्याहस्तेगौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, रोख रक्कम आणि शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. आप्पांच्याकार्यकर्तृत्वाचा वेध घेणारी मान्यवरांचे लेख असलेली डायरीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. यावेळीपरबांच्या पत्नी अनुराधा, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, ज्येष्ठ पत्रकार विनायक परब, निवेदिका मंजिरी मराठे हे उपस्थित होते.
 
 
  
परब पुढे म्हणाले इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे सुक्ष्मदर्शी दृष्टीकोन असायला हवा. इतिहासाच्या प्रत्येक गोष्टीत काही कारणे लपलेली आहेत. ही याच दृष्टीकोनातून पहिली तर उलगडत जातात. प्रत्येकाने जीवनात असे काहीतरी कर्तव्य करावे, ज्यामुळे देशाचे, समाजाचे, संस्कृतीचे आणि स्वतःच्या घराण्याचे नाव उज्वल होईल. नुसते जगण्यापेक्षा काहीतरी कर्तृत्व दाखवून स्वतःला अजरामर करा, असा सल्ला दुर्गतपस्वीबाळकृष्ण सदाशिव तथा आप्पापरब यांनी दिला. ते पुढे असेही म्हणाले की, पाठांतरात मोठी शक्ति आहे हे सांगताना त्यांनी मुलांना पाठांतराची सवय लावा हे त्यांनी अपार असावे पाठांतर... संधीतची असावा विचार असे सुभाषितद्वारे कवी भूषण यांचे शिवाजी महाराजांवरील काव्य आपल्या मुलांकडून पाठांतर करून घ्यावे असा सल्ला त्यांनी दिला. स्त्री ही क्षणाची पत्नी तर अनंत काळाची माता असते हे मनाशी ठरवून प्रपंच ठरविला पाहिजे याकडे ही त्यांनी लक्ष वेधले.
 
 
 
तर इतक्या मोठ्या व्रतस्थव्यक्तीला आपल्या हस्ते पुरस्कार दिला गेला हे आपले भाग्य असल्याचे सदानंद दाते यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी मराठी संस्कृतीचा अभिमान टिकविण्याचे सर्वाधिक प्रयत्न याच शहरात झाल्याचे सांगत डोंबिवली शहराचा गौरव केला. प्रत्येकाकडे गुणाची एक खाण असल्याचे म्हणताना समृद्धीकडून सार्थकाकडे जाण्यासाठी समृद्ध समाज आणि सार्थक व्यक्ती निर्माण करण्याची प्रेरणा आप्पांच्या जीवनातून मिळत असल्याचे सांगत त्यांनी आप्पांच्या कार्याला वंदन केले.
 
 
छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचा इतिहास अभ्यासताना दंतकथेच्या मुळाशी लपलेल्या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत अचूक इतिहास पुढच्या पिढीसमोर ठेवणाऱ्याआप्पांचे कर्तृत्व फार कमी लोकांना माहीत आहे. ते महाराष्ट्रासमोर पोहोचावे या उद्देशाने त्यांची निवड केली, असे विनायक परब यांनी सांगितले. तर सुधीर जोगळेकर यांनी आप्पांच्या जीवन प्रवासावर दृष्टिक्षेप टाकताना त्यांना महत्वपूर्ण लोकाभिमुख कार्य करणाऱ्या पाच वेगवेगळ्या संस्थांकडून जीवन गौरव पुरस्कार देण्यात आल्याचे सांगितले.
 
 
चतुरंगची माहिती केतकी जोगळेकर, राजन देसाई यांनी शब्दांकित केलेल्या मानपत्राचे वाचन रंगकर्मी प्रसाद भिडे, आभारप्रदर्शन मेघना काळे व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ समीरा गुजर यांनी केले.
 
 
Powered By Sangraha 9.0