...तर प्लास्टिकचा पाऊस पडणार!

14 Dec 2022 20:04:22
microplastic pollution


वायू प्रदूषणाची समस्या आणि त्यापासून होणार्‍या गंभीर परिणामांशी आपण अवगत आहोतच. पण, आता प्लास्टिकचा पाऊस पडू लागला, तर आश्चर्य वाटायला नको, असे संशोधकांचे मत आहे. प्लास्टिकचा पाऊस ही कुठलीही काल्पनिक संकल्पना नसून, आता हे संकट एक भीषण वास्तव म्हणून जगापुढे आ वासून उभे आहे. या पावसाचा कुठलाही गंध किंवा स्वाद नसेल. मात्र, परिणाम इतके भयंकर असतील की, ज्यामुळे दुर्धर आजारांशी संपूर्ण मानवजातीसह प्राणिमात्रांनाही सामना करावा लागणार आहे. याबद्दलचा अहवाल नुकताच न्यूझीलंडच्या ऑकलंड विद्यापीठात प्रसिद्ध करण्यात आला.

 
हवामान बदलाच्या गंभीर परिणामांसोबत आता प्लास्टिक पाऊसही मानवाने ओढावून घेतलेले मोठे संकट आहे. जगात ही बाब अद्याप समस्या म्हणूनही तितकीशी चर्चिली गेलेली नाही. त्यामुळे फार वेगाने या विषयी काही उपाययोजना सुरू होतील, अशी शक्यताही तूर्तास नाही. मात्र, विद्यापीठाच्या या अहवालामुळे किमान ‘मायक्रोप्लास्टिक’चा मुद्दा चर्चेत तरी आला.वैज्ञानिकांच्या मते, ‘मायक्रोप्लास्टिक’ ही अशी गंभीर समस्या आहे ज्याबद्दल आपण कुणीही तितकेसे गांभीर्य दाखविण्याची तसदी घेतलेली नाही. जी गोष्ट साध्या डोळ्यांनी दिसतही नाही, जिचा कुठल्याही प्रकारे स्वाद आणि गंधही जाणवत नाही. याच कारणास्तव आपण या बाबीकडे डोळेझाक करत आहोत.

microplastic pollution


काही सोशल मीडिया युझर्सनी ‘मायक्रोप्लास्टिक’बद्दल जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे खरी, पण ती अद्याप व्यापक स्वरुपात झालेली नाही. वर्षभरात ३० लाख प्लास्टिक बॉटल्स तयार होतील इतके कण पडत असतात. ‘एनवायरनमेंट सायन्स आणि टेक्नॉलोजी’मध्ये प्रकाशित झालेल्या नव्या संशोधन अहवालात याच मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ऑकलंड शहरातील छतांवर प्रत्येक वर्गमीटरवर सरासरी पाच हजार कण पडत असतात. म्हणजेच वर्षभरात ७४ मेट्रिक टन प्लास्टिक गोळा होते. हे मायक्रोप्लास्टिक एकत्र केले तर ३० लाख प्लास्टिक बाटल्या तयार होऊ शकतात. अशाच प्रकारे एक संशोधन अहवाल वर्ष २०२० ब्रिटनमध्येही प्रकाशित झाला होता.

लंडनमध्येही अशाच प्रकारे मायक्रोप्लास्टिकचे सरासरी ७७१ कण पडत असतात. ऑकलंडच्या तुलनेत सहापटीने कमी आहेत. याचा अर्थ लंडनमध्ये प्रदूषण कमी आहे, असे मुळीच नाही. मागील अभ्यासात सर्वात कमी आकाराच्या ‘मायक्रोप्लास्टिक’ची गणती केलेलीच नव्हती. ही समस्या दिवसेंदिवस इतकी गंभीर बनत चालली आहे की, पाणी आणि खाद्यपदार्थही यातून वगळता येणे शक्य झालेले नाही. तसेच हवेत थेट प्रसार होणारे हे ‘मायक्रोप्लास्टिक’ श्वसनावाटे शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे श्वसनाशी संबंधित आजारांनाही निमंत्रण देऊ शकतात.

microplastic pollution


‘मायक्रोप्लास्टिक’चे प्रदूषण ही इतकी व्यापक समस्या बनत चालली आहे की, पाऊस, समुद्र, खाद्यपदार्थ तसेच अन्नशृंखला आदी सगळ्याच गोष्टीत ‘मायक्रोप्लास्टिक’चे प्रदूषण होऊ लागले आहे. ऑकलंडमध्ये झालेल्या संशोधनात ‘मायक्रोप्लास्टिक’चे कण आढळले. त्यांचा आकार १० ते ५० मायक्रोमीटर इतका होता. यापैकी बहुतांश कण हे प्लास्टिकचेच होते. नमुन्यातील १०० पैकी केवळ तीनच कण हे १०० मायक्रोमीटरपेक्षा जास्त होते. ‘मायक्रोप्लास्टिक’मुळे शरीरावर नेमका कुठला परिणाम होऊ शकतो, याबद्दल अद्याप संशोधन सुरू आहे.

श्वासावाटे ‘मायक्रोप्लास्टिक’ हे शरीरात पोहोचतात. एका संशोधनानुसार, सरासरी एक व्यक्ती वर्षभरात ७४ हजार प्लास्टिक कण श्वसनावाटे शरीरात ओढत असतो. मार्च २०२२ मध्ये पहिल्यांदाच मानवी शरीरात ‘मायक्रोप्लास्टिक’ असल्याचे स्पष्ट झाले होते. एका रुग्णाच्या रक्तात हे ‘मायक्रोप्लास्टिक’चे कण आढळल्याने खळबळ उडाली आणि तेव्हा प्रामुख्याने हा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. मानवी प्राण्यांसह सागरी जीवांनाही याचा धोका सर्वाधिक आहे. पाहताना या ‘मायक्रोप्लास्टिक’चा आकार केवळ एका तीळाच्या बी सारखाच दिसतो. पण, ते पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शीचा वापर करावा लागतो. लंडन आणि ऑकलंडसारख्या शहरांतील या परिस्थितीपासून भारत काही दूर राहिलेला नाही. प्लास्टिक प्रदूषण़, वायू प्रदूषण आणि त्यासंदर्भातील समस्यांवर मात करण्याच्या प्रयत्नात असतानाच आता नव्याने आणखी एक समस्या उभी आहे. त्यासाठी व्यापक उपाययोजनांचीही गरज आहे.




Powered By Sangraha 9.0