‘आपले संविधान’च्या निमित्ताने...

14 Dec 2022 19:30:59
Aaple constitution


‘आपले संविधान’ या पुस्तकाच्या निर्मितीचीदेखील एक कथा आहे. मनात एक प्रश्न निर्माण झाला की, संविधान हा सर्वश्रेष्ठ कायदा असल्यामुळे त्याचे पालन केले पाहिजे की संविधानाचा कायदा तत्त्व आणि मूल्यांवर आधारित असल्यामुळे संविधानाचे पालन केले पाहिजे? संविधानाचा तत्त्वविचार कोणता आणि मूल्यविचार कोणता, याचा मी आपल्या परिने शोध घेतला. मला जे उमगले आणि जाणवले, ते मी पुस्तकात मांडले. नेहमीप्रमाणे हे पुस्तक सर्वसामान्य वाचकांनी वाचावे, म्हणून लिहिले.


'आपले संविधान- तत्त्वविचार, मूल्यसंकल्पना, ध्येयवाद’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचे कार्यक्रम महाराष्ट्र आणि गोवा या सर्व ठिकाणी नुकतेच संपन्न झाले. माझे नाव वाढावे म्हणून मी हे पुस्तक लिहिले नाही किंवा माझ्या नावावर आणखी एका पुस्तकांची भर पडावी, यासाठीही हे पुस्तक मी लिहिलेले नाही. प्रकाशनाच्या दिवशी सर्वांना हे पुस्तक १०० रुपयात खरेदी करता यावे म्हणून आतापर्यंतच्या काही पुस्तकांचे लेखक मानधन पुस्तकाची किंमत कमी करण्यासाठी खर्च करावे, असे मी पुस्तक विभागाच्या प्रमुख शीतल खोत यांना सांगितले. पुस्तकातून अर्थप्राप्ती मला करायची नव्हती.

प्रत्येक पुस्तकाच्या निर्मितीची एक कथा असते. या पुस्तकाच्या निर्मितीचीदेखील एक कथा आहे. मनात एक प्रश्न निर्माण झाला की, संविधान हा सर्वश्रेष्ठ कायदा असल्यामुळे त्याचे पालन केले पाहिजे की संविधानाचा कायदा तत्त्व आणि मूल्यांवर आधारित असल्यामुळे संविधानाचे पालन केले पाहिजे? संविधानाचा तत्त्वविचार कोणता आणि मूल्यविचार कोणता, याचा मी आपल्या परिने शोध घेतला. मला जे उमगले आणि जाणवले, ते मी पुस्तकात मांडले. नेहमीप्रमाणे हे पुस्तक सर्वसामान्य वाचकांनी वाचावे, म्हणून लिहिले. अनेक संदर्भ, असंख्य तळटिपा, विविध अवतरणे वगैरे सगळे काही मी करू शकत होतो. परंतु, यापैकी मी काहीही केले नाही. याचे कारण माझे पुस्तक जर सर्वसामान्य वाचकाने वाचायचे असेल, तर त्याची पृष्ठसंख्या मर्यादित असली पाहिजे आणि पुस्तक सहज वाचनीय झाले पाहिजे. तसे हे पुस्तक झाले आहे, असे अनेकांनी मला कळविले.

पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम आपणहून झालेले आहेत. चार-पाच ठिकाणचे कार्यक्रम सोडले, तर स्थानिक संघ कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते, ‘विवेक’चे प्रतिनिधी, ‘विवेक’शी स्नेहसंबंध असणार्‍या काही संस्था यांनी हे सर्व कार्यक्रम केले. ७०-८० ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांत लेखक म्हणून मी जाणे अशक्यच होते, त्यामुळे आयोजकांनी असा आग्रहही धरला नाही. तेव्हा प्रश्न असा निर्माण होतो की, एखाद्या विषयावरील एखादे पुस्तक असे उत्स्फूर्तपणे प्रकाशित करावे, असे इतक्या लोकांना का वाटले?

संविधान साक्षर होणे ही काळाची गरज आहे. ही गरज सर्वांनी जाणली आहे. सर्वसामान्य व्यक्ती ‘संविधान’ हा शब्द ऐकतो, परंतु संविधान म्हणजे काय, हे त्याला कुणी सांगत नाही आणि वृत्तपत्रातून त्याला समजेल अशा भाषेत कुणी लिहीत नाही आणि जेव्हा ‘संविधान बचाव’च्या आरोळ्या ठोकळ्या जातात, तेव्हा सर्वसामान्य व्यक्ती गोंधळात पडतो. त्याला ‘पर्यावरण बचाव’ समजतं, ‘नदी बचाव’ समजतं, ‘नारी बचाव’ समजतं, पण ‘संविधान बचाव’ हे त्याला समजतच नाही. मग त्याला असे वाटते की, आजकाल जो तो उठतो तो ‘संविधान खतरे में हैं, संविधान वाचविले पाहिजे,’ असे म्हणत असतो, तेव्हा संविधान हे नेमकं काय आहे, हे नेमकं समजून घ्यायला पाहिजे, अशी उत्सुकता सर्वांच्या मनात निर्माण झाली आहे.

नकारात्मक प्रचाराचा कधीकधी असा सकारात्मक परिणाम होतो. जेव्हा ‘विवेक’मधून हे पुस्तक प्रकाशित होणार आहे, असे जाहीर झाले तेव्हा अनेकांनी त्याचे कायक्रम ठरविले. यामुळे ‘संविधान साक्षरता’ या विषयाला चांगल्या प्रमाणात गती प्राप्त झाली. एखाद्या विषयाच्या संदर्भात आणि त्यातही अतिशय महत्त्वाच्या विषयात जर लोक निरक्षर असतील, तर त्याचा दोष लोकांना देता येत नाही. कोणत्याही विषयाची साक्षरता आकाशातून पडत नाही. साक्षरतेचे धडे शालेय जीवनापासून द्यावे लागतात. संविधान साक्षरतेचा विषय इयत्ता पहिलीपासून ते पदव्युत्तर परीक्षेपर्यंत करण्याचा विषय आहे. आणि तो इतक्या काटेकोरपणे करायला पाहिजे की, कोणतीही डिग्री किंवा डिप्लोमा मिळवायचा असेल, तर संविधानाचा पेपर अनिवार्य ठरविला पाहिजे.

संविधान साक्षर करत असताना त्यात रूक्षता अजिबात असता कामा नये. कायदा हा रूक्ष असतो. त्याची भाषा समजायला अतिशय कठीण असते. शब्दांचे अर्थ आणि कायद्याची व्याप्ती ही कलमे वाचून समजत नाही, त्या कलमांवरील कायदेशीर भाष्य कधीकधी कलमांपेक्षाही अधिक क्लिष्ट असते. त्या त्या वयाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या अनुभवाच्या परिघात संविधानाची मूलतत्त्वे समजून सांगता आली पाहिजेत. दुसर्‍या भाषेत संविधान सोपे करून सांगता आले पाहिजे. हे काम कुणीही करू शकत. त्यासाठी संविधानतज्ज्ञ असण्याची गरज नाही. तज्ज्ञ मंडळींची कामे वेगळी असतात.

संविधान समजून सांगत असताना संविधान म्हणजे काय? संविधानाचा कायदा कोण तयार करतं? तो कसा तयार होतो? तो कोणत्या मूलभूत तत्त्वांवर आधारित असतो? कोणत्या मूल्यसंकल्पनांवर तो आधारित असतो? संविधानाचा ध्येयवाद काय आहे? संविधानाचा कायदा का पाळायचा असतो? हे झाले संविधानाविषयी मूलभूत प्रश्न, त्याची उत्तरे शोधणे आणि देणे फारसे अवघड नाही.अशा प्रकारे मांडणी केली की, हे संविधान आपले आहे असे वाटायला लागते. जिथे आपलेपणाची भावना निर्माण होते, तिथे आपल्या वस्तूच्या रक्षणाची आणि संवर्धनाची कर्तव्यबुद्धीदेखील जागृत होते.

आपले संविधान, संविधान सभेतील २८९ सभासदांनी दोन वर्षे, ११ महिने, १७ दिवस एकत्र बसून चर्चा करून निर्माण केले आहे. ते कलमबद्ध करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. सभेच्या चर्चेचे काही नियम भगवान गौतम बुद्धांनी २६०० वर्षांपूर्वी सांगितले. त्यांनी सांगितले की, एकत्र आले पाहिजे, एकत्र चर्चा केली पाहिजे, सहमती निर्माण होईपर्यंत चर्चा केली पाहिजे, सहमतीने जो निर्णय होईल, तो सर्वांचा निर्णय असेल आणि तो सर्वांनी मान्य केला पाहिजे. सभागृहातील वयोवृद्धांचा आदर केला पाहिजे. जवळजवळ या नियमांनी आपल्या संविधान सभेचे कामकाज चालले. आणि सर्वांच्या हिताचे काय आहे, याचे कायदे बनविण्यात आले.

संविधानाचे कायदे शाश्वत, अपरिवर्तनीय, अनादी-अनंत असे असू शकत नाहीत. ते परिस्थितीसापेक्ष असतात. संविधान जेव्हा निर्माण होत असते, तेव्हाच्या परिस्थितीचे प्रतिबिंब संविधानाच्या कलमांत उमटते. उदा. तेव्हाच्या संविधान निर्माणकर्त्यांना वाटले की, काश्मीरला वेगळा दर्जा देणारे ‘३७० कलम’ असावे. याला ‘परिस्थिती सापेक्षता’ म्हणतात. ही परिस्थिती २०१८ साली काही राहिली नाही. त्यामुळे हे कलम काढून टाकणे अत्यंत गरजेचे झाले. संविधानाचा कायदा हा मनुष्यनिर्मित असतो, तो परिस्थितीसापेक्ष असतो आणि परिस्थिती सातत्याने बदलत राहते, त्यामुळे काही कायद्यांमध्ये सुधारणा कराव्या लागतात.

तत्त्वे मात्र परिस्थिती निरपेक्ष असतात, मूल्यसंकल्पना परिस्थिती निरपेक्ष असतात, त्या बदलत नाहीत. उदा. सामजिक, आर्थिक, राजकीय न्याय हा तत्त्वविचार आहे. तो परिस्थिती निरपेक्ष आहे. १०० टक्के सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायवर समाजरचना निर्माण झाली की या तत्त्वांची गरज राहणार नाही. परंतु, तसा समाज नजीकच्या काळात निर्माण होणे शक्य दिसत नाही. जुने अन्याय संपतात त्यांची जागा नवीन अन्याय घेतात.

 एक राक्षस मरतो, त्याच्या रक्तबीजातून दुसर्‍या राक्षसाचा जन्म होतो, या पौराणिक कथांचा हाच अर्थ आहे. यासाठी तत्त्वांबाबत आपण ताठर असले पाहिजे आणि सुधारणांबाबत आपण लवचिक असले पाहिजे.शेवटी समाजात आपणहून संविधान साक्षरतेची जागृती निर्माण होत आहे, त्याचे स्वागत सर्वांनी केले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने कर्तव्यभावनेने संविधान साक्षरतेच्या संदर्भात आपल्याला जे करता येईल ते केले पाहिजे, काळाची ही गरज आहे.

(पुस्तकासंबंधी माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क - सा.विवेक - २७८१०२३५/३६, ९५९४९६१८५८)


Powered By Sangraha 9.0