नवी दिल्ली : पाकिस्तान हा देश अमेरिकेत झालेल्या ‘9/11’ हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनला आश्रय देणारा देश असल्याचे वस्तुनिष्ठ विधान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले होते. हे विधान पाकिस्तानाच्या जिव्हारी लागले असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करून उभय देशांतील संबंधात तेल ओतण्याचेच काम केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार्या पाकिस्तानला जयशंकर यांनी फटकारले होते. भारताकडून करण्यात आलेल्या विधानाला उत्तर देताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका केली. त्यामुळे वाद निर्माण झाला असून भाजपच्या वतीने दिल्लीत पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर शुक्रवारी आंदोलन कऱण्यात आले.
बिलावल भुट्टो संयुक्त राष्ट्रांच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत. भुट्टो असेही म्हणाले की, मोदी पंतप्रधान होईपर्यंत त्यांच्यावर अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी होती. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परराष्ट्रमंत्री आहेत. रा.स्व.संघ म्हणजे काय? हिटलरच्या ’एसएस’पासून रा.स्व.संघाने प्रेरणा घेतल्याचं वादग्रस्त विधानही बिलावल भुट्टो यांनी केल.
दरम्यान, बिलावल भुट्टो यांच्या विधानाविरोधात देशाची दिल्ली येथील पाकच्या उच्चायुक्तालयासमोर भाजप कार्यकर्त्यांतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव आणि युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्यादेखील सहभागी झाले होते.
पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी 1971 साली बंगालीभाषकांसह हिंदूचा केलेला नरसंहार बिलावल भुट्टो यांनी आठवावा. त्याद्वारे अल्पसंख्याकांविषयी पाकचे धोरण अद्याप बदलले नसल्याचे दिसून आले आहे, अशा शब्दात परराष्ट्र मंत्रालयाने पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांना सुनावले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, “दहशतवादाचा बिमोड करण्याचा मुद्दा हा सर्वच जागतिक व्यासपीठांवर ऐरणीवर आहे. दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना प्रायोजित करणे, त्यांना आश्रय देऊन वित्तपुरवठा करणे यामध्ये पाकचा सहभाग असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांचे असभ्य वक्तव्य हे पाकच्या अपयशाचे द्योतक आहे. न्यूयॉर्क, मुंबई, पुलवामा, पठाणकोट आणि लंडन ही शहरे पाकिस्तान प्रायोजित, समर्थित आणि भडकावलेल्या दहशतवादाचे बळी ठरले आहेत. त्यामुळे जगभरात निर्यात होणारा ‘मेक इन पाकिस्तान’ दहशतवाद थांबवावाच लागेल,” असे बागची यांनी म्हटले आहे.