पत्राचाळ घोटाळ्यात एकशे तीन दिवस कारागृहाची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या संजय राऊतांच्या भाषेत आता तरी बदल होईल, अशी अपेक्षा महाराष्ट्रातील तमाम जनतेला होती. पण, ती अपेक्षा पूर्णतः मूर्खतेची होती आणि त्यातून जनतेच्या अपेक्षांचा पूर्णतः भंग राऊतांनी करून दाखवला आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राला संविधान देणार्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म ठिकाणावरून राऊतांनी अकलेचे जे काही तारे तोडले आहेत, ते केवळ राऊतांनाच शक्य आहे. बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाला असे म्हणून राऊतांनी आपल्या घसरलेल्या जिभेचा आणि मानसिकतेचा नमुना सप्रमाण दाखवून दिला आहे. पण, राऊतांच्या या वटवटीवर मराठीतील बहुतांश माध्यमे आणि वृत्तवाहिन्यांनी चकार शब्द न काढता यावर अप्रत्यक्षपणे पांघरूण घालण्याचाच प्रयत्न केला आहे. या उलट भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवरायांच्या संदर्भात दिलेल्या दाखल्यांवरून मात्र याच माध्यमांनी त्यांचा फक्त कडेलोट करणे बाकी ठेवले होते. संजय राऊत कधी बाबासाहेबांच्या जन्मस्थळावरून बरळतात, कधी मराठा क्रांती मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून मराठा भगिनींच्या अब्रूची लक्तरे व्यंगचित्राच्या माध्यमातून वेशीला टांगतात, कधी एखाद्या अभिनेत्रीला हरामखोर म्हणून त्याचे ‘नॉटी’ म्हणून समर्थन करतात, तर आपल्या विरोधात गेलेल्या महिला आमदारांना वेश्या म्हणून संबोधित करतात. सभ्यता आणि संस्कृतीचा कसलाच संकेत राऊत पाळत नाहीत आणि त्यांनी तो पाळावा म्हणून तशी आज्ञा देणारा पक्षप्रमुखही राऊतांच्याच सुदैवाने त्यांना लाभला नाही, त्यामुळे राऊतांचे बरळणे आणि आपल्या भोंगळपणाचे प्रदर्शन करणे हे नित्याचेच बनले आहे. पण खरंतर स्वतःविश्वप्रवक्ते असलेल्या राऊतांना आवरणं गरजेचं आहे. कारण या महाराष्ट्राला असल्या निर्लज्जपणाची आणि असभ्य राजकारणाची कधीच गरज नव्हती. त्यामुळे जर ठाकरे गटाच्या प्रमुखांनी राऊतांना पायबंद घातला नाही, तर एकेदिवशी जनताच रस्त्यावर उतरून त्यांचा कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही याची दखल ठाकरेंनी घेणे आवश्यक आहे, अन्यथा...
‘पुरी कायनात तुम्हे डुबाने में लगी हैं’
काही महिन्यांपासून देशात एका वेगळ्याच मोहिमेला वेग आला आहे. ही मोहीम ना कुठल्या राजकीय पक्षाने सुरू केली ना ही कुठल्या समाजावर प्रभाव टाकणार्या मोठ्या सेलिब्रिटींचा यात सहभाग आहे. देशातील हिंदी चित्रपट सृष्टीला स्वतःच्या पितृवर्यांची जहागीर समजून आपल्याला हवे तसे अजेंडे रेटण्याची धटींगबाजी करणार्या काही सो कॉल्ड बादशाह आणि भाईंना या मोहिमेने पार्श्वभागावर लाथा घातल्या आहेत. कलाविष्कार आणि चित्रपट निर्मितीसाठी वापरण्यात येणार्या ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ या गोड शब्दाआडून हिंदू संस्कृती आणि हिंदुत्वाला ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न करणार्या या बांडगुळांना ‘बॉयकॉट’ मोहीम राबवून, त्यांचे चित्रपट पायदळी तुडवून थोडक्यात काय तर हिंदू संस्कृतीची बदनामी करणार्या कलाकृतींवर बहिष्कार घालण्याचा ‘ट्रेंड’ म्हणजेच एक चळवळ समाजमाध्यमांवर सुरू झाली आणि बघताबघता निम्मी बॉलिवूड इंडस्ट्री आता हळूहळू का होईना पण या गोष्टी स्वीकारायला लागली आहे. पण शाहरुख खान आणि त्याच्यासारखी स्टारडमचा अहं असलेली मंडळी आजही आपल्या गेलेल्या बादशाहीच्या खोट्या तोर्यात इतकी मश्गुल आहेत की अजूनही त्यांना बदललेल्या वातावरणाचा अंदाजच आलेला नाही. एकतर शाहरुखच्या चिरंजीवाने ड्रग्ज प्रकरणात करून ठेवलेली घाण निस्तरताना त्याला पळता भुई थोडी झाली होती, असे असूनही ‘पठाण’ या शाहरुखच्या नव्या सिनेमात दीपिकाने घातलेल्या (?) कपड्याच्या रंगावरून आता वाद निर्माण झाला आहे. त्यावर बोलताना शाहरुखने आपल्याला अशा वादांमुळे काहीही परिणाम होणार नसल्याचे उन्मत्त उत्तर दिले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हिंदी चित्रपटांमधून हिंदू संस्कृतीला ‘टार्गेट’ करण्याच्या मोहिमेत शाहरुखनेदेखील हात धुवून घेतले होते. पण काही वर्षांपासून शाहरुखची बादशाहत खाली होत असूनही त्याला वस्तुस्थितीचे भान राहिलेले नाही आणि त्यातून तो त्याच चुका पुन्हा पुन्हा करतो आहे हे निर्विवाद आहे. त्यामुळे प्रेक्षकांसह पुरी कायनात ‘तुम्हे डुबाने में लगी हैं’ अशी स्थिती निर्माण होऊनही लोकप्रियतेच्या मदांध भावनेत मश्गुल असलेल्या मंडळींना कोण वाचविणार हे देवालाच ठाऊक...