Exclusive - वसा दुर्लक्षित प्रजातींच्या संशोधनाचा ! तेजस उद्धव ठाकरेंची मुलाखत

13 Dec 2022 22:16:09
tejas Thackeray


गेल्या काही वर्षांपासून भारतातील कमी ज्ञात असलेल्या दुर्लक्षित प्रजातींवर 'ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन'कडून महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. खास करुन पश्चिम घाटात अधिवास करणाऱ्या प्रदेशनिष्ठ प्रजाती आणि त्यांच्या अधिवासाच्या संरक्षणासाठी फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. कमी ज्ञात असलेल्या दुलर्क्षित प्रजातींच्या संशोधनाची गरज आणि त्यांच्या संवर्धनाची आवश्यकता, याविषयी भूमिका मांडणारी 'ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन'चे प्रमुख तेजस उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत. ( tejas thackeray )


'ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’कडून कमी ज्ञात असलेल्या प्रजातींविषयी भारतभरात कशा पद्धतीने काम सुरू आहे ?
 
- कमी ज्ञात असलेल्या आणि दुर्लक्षित प्रजातींचे संशोधन आणि संवर्धनासाठी ’ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’ने पुढाकार घेतला आहे. यामध्ये पाली, गोड्या पाण्यातील मासे, खेकडे, गोगलगायी आणि पक्षी अशा संशोधनाच्या अनुषंगाने दुर्लक्षित असलेल्या प्रजाती मुख्यत: प्रकाशझोतात आहेत. फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रकर्षाने जगात केवळ विशिष्ट प्रदेशातच सापडणार्‍या प्रदेशनिष्ठ प्रजातींचे संशोधन आणि त्यांच्या संवर्धनासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. फाऊंडेशनच्या निर्मितीनंतर सर्वप्रथम आम्ही पालींवर आधारलेला संशोधनाचा प्रकल्प हाती घेतला. ’गेकोस ऑफ पेनिन्सुला इंडिया’ या संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून तामिळनाडूमध्ये पालींच्या नव्या प्रजातींसंदर्भात सर्वाधिक काम झाले आहे. मात्र, याच प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातूनही पालींच्या नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. या माध्यमातून प्रामुख्याने ’निमास्पिस’, ’हेमिडॅक्टिलस’, ’हेमिफायलोडॅक्टिलस’ आणि ’सायर्टोडॅक्टिलस’ या कुळातील पालींच्या नव्या प्रजाती शोधण्याचे काम झाले आहे. ’फ्रेश वॉटर क्रॅब ऑफ द सह्याद्रीस’ या शोध प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधून गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या नव्या प्रजातींच्या संशोधनावर काम झाले आहे. ’सह्याद्रीयाना’, ’गुबरनाटोरियाना’, ’घाटियाना’ आणि ’इंग्लेथेलफुसा’ या कुळातील खेकड्यांचे वर्गीकरण (टेक्सोनोमी) करुन नवीन प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे ’सह्याद्रीयाना’ या गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या कुळाचादेखील या प्रकल्पाच्या माध्यमातून उलगडा झाला आहे. फाऊंडेशनचा विस्तार झाल्यावर जमिनीवरील गोगलगायींच्या प्रजातींवर काम करण्यास सुरुवात झाली आहे. याव्दारे महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्य आणि आंबोली गावातून गोगलगायींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. काही संशोधकांसोबतदेखील संयुक्तरित्या फाऊंडेशन काम करत आहे. ’फ्रेश वॉटर फिश ऑफ इंडिया’ या शोध प्रकल्पाच्या माध्यमातून संशोधक प्रवीणराज जयसिन्हा यांच्यासोबत गोड्या पाण्यातील मत्स्यप्रजातींवर संशोधन सुरू आहे. या कामाचा विस्तार अगदी महाराष्ट्रापासून नागालॅण्ड आणि मेघालय यांसारख्या सीमावर्ती राज्यांपर्यंत पोहोचलेला आहे. अंदमान-निकोबार द्वीपसमूहावर फाऊंडेशनचा एक प्रभावी शोध प्रकल्प सध्या सुरू आहे. ’असेसिन्ग द रोल ऑफ अंदमान सी एस ए बायोजियोग्राफीक बॅरिअर’ या संकल्पनेंतर्गत अंदमान-निकोबार द्वीपसमूहावर प्रामुख्याने पक्ष्यांवर संशोधनाचे काम सुरू आहे. ( tejas thackeray )

सह्याद्रीमधील कमी ज्ञात असलेल्या प्रजातींवर संशोधन कार्य का करावेसे वाटले?

- जगात अनेक जैविकदृष्ट्या समृद्ध आणि महत्त्वपूर्ण प्रदेश आहेत. मात्र, महाराष्ट्रातच जन्मल्यामुळे सह्याद्रीविषयी माझ्या मनात विशेष प्रेम आणि आपलेपणा आहे. या घाट प्रदेशामधील जिल्ह्यांमध्ये मी लहानपणापासून फिरलो आहे. या जिल्ह्यांमधील गर्द वनराई लाभलेला जंगलांचा प्रदेश पालथा घातला आहे. येथील पर्यावरणीय परिसंस्था आणि त्यामधील जैवविविधतेचे निरीक्षण केल्यावर या प्रदेशात फार कमी अभ्यास झाल्याचे लक्षात आले. या प्रदेशात काम करण्याची संधीदेखील चांगली होती. शिवाय अधिवास नष्टता आणि जनजागृतीचा अभाव यासारख्या समस्याही जाणवत होत्या. म्हणूनच विज्ञानाचा आधार घेऊन नव्या प्रजातींच्या शोधाव्दारे नव्या माहितीची निर्मिती आणि तिचे संकलन करण्याच्या अनषुंगाने सह्याद्री भूप्रदेशात काम करण्यास सुरुवात केली. ( tejas thackeray )


जंगल राखणारा देवाचा मासा



पाली किंवा गोड्या पाण्यातील खेकडे यांसारख्या दुर्लक्षित प्रजातींचे संशोधन का महत्त्वाचे आहे? त्यामधून कोणती गोष्ट साध्य होते?

- दुर्लक्षित जीवांमधील नव्या प्रजातींवर संशोधनाचे काम करत असताना अनेक गोष्टीचा उलगडा होत असतो. प्रजातींच्या नावीन्यतेविषयी उलगडा होतोच, मात्र त्याबरोबरीनेच त्या प्रजातीची उत्क्रांती, तिच्यावर झालेल्या वातावरणीय बदलाचे परिणाम या बाबींचा देखील मागोवा घेतला जातो. उदाहरणार्थ, कर्नाटकमधून आम्ही शोधलेल्या पालींच्या तीन नव्या प्रजातींवर काम करत असताना आम्ही तिच्या उत्क्रांतीची माहिती घेतली. शिवाय काळानुसार त्या प्रजातींवर हवामान बदलाचा कसा परिणाम झाला, याचाही शोध घेतला. असे केल्यामुळे सद्य:परिस्थितील हवामान बदलाचा वेग आणि त्या काळातील वेग यांची तुलना करता येते. शिवाय या बदलांना त्या प्रजातीने दिलेला प्रतिसादही तपासता येतो. गेल्या काही वर्षांमध्ये मान्सूनमध्ये झालेला बदल आणि अवकाळी पावसामध्ये झालेली वाढ लक्षात येत आहे. अशा परिस्थितीत पावसावर अवलंबून असणार्‍या गोड्या पाण्यातील खेकडे, जमिनीवरील गोगलगायी आणि बेडकांच्या हालचालींवर या बदलांचा तीव्र परिणाम पडतो. त्यामुळे एखाद्या नव्या प्रजातींचा उलगडा करणे हे संशोधनाअंती साध्य होतेच. परंतु, यामाध्यमातून या प्रजातींच्या उत्क्रांतीमागील सर्वांगीण बाबींचादेखील उलगडा होतो, जो अनेक वर्ष चालणार्‍या संवर्धनाच्या कामासाठी महत्त्वाचा असतो. तसेच, याआधारे जनजागृती देखील करता येते. ( tejas thackeray )
 
प्रदेशनिष्ठ प्रजातींचे संवर्धन करणे का गरजेचे आहे ?
 
- प्रदेशनिष्ठ प्रजाती या मूळ प्रजातीपासून विलग झाल्यामुळे वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या असतात. मूळ प्रजातींपासून त्यांचे विलगीकरण बर्‍याच वेळा जैवभौगोलिक कारणांमुळे होते. जैवभौगोलिक स्तरावरील अडथळ्यांमुळे प्रजातींना विलगीकरणाला सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ, एका नदीमुळे एखाद्या प्रजातीचे दोन गट विलग होऊ शकतात आणि वर्षानुवर्ष झालेल्या बदलांमुळे त्यांची उत्क्रांती ही दोन नव्या प्रजातींमध्ये होऊ शकते. ज्यावेळी प्रजातींच्या दोन गटांचे विलगीकरण होते, तेव्हा तो भूप्रदेश, तेथील परिसंस्था आणि अधिवासामध्ये बदल होत असतात. या बदलांमुळे विलग झालेली प्रजात आणि तिचा विशिष्ट अधिवास यांच्यामध्ये अवलंबत्व आणि सहसंबंध निर्माण होतात. यासाठी बराच कालावधी जावा लागतो आणि त्यातूनच प्रदेशनिष्ठ प्रजातींची उत्क्रांती होते. अशावेळी त्या विशिष्ट अधिवासामधून विलग झालेली प्रदेशनिष्ठ प्रजात नष्ट होणे म्हणजे तेथील स्थानिक परिसंस्थेचा समतोल ढासळणे. त्यामुळे लाखो वर्षापासून उत्क्रांत झालेल्या प्रदेशनिष्ठ प्रजातींचे संवर्धन करण्याची जबाबदारी ही मानव जातीची आहे आणि आपल्यामध्ये तेवढी क्षमता देखील आहे. ( tejas thackeray )
 
कमी ज्ञात असलेल्या प्रजातींविषयी काम करताना कोणती आव्हाने येतात ?

- कमी ज्ञात असलेल्या प्रजातींवर काम करत असताना वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. सर्वप्रथम त्या प्रजातीविषयी आणि तिच्या अधिवासावर फार कमी माहिती उपलब्ध असते. त्या प्रजातीचे विस्तार क्षेत्र माहिती नसते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात उलगडण्यात आलेल्या प्रजातींच्या माहितीच्या आधारेचे मी त्या जातीमधील नव्या प्रजातींविषयी काम केले. अशावेळी गृहीतके मांडूनही काम करावे लागते. फाऊंडेशनकडून शोधण्यात आलेल्या बर्‍याच प्रजाती या वर्षावनात अधिवास करणार्‍या आहेत. वर्षावनांमध्ये काम करणे नेहमीच आव्हानात्मक असते. कारण, तेथील भूप्रदेश हा दर्‍याखोर्‍यांचा असतो. तो पालथा घालून काम करणे सहजसोपे नसते. शिवाय मुसळधार पाऊस, विषारी साप, विंचू, जळू, कृमी यांच्या दंशांना देखील सामोरे जावे लागते. शोध कार्यामधून किती प्रजातींचा उलगडा होईल, याची शाश्वती नसते. तसेच कमी ज्ञात असलेल्या प्रजातींविषयी जनजागृतीदेखील नसते. मात्र, सद्य:स्थितीत कमी ज्ञात असलेल्या प्रजातींविषयी सुरू असलेल्या कामाचा वेग, त्याद्वारे निर्माण होणारी माहिती ही भविष्यात अशा आव्हानांसाठी उपाय असेल. ( tejas thackeray )
 
’ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’ची भविष्यातील कामाची दिशा कशा प्रकारची असणार आहे ?

- ’ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’ची निर्मितीमागील भूमिका ही कमी ज्ञात असलेल्या पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय प्रजातींचे वर्गीकरण करण्यासंदर्भातील होती. यामाध्यमातून आम्ही गोड्या पाण्यातील खेकडे, मासे, पाली यांवर लक्ष केंद्रित केले. येणार्‍या वर्षांमध्ये फाऊंडेशनकडून उभयचरांवर खास करुन देवगांडूळ आणि बेडकांवर काम करण्यात येणार आहेत. तसेच खोल समुद्रातील माशांवर संशोधन करण्याचा आमचा मानस आहे. ‘ऑर्किड’ म्हणजेच अमरी आणि पश्चिम घाटामधील आयुर्वेदिक झाडांवर काम करण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. थोडक्यात भारतातील महत्त्वाच्या भूप्रदेशातील कमी ज्ञात असलेल्या प्रजातींचे वर्गीकरणावरच आमचा भर असणार आहे. शिवाय कमी ज्ञात असलेल्या आणि संकटात सापडलेल्या अधिवासांविषयीदेखील काम केले जाणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही कमी ज्ञात असलेल्या प्रजातींवर काम करता, त्यावेळी आपसूकच कमी ज्ञात असलेल्या अधिवासांवरदेखील काम होते. ( tejas thackeray )


मुलाखत - अक्षय मांडवकर
९७६८६८५४०३१



Powered By Sangraha 9.0