अन्ननिर्मितीचा पाया माती

    18-Dec-2022
Total Views |
soil


पृथ्वीवरील मानवाच्या लोकसंख्येपेक्षा एक चमचा मातीमध्ये जास्त सजीव आहेत. माती हे जीव, खनिजे आणि सेंद्रिय घटकांनी बनलेले एक अखंड जग आहे, जे त्यात वाढणार्‍या वनस्पतींद्वारे मानवाला आणि प्राण्यांना अन्न पुरवते. आपल्याप्रमाणेच, मातीला निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पोषक तत्वांचा संतुलित आणि वैविध्यपूर्ण पुरवठा आवश्यक आहे. प्रत्येक कापणीच्या वेळी कृषी प्रणाली पोषक द्रव्ये गमावतात आणि मातीचे शाश्वत व्यवस्थापन न केल्यास, सुपीकता हळूहळू नष्ट होते आणि मातीत पोषक तत्वांची कमतरता असली, तर कमकुवत वनस्पती तयार होते. या मातीचे खरे मोल सांगणारा हा लेख...


मातीची पोषकता नष्ट होणे ही मातीची झीज होण्याची एक मोठी प्रक्रिया आहे, ज्यामुळे वनस्पती व जीवजंतू यांना मातीद्वारे मिळणारे पोषण धोक्यात येते. जगभरातील मातीचा होणार नाश व त्यामुळे अन्नसुरक्षा आणि शाश्वत विकास प्रणालीला असलेला धोका, जागतिक स्तरावरील सर्वात गंभीर समस्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. गेल्या ७० वर्षांमध्ये, अन्नातील जीवनसत्त्वे आणि पोषक घटकांची पातळी कमालीची कमी झाली आहे आणि असा अंदाज आहे की, जगभरातील दोन अब्ज लोक सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेने ग्रस्त आहेत. यालाच ‘अदृश्य भूक’ म्हणून ओळखतात. मातीच्या र्‍हासामुळे काही ठिकाणची माती, पिकांना आधार देण्यास पोषक उरलेली नाही, तर काही मातींमध्ये पौष्टिक घटकांचे प्रमाण जास्त असते, जे वनस्पती आणि प्राण्यांसाठी विषारी परिणाम दाखवत आहे आणि पर्यावरण प्रदूषित करते आणि यानेच हवामानात बदल दिसून येऊ लागले आहेत.
 
जगभरात ५ डिसेंबर रोजी, जागतिक मृदा दिवस २०२२ (World Soil Day) साजरा केला गेला आहे. यावर्षी, ‘माती: जेथे अन्न सुरू होते’ (Soil: Where Food begins) या थीमच्या अंतर्गत, या वर्षीच्या मोहिमेचाउद्देश माती व्यवस्थापनातील वाढत्या आव्हानांना संबोधित करून, मातीच्या संबंधांतली जागरूकता वाढवून आणि समाजाला प्रोत्साहित करून, निरोगी पर्यावरण प्रणाली आणि मानवी कल्याण रक्षणाविषयी जागरुकता वाढवणे हे आहे.तुमच्यापैकी काही जणांना ठाऊक असेल की, ५ डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय माती दिवस’ अर्थात ‘इंटरनॅशनल सॉइल डे’ आहे. जागतिक मृदा दिवस (WSD) दरवर्षी ५ डिसेंबर रोजी निरोगी मातीच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि मृदा स्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित केला जातो. २००२ साली ‘इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉईल सायन्सेस’ (खणडड) नेमातीचे महत्त्व पटवून देण्यासाठी या आंतरराष्ट्रीय दिवसाची शिफारस केली होती.

थायलंडच्या नेतृत्वाखाली आणि जागतिक मृदा भागीदारी (ग्लोबल सॉइल पार्टनरशिप) च्याअंतर्गत संयुक्त राष्ट्र खाद्य एवं कृषी संघटन (फूड अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरल ऑर्गनाइज़ेशन) ने जागतिक पातळीवर माती संबंधी जागरूकता वाढवणारे व्यासपीठ म्हणून ‘डब्ल्युएसडी’च्या स्थापनेला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. ऋज परिषदेने जून २०१३ मध्ये जागतिक मृदा दिनाला एकमताने मान्यता दिली आणि ६८व्या संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेत अधिकृतपणे स्वीकारण्याची विनंती केली. डिसेंबर २०१३ मध्ये, संयुक्त राष्ट्र महासभेने दि. ५ डिसेंबर, २०१४ हा पहिला अधिकृत जागतिक मृदा दिवस म्हणून घोषित केला.पर्यावरण रक्षणाचा विचार करताना मातीकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे. वायूप्रदूषण, जलप्रदूषण तसेच ध्वनीप्रदूषण यांसारख्या विषयांना मिळालेली प्रसिद्धी माती प्रदूषणाला मिळालेली नाही.

 तथापि, माती आणि जमिनीच्या पातळीवरील प्रदूषण हा सर्व प्रकारच्या प्रदूषणाचा अविभाज्य भाग आहे. एक साधे उदाहरण द्यायचे झाले तर, मातीतून पोषणद्रव्ये बाहेर निघून जाणे (लिचिंग) हा जसा जल आणि भूजल प्रदूषणाचा भाग आहे तसाच माती प्रदूषणाचा आणि मातीचा र्‍हास होण्याचेदेखील प्रमाण आहे. माती या नैसर्गिक संसाधनामध्ये २५ टक्के जागतिक जैवविविधता आहे आणि सुमारे ९० टक्के सजीव त्यांच्या जीवनचक्राचा काही भाग मातीत घालवतात. माती वन्यजीव आणि पाळीव पशुधनासह जमिनीवरील प्राण्यांच्या जैवविविधतेला आधार देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मातीचे सर्वात विस्तृत कार्य म्हणजे अन्न उत्पादनासाठी तिचे असलेले महत्त्व, असा अंदाज आहे की, आपले ९५ टक्के अन्न प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जमिनीवर अवलंबून असून, विशिष्ट मातीमध्येच तयार होते. निरोगी माती आपल्या अन्न-उत्पादक वनस्पतींना वाढण्यासाठी आणि त्यांच्या भरभराटीसाठी आवश्यक पोषक, पाणी आणि ऑक्सिजन पुरवते.

soil


माती ही नैसर्गिक आणि व्यवस्थापित जंगलांच्या, गवताळ प्रदेशांच्या तसेच फूल व फळबाग लागवडीसाठीव या सगळ्याच्या निरंतर वाढीसाठी व देखभालीसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. निरोगी आणि साधनसंपत्तीने समृद्ध अशी माती निसर्गासाठी एखाद्या अनमोल उपहारासारखी असते. भारताच्या एकूण भूभागाच्या २९ टक्के भागावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मातीचा र्‍हास झालेला आहे, अशी माहिती २०२२ मधल्या एका संशोधनातून समोर आलेली आहे. यामुळे कृषी उत्पादकता, जैवविविधता संवर्धन, पाण्याची गुणवत्ता आणि जमिनीवर अवलंबून असलेल्या समुदायांचे सामाजिक-आर्थिक कल्याण धोक्यात आले आहे. जवळपास ३.७ दशलक्ष हेक्टर जमिनीच्या पोषकतेचे तत्वांच्या निघून जाण्याने या जनिमीच्या पोषकतेचे नुकसान झाले आहे, असे या संशोधनातून समजले.

माती प्रदूषण आणि मातीची झीज होण्यास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असणारे अनेक घटक आहेत. मातीच्या र्‍हासाला कारणीभूत ठरणारे मुख्य चालक म्हणजे औद्योगिक उपक्रम, खाणकाम, कचरा प्रक्रिया, शेती, जीवाश्म इंधन काढणे आणि प्रक्रिया वाहतूक उत्सर्जखते आणि कीटकनाशकांचा अतिवापर आणि दूषित सांडपाण्याने सिंचन यामुळेही माती प्रदूषित होत आहे. निकृष्टतेमध्ये नेहमी मातीतील पोषक तत्वांचाही समावेश होतो. मातीची धूप, वाहून जाणे, लीचिंग आणि पिकांचे अवशेष जाळणे यापासून जमिनीतील पोषक घटकांच्या नुकसानामागील कारणे आहेत. आज, पोषक तत्वांची हानी आणि प्रदूषणामुळे मातीत धोका निर्माण होतो आहे आणि त्यामुळे जागतिक स्तरावर पोषण आणि अन्नसुरक्षा कमी होत आहे. म्हणूनच, मातीची झीज आणि प्रदूषणाचे सर्व प्रकारांचे परिणाम दूरगामी आहेत आणि मानवी आणि परिसंस्थेच्या आरोग्यावर त्याचे कायम स्वरूपी परिणाम होऊ शकतात.

चांगली बातमी अशी आहे की, भारताकडे उत्तम मृदा संवर्धन धोरण आहे. चला पाहुया आपण काय करतोय. सर्वप्रथम, भारत सरकार मृदा संवर्धनासाठी पाच-मार्गी धोरण राबवत आहे. ज्यामध्ये माती रसायनमुक्त करणे, मातीची जैवविविधता वाचवणे, सॉईल ऑर्गेनिक मॅटर वाढवणे, जमिनीतील ओलावा राखणे, मातीची झीज कमी करणे आणि मातीची धूप रोखणे यांचा समावेश आहे.



soil profile


दुसरे महत्त्वाचे धोरण म्हणजे मृदा आरोग्यकार्ड (SHC) योजना सुरू करणे. पूर्वी, शेतकर्‍यांना मातीचा प्रकार, मातीतील पोषणातील कमतरता आणि जमिनीतीलआर्द्रता यासंबंधी माहिती नसायची. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, भारत सरकारने २०१५ मध्ये ‘सॉइल हेल्थ कार्ड’ (SHC) योजना सुरू केली. याचा वापर मातीच्या आरोग्याच्या सद्यःस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि कालांतराने मातीच्या आरोग्यातील बदल निर्धारित करण्यासाठी केला जातो. (SHC) माती आरोग्य निर्देशक आणि संबंधित वर्णनात्मक संज्ञा प्रदर्शित करते, जी शेतकर्‍यांना आवश्यक सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन करते. मातीची धूप रोखण्यासाठी, नैसर्गिक वनस्पतींचे पुनरुत्पादन, पावसाच्या पाण्याचे संचयन आणि भूजलाचे पुनर्भरण राखण्यासाठी इतर समर्पक उपक्रमांमध्ये ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन’ योजना यांचा समावेश होतो.

याशिवाय, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अर्थात ‘नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल अ‍ॅग्रिकल्चर’ (NMS­)कडे सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती यासारख्या पारंपरिक देशी पद्धतींना प्रोत्साहन देणार्‍या योजना आहेत, ज्यामुळे रसायने आणि इतर कृषी गोष्टींवरील अवलंबित्व कमी होते आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांवरील आर्थिक भार कमी होतो. युनायटेड नेशन्सची अन्न आणि कृषी संघटना (F­O) शाश्वत कृषी खाद्य प्रणालींना चालना देण्यासाठी मृदा संवर्धनाच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी अनेक उपक्रम राबवते. याचबरोबर F­O 'नॅशनल रेनफेडएरिया अ‍ॅथॉरिटी’ आणि ‘कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय’ (Mo­FW) सोबत ‘डेटा अ‍ॅनालिटिक्स’वापरून फॉरकास्टिंग साधने विकसित करण्यासाठी सहयोग करत आहे. जे असुरक्षित शेतकर्‍यांना पिकांवर माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करेल.

या सगळ्यावरून मला ठाऊक आहे आपल्या लक्षात आलेच असेल की, मातीचे मोल मोजण्यास इतके सोपे नाही. पर्यावरणासाठी असलेल्या अनेक संवर्धन धोरणांमध्येदेखील, माती हा दुर्लक्षित पैलू दिसून येतो. परंतु, मातीवरील आपले अवलंबित्वाचा विचारात केला, तर माती, ही एक प्राथमिक गोष्ट आहे ज्याचे संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. माती केवळ वन्यजीव, वनस्पती आणि जीवजंतूंचा आधार बनत नाही, तर आपल्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भागदेखील बनते. कारण, आपले अन्न, निवासस्थान आणि आपल्याला आवश्यक असलेल्या इतर पर्यावरणीय सेवा प्रामुख्याने मातीद्वारे प्रदान केल्या जातात.चला तर मग या मातीचा आदर करण्याचे व्रत घेऊया आणि तिच्या महिमेचा प्रसार करून तिचे अधोगतीपासून रक्षण करूया.!



-डॉ. मयूरेश जोशी



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.