ऑपरेशन जॅकपॉट : अज्ञात कमांडो कारवाई

16 Dec 2022 19:27:06
Operation Jackpot


१६ ऑगस्ट ते १६ डिसेंबर १९७१ या कालखंडात या कमांडो टोळ्यांनी पाकिस्तानी १५ पुरवठा जहाजं, ११ कोस्टर्स जहाजं, सात गनबोट्स, ११ बार्जेस, २ टँकर्स, १९ रिव्हर क्राफ्ट्स अशा ६५ नौदलीय जहाजांवर एकूण १२६ जहाजं बुडवली.


भारत हा कधीच एक राष्ट्र नव्हता, तर तो अनेक राष्ट्रांचा समूह होता, असं काही लोकांचं म्हणणं आहे, असो बापडं!अन्न हे तोंडाद्वारे खाल्लं न जाता गुदद्वारावाटे खाल्लं जातं, असं कुणाचं म्हणणं असेल, तर त्याला आपण काय करणार? लोकशाही व्यवस्थेत कुणीही काहीही म्हणू शकतो.पण झालंय काय की, ही अशी विपरित आणि विकृत मांडणी करणार्‍या लोकांना आपल्याकडे विचारवंत म्हटलं जातं. प्रचार-प्रसार, साहित्य, नाट्य, चित्रपट अशा बौद्धिक-वैचारिक क्षेत्रांत त्यांचा प्रचंड दबदबा होता. आधी प्रिंट मीडिया आणि आता इलेक्ट्रॉनिक मीडिया जवळपास पूर्णपणे त्यांच्याच ताब्यात होता, आजही आहे.१९४७ साली भारत खंडित स्वरूपात का होईना, एक देश-एक राष्ट्र बनला, हे त्यांना आजही सहन होत नाही. त्यांना भारताची पुन्हा शकलं उडवायची आहेत. अशाच एका भारतद्रोही इसमाच्या मूळ इंग्रजी आत्मचरित्राच्या मराठी भाषांतराला मिळालेल्या नि रद्द झालेल्या बक्षिसावरून सध्या गदारोळ चालू आहे. ‘लव्ह जिहाद’मुळे हादरलेल्या आणि किंचित जागृत झालेल्या हिंदू समाजाचं लक्ष मुद्द्यावरून इतरत्र वळवण्यासाठी हे उद्योग असू शकतात.

भारत एक आहे, तो एक राहिला पाहिजे, बलशाली झाला पाहिजे. उलट त्याच्या शत्रूचे तुकडे उडाले पाहिजेत, यासाठी प्राणांची बाजी लावलेल्या भारतीय नौदल सैनिकांच्या एका कारवाईची आपण इथे माहिती घेऊया. नुकताच नौदल सप्ताह पार पडला आहे. आपणा सर्वसामान्य भारतीयांना सैन्य आणि सैनिक यांच्याबद्दल कमीत कमी माहिती असते. त्यातून नौदलाबद्दल तर आणखीनच कमी माहिती असते. कारण, मुद्दामच ती करून दिली जात नाही. सैन्याबद्दल माहिती झाली, सैनिकांच्या शौर्याच्या, पराक्रमाच्या कथा ऐकून भारतीयांचे बाहू स्फुरण पावू लागले, मनगटं शिवशिवू लागली, मनं दिग्विजयाच्या कल्पनांनी भारुन गेली, मेंदू शत्रूवर मात करण्याच्या नवनवीन युक्त्या प्रसवू लागले तर? छे...छे! असं होता कामा नये. मग भारताच्या शत्रूंनी कुठे बरं जावं? ती का माणसं नाहीत? यांना का मनं नाहीत? तेव्हा भारतीय समाजाला म्हणजे हिंदूंना पराक्रमाच्या वाटा दाखवूच नका.

तुमच्यात जाती- भाषा-प्रांत यावरुन कसे भेद आहेत, हेच त्यांच्या जाणिवेवर सतत ‘हॅमर’ करीत राहा. शिवाय त्यांच्या मनबुद्धीला मोह पाडण्यासाठी चित्रपटांची मायावी दुनिया आणि क्रिकेटचा वेळखाऊ खेळ आहेच. त्यात त्यांना गंतवून ठेवा. थोडक्यात आपण सिंह आहोत, ही जाणीव त्यांना हाता कामा नये.असो. आपण ‘ऑपरेशन जॅकपॉट’कडे वळूया. कारण, त्या सगळ्या घटनांना ५० वर्षं झाली आहेत. भारतीय नौदलाने ‘मुक्ति बाहिनी’ या पूर्व पाकिस्तानी गनिमी सैन्याला प्रशिक्षण देऊन ही कारवाई यशस्वी केली होती. याला दुसर्‍या महायुद्धातील ‘मिनिस्ट्री ऑफ अनजन्टलमेनली वॉरफेअर’ची पार्श्वभूमी होती. असभ्य माणसाचं युद्धखातं म्हणजे नेमकं काय?सप्टेंबर १९३९मध्ये हिटलरने युरोपातला एकेक देश ताब्यात घ्यायला सुरुवात केली. ब्रिटनचा शांततावादी पंतप्रधान नेव्हिल चेंबर्लेन नाना प्रकारे हिटलरशी समझोत्याची बोलणी करुन युद्ध टाळायला बघत होता. पण, हिटलरला शांतता नकोच होती. अखेर मे १९४० मध्ये चेंबर्लेनने राजीनामा दिला आणि विन्स्टन चर्चिल पंतप्रधान बनला.

हिटलर पुन्हा एकदा युद्ध पेटवणार, हे चर्चिलने १९३३ सालीच ओळखलं होतं. त्यामुळे काय करायचं याचे त्याचे आराखडे तयारच होते. त्याने भराभर चक्रं फिरवायला सुरुवात केली. जुलै १९४० मध्ये त्याने ‘स्पेशल ऑपरेशन एक्झिक्युटीव्ह’उर्फ ‘एसओई’हे एक गुप्त खातं किंवा गुप्त सैन्य निर्माण केलं. खुद्द ब्रिटनसह इतरही युरोपीय देशांमधलं एकंदर १३ हजार लोक यात भरती करण्यात आले. या १३ हजारांत तीन हजार २०० महिला होत्या. हिटलरने व्यापलेल्या सर्व छोट्या-मोठ्या युरोपीय देशांमध्ये जर्मन सैन्याने स्थानिक हस्तकांची सरकारं स्थापन केली होती किंवा जर्मन सेनापतीच प्रशासन चालवीत होते.‘एसओई’च्या हस्तकांचं काम हेच की, त्यांनी या स्थानिक वा सैनिकी सरकारांना हैराण करून सोडायचं. त्यासाठी सतत छोट्या-मोठ्या विध्वंसक कारवाया करत राहायच्या. पूल उडवायचे, रस्ते बंद करायचे, रेल्वे रूळांच्या ‘फिश प्लेट्स’ काढायच्या. सिग्नल यंत्रणा बंद पाडायची. चुकीचे संदेश पाठवायचे. मोक्याच्या जागेवर काम करणार्‍या माणसांना फितवायचं किंवा सरळ ठार मारायचं.

 जर्मन सैन्याला दारूगोळा, धान्य, पाणीपुरवठा करणार्‍या वाहनांना अपघात घडवून आणायचे. त्यांची बिनतारी संदेश यंत्रणा बंद पाडायची. जमेल त्या मार्गाने जर्मनांना सतत चावे घेउन हैराण करीत राहायचं. सभ्य सैनिकांप्रमाणे खुल्लमखुल्ला समोरासमोर लढाई न करता, गुप्तपणे हे सर्व करायचं, म्हणून त्या गुप्त खात्याचं टोपणनाव ‘असभ्य माणसांचं युद्घखातं.’ चर्चिलच्या या ‘एसओई’ने खरोखरच नाझी सैन्याला हैराण करून सोडलं होतं. १९४५ साली महायुद्घ संपल्यावर १९४६ साली हे खातं बंद करण्यात आलं. या खात्यात सैन्यातले तरबेज कमांडोज् तर होतेच, पण सामान्य नागरिक आणि कित्येक कुप्रसिद्घ गुंडसुद्घा होते. चोर्‍या, घरफोडी, तिजोर्‍या उघडणं वगैरे त्यांच्या कौशल्याचा नाझींविरोधात उत्तम उपयोग करून घेण्यात आला. ‘एसओई’च्या पराक्रमगाथा आज ७५ वर्षांनंतरही ब्रिटनमध्ये मोठ्या अभिमानाने गायल्या जातात. भारतीय सैन्याच्या अशा पराक्रमगाथा खुद्द भारतातच अज्ञात ठेवल्या जातात.

१९७०च्या अखेरीस पाकिस्तानात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. तिच्यात पूर्व पाकिस्तानातला राजकीय पक्ष अवामी लीग याने स्पष्ट बहुमत मिळवलं. म्हणजे आता अवामी लीगचं केंद्र सरकार येणार आणि त्या पक्षाचा नेता शेख मुजिबूर रेहमान हा पंतप्रधान बनणार, हे पश्चिम पाकिस्तानातल्या पंबाजी मुसलमानांना सहन होईना. पाकिस्तानचा हुकुमशहा जनरल याह्याखान याने शेख मुजिबच्या हाती सत्ता सोपवण्याऐवजी त्याला अटक केली आणि जनरल टिक्काखान याच्या हाताखाली पाऊण लाख सैनिकांना पूर्व पाकिस्तानात पाठवलं. २५ मार्च १९७१ला या सैन्याने प्रथम राजधानी ढाका शहरात आणि मग संपूर्ण पूर्व पाकिस्तान प्रांतात कत्तली आणि बलात्कार यांचा हैदोस घालायला सुरुवात केली. २७ मार्चपासून पूर्व पाकिस्तानातून निर्वासितांचे लोंढे भारतात येऊ लागले.

मार्च १९७१च्या सुरुवातीलाच भारतात सार्वत्रिक निवडणुका होऊन इंदिरा गांधींचा ‘काँग्रेस रिक्विझिशनिस्ट’ उर्फ ‘नव काँग्रेस’ हा पक्ष प्रचंड बहुमताने विजयी झाला होता. इंदिरा गांधींच्या नव्या मंत्रिमंडळात बाबू जगजीवनराम हे संरक्षणमंत्री, तर सरदार स्वर्णसिंग हे परराष्ट्रमंत्री होते.पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्या संघर्षात भारत अपरिहार्यपणे ओढला जाणार म्हटल्यावर इंदिराजींनी सेनाप्रमुख जनरल सॅम माणेकशा यांना लगेचच सैनिकी कारवाई करण्याबाबत विचारणा केली. माणेकशांनी अत्यंत व्यवहार्य सल्ला दिला. त्यांच्या म्हणण्याचा आशय असा की, आता पावसाळा तोंडावर आहे. पूर्व पाकिस्तान हा अत्यंत सपाट, सखल प्रदेश आहे. तिथे छोट्या-मोठ्या नद्या, नाले आणि कालवे मिळून एकंदर तीनशेहून अधिक जलप्रवाह आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पूर्व पाकिस्तान हा कमालीचा चिखल-दलदलयुक्त प्रदेश बनतो. अशा प्रदेशात लष्कर, चिलखती गाड्या आणि रणगाडे घुसवणं, हा शुद्घ मूर्खपणा ठरेल. तेव्हा नोव्हेंबरपर्यंत कळ काढा. पावसाळा संपल्यावर आपण प्रत्यक्ष सैनिकी हालचाली करू. तोपर्यंत काय करा? तर पूर्व पाकिस्तानात हैदोस घालणार्‍या पाउण लाख पाकस्तानी सैन्याला गमिनी काव्याने चावे घेऊन हैराण करून सोडा.

या सैन्याला धान्य, दारूगोळा, शस्त्रास्त्र यांची रसद कुठून मिळत होती? तर पूर्व पाकिस्तानच्या दक्षिणेकडच्या चित्तगांव (बंगालीत चित्तगाँग), चांदपूर, नारायणगंज आणि मंगला (बंगालीत मोंगला) या बंदरांमधून मिळत होती. पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्यामध्ये भारताचा १६०० किमी प्रदेश होता. भारताने जमीन आणि हवाई दोन्ही मार्ग बंद केल्यामुळे जलमार्गाशिवाय दुसरा पर्यायच पाकिस्तानकडे नव्हता. या बंदरांच्या परिसरात सतत घातपात आणि विध्वंस घडवून पाकिस्तानी सैन्याची रसद मारायची.तुलाँ या फ्रान्समधल्या बंदरात एक पाकिस्तानी पाणबुडी उभी होती. पूर्व पाकिस्तानमधल्या कत्तलींच्या वार्ता सर्वत्र पसरल्यावर त्या पाणबुडीवरच्या नऊ पूर्व पाकिस्तानी कर्मचार्‍यांनी पळून जाऊन जीनिव्हामधल्या भारतीय वकिलातीत आश्रय घेतला. त्या सर्वांना एप्रिलमध्ये भारतात आणण्यात आलं. भारतात परागंदा बांगलादेश सरकार स्थापन झालंच होतं. त्याचा सैन्यप्रमुख म्हणून कर्नल मुहम्मद अताउल गनी उस्मानी याची नियुक्ती झाली होती. पाकिस्तानी सैन्यातून पळालेले बंगाली अधिकारी सैनिक आणि अनेक नागरिक यांचे सैन्य म्हणून ‘मुक्ति बाहिनी’ स्थापन झाली होती.

पश्चिम बंगालमध्ये दोन बिहार, आसाम, त्रिपुरा नि मेघालयमध्ये प्रत्येकी एक अशा एकूण सहा छावण्यांमध्ये भारतीय लष्कर अधिकारी या ‘मुक्ति बाहिनी’वाल्यांना लष्करी प्रशिक्षण देत होते.तशीच एक प्रशिक्षण छावणी प्लसी उर्फ पलाशी या ठिकाणी उघडण्यात आली. भारतीय नौदल अधिकारी कमांडर सामंत आणि लेफ्टनंट कमांडर मार्टिस यांच्या नेतृत्वाखाली एकूण २० नौदल कमांडोंनी पाकिस्तानी पाणबुडीतून पळालेले नऊ जण आणि कर्नल उस्मानीने पाठवलेले १०० लोक यांना जहाजं, गलबतं, होड्या यांना कसा घातपात घडवून आणावा, याचं प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. हळूहळू या छावणीतील विद्यार्थ्यांची संख्या ४९९ वर गेली. या छावणीचं गुप्त नाव होतं, ‘सीटूपी.’ ऑगस्ट १९७१ पासून या प्रशिक्षित कमांडो तुकड्यांच्या प्रत्यक्ष कार्याला सुरूवात झाली. ३ ऑगस्ट १९७१ या दिवसापासून या तुकड्या ठरलेल्या मार्गांनी चितगाव, चांदपूर, नारायणगंज आणि मंगला या बंदराच्या दिशेने रवाना झाल्या. सर्व तुकड्या नियोजित स्थळी पोहोचल्या हे समजण्यासाठी भारतीय सैन्याने एक फारच रसिक कल्पना लढवली. दि. १३ ऑगस्ट आणि १४ ऑगस्ट या दिवशी आकाशवाणीवर दोन लोकप्रिय बंगाली गाणी वाजवण्यात आली. कमांडो तुकड्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्या. हे त्यांना एकमेकांना नि संबंधितांना कळल्याचा इशारा होता.

१६ ऑगस्ट ते १६ डिसेंबर १९७१ या कलखंडात या कमांडो टोळ्यांनी पाकिस्तानी १५ पुरवठा जहाजं, ११ कोस्टर्स जहाजं, सात गनबोट्स, ११ बार्जेस, २ टँकर्स, १९ रिव्हर क्राफ्ट्स अशा ६५ नौदलीय जहाजांवर एकूण १२६ जहाजं बुडवली. त्यांच्यात किमान एक लाख टन एवढा माल, ज्यात दारूगोळा, अन्नधान्य आणि इतर सैन्योपयोगी साहित्य होतं, ते साफ बुडालं. अनेक जेट्टी, धक्के-कालवे वाहतुकीसाठी नादुरूस्त करण्यात यश आलं. हे करताना आठ कमांडो ठार झाले, ३४ जखमी झाले, तर १५ पकडले गेले. पूर्व पाकिस्तानमधल्या पाक नौदलाच्या हालचाली मुश्किल करून सोडायच्या, हा ‘ऑपरेशन जॅकपॉट’चा उद्देश पूर्णपणे सफल झाला.सहज मनात येतं, भारतीय सेनापती अशा रीतीने शत्रूचे तुकडे उडवत असताना आम्ही सर्वसामान्य भारतीय काय करीत होते. आम्ही झीनत अमान ही त्यावेळची नवी नटी ‘दम मारो दम’असं म्हणून गांजा फुंकते, ते बघायला झुंडीने जात होतो नि भारतीय क्रिकेट संघाने ओव्हल मैदानावर इंग्लड टेस्ट क्रिकेट मालिकेत विजय मिळवला म्हणून ट्रान्झिस्टरला हार घालून पेढे वाटीत होते.







Powered By Sangraha 9.0