हिंदू वारशाच्या जतनासाठी कटिबद्ध

13 Dec 2022 21:35:33
 
S. Jaishankar
 
 
 
 
 
‘काशी-तामिळ संगमम्’च्या कार्यक्रमात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मोदी सरकार जागतिक हिंदू वारशाचेदेखील जतन आणि संवर्धन करत आहे, असे प्रतिपादन केले. तसेच त्याची अनेक उदाहरणेही त्यांनी दिली. ती पाहता, ज्या गोष्टी स्वातंत्र्यापासूनच व्हायला हव्या होत्या, त्या करण्यासाठी नरेंद्र मोदींचे सरकार यावे लागले, हे स्पष्ट होते.
 
 
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यापासून देशाचा हिंदू वारसा ठसठशीतपणे जगासमोर आणण्याचे काम सुरू झाले. स्वतः नरेंद्र मोदींनी आपल्या दौर्‍यात ठिकठिकाणच्या हिंदू मंदिरांना वेळोवेळी भेटी दिल्याचे, देवी-देवतांसमोर नतमस्तक झाल्याचे या काळात दिसून आले. इतकेच नव्हे, तर अनेक परदेशी पाहुण्यांना, राष्ट्रप्रमुखांना वेगवेगळ्या मठ-मंदिरांचे दर्शन घडवण्यापासून हिंदू वारशाशी संबंधित भेटवस्तू देण्याचे कामही मोदींनी केले. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतील श्रीराम मंदिराची पायाभरणी केली आणि आगामी वर्षभरात त्याचे उद्घाटनही होईल. याबरोबरच वाराणसीतील काशिविश्वनाथ कॉरिडोर, उज्जैनमधील महाकाल कॉरिडोरच्या उभारणीचे कामही नरेंद्र मोदींनी केले. याव्यतिरिक्त हिंदू वारशाच्या जतनाचे काम विविध सरकारी विभागांच्या पातळीवरही सुरूच आहे. तसेच, ‘काशी-तामिळ संगमम्’सारख्या अनोख्या कार्यक्रमांचे आयोजनही केले जात आहे. मात्र, हिंदू संस्कृती फक्त भारतापुरतीच मर्यादित नसून संपूर्ण जगभरात पसरलेली आहे. जगातील अनेक देशांतून हजारो वर्षांपूर्वीच्या हिंदू संस्कृतीच्या खाणाखुणा सातत्याने समोर येत असतात.
 
 
काळाच्या ओघात इतर धर्माच्या आक्रमकांमुळे त्या त्या ठिकाणची हिंदू ओळख पुसली गेली, पण त्याचे अवशेष अजूनही आढळतात. हिंदूंचे पूर्वज जगात सर्वत्र पसरल्याचा तो पुरावाच म्हटला पाहिजे. मात्र, तो पुरावा मिळाल्याने काम भागत नाही, तर त्याचे जतन करण्याचे, संवर्धन करण्याचे कर्तव्यही आजच्या हिंदूंचे आहे. तेच काम मोदी सरकार करत आहे. नुकतेच वाराणसीमध्ये ‘काशी-तामिळ संगमम्’चे आयोजन करण्यात आले होते. देशाची आर्य व द्रविड अशी फुटीर विभागणी करणार्‍यांनी उत्तर भारतीयांपासून दक्षिण भारतीय कायमचे दूर राहतील, असे षड्यंत्र शेकडो वर्षांपासून चालवलेले आहे. पण, अखंड भारतातील सर्व हिंदू एकच आहेत, त्याचे अनेक ऐतिहासिक दाखले आहेत, देशात हजारो वर्षांपासून दक्षिण-उत्तरेत विचारांची, मूल्यांची देवाणघेवाण होत होती, त्याचेच मूर्तरुप ‘काशी-तामिळ संगमम्’च्या माध्यमातून सर्वांना दिसले. याच कार्यक्रमात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सहभाग घेत उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी मोदी सरकार जागतिक हिंदू वारशाचेदेखील जतन आणि संवर्धन करत आहे, असे प्रतिपादन केले. तसेच त्याची अनेक उदाहरणेही त्यांनी दिली. ती पाहता, ज्या गोष्टी स्वातंत्र्यापासूनच व्हायला हव्या होत्या, त्या करण्यासाठी नरेंद्र मोदींचे सरकार यावे लागले, हे स्पष्ट होते.
 
 
जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर म्हणून कंबोडियातील अंगकोरवट मंदिराला ओळखले जाते. भगवान विष्णूला समर्पित अंगकोरवट मंदिराच्या उभारणीला सम्राट सूर्यवर्मन दुसरा याने सुरुवात केली तर सम्राट जयवर्मन सातवा याच्या काळात त्याचे बांधकाम पूर्ण झाले. सुमारे 400 एकरपर्यंत पसरलेल्या अंगकोरवट मंदिराची निर्मिती 12व्या शतकात झाली. मात्र, शेकडो वर्षांपासून अनेक हवामान व वातावरणीय बदलांना झेलणार्‍या या मंदिराचे मूळ रुप जसेच्या तसे राहिलेले नाही. म्हणूनच अंगकोरवट मंदिर व परिसराच्या जीर्णोद्धाराचीआवश्यकता असून त्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घेतला आहे. आज अनेक हजारो हिंदूंसह इतर धर्मीयदेखील अंगकोरवट मंदिरात दरवर्षी येत असतात. पण, मंदिराविषयीचा जो आपलेपणा हिंदूंना वाटतो, तो सर्वांनाच वाटेल असे नाही. कारण, हिंदूंच्या पूर्वजांनी अंगकोरवट मंदिराची उभारणी केली आहे. अंगकोरवट मंदिर हिंदूंचा, हिंदू संस्कृतीचा हजारो वर्षांपासूनचा जीवंत वारसा आहे. तो वारसा फक्त 21व्या शतकातल्या हिंदूंसाठीच नव्हे, तर यापुढच्या हजारो वर्षांपर्यंतच्या हिंदू पिढ्यांसाठी जतन करून ठेवण्याचे सध्याच्या हिंदूंचे काम आहे. अंगकोरवट मंदिराच्या जीर्णोद्धारामागे मोदी सरकारचा हाच विचार असून त्याचा उल्लेख एस. जयशंकर यांनीही केला आहे. कारण, आजचे मोदी सरकार भारतीय हिंदू संस्कृतीला पुनर्स्थापित करत आहे, त्याचे पुनर्निर्माण करत आहे, तिचा प्रवाह पुन्हा अखंडित करत आहे. आपले हिंदू पूर्वज विश्वभ्रमंतीला गेले होते आणि त्यांनी तिथे आपला वारसा निर्माण केला यावर आमचा विश्वास आहे, असेही एस. जयशंकर यावेळी म्हणाले.
 
 
कंबोडियाच नव्हे, तर चीनमध्येही एकेकाळी हिंदू पोहोचले होते. त्याचा उल्लेखही एस. जयशंकर यांनी केला. चीनमध्ये राजदूत म्हणून काम केलेले असल्याने एस. जयशंकर यांनी तिथल्या हिंदू वारशाला जवळून पाहिलेही आहे. चीनच्या पूर्व किनार्‍यावर अनेक हिंदू मंदिरांचे अवशेष असल्याचे त्यांनी ‘काशी-तामिळ संगमम्’ कार्यक्रमात सांगितले. तसेच, अयोध्या आणि कोरियामध्येदेखील विशेष संबंध असल्याचे आणि म्हणूनच तिथले लोक अयोध्येशी जोडले जाऊ इच्छित असल्याचे एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले. सोबतच अमेरिकेतही सध्याच्या घडीला एक हजारांपेक्षा अधिक हिंदू मंदिरे आहेत, तर बहारीनमध्ये श्रीनाथ मंदिर आहे. ही मंदिरे आमच्या पूर्वजांनी इथे स्थापन केली. हिंदूंनी व्हिएतनाममध्येही काम केले, असेही एस. जयशंकर म्हणाले. आज जगभरातील वेगवेगळ्या देशांत साडेतीन कोटींपेक्षा अधिक हिंदू राहतात. ते तिथे जाताना आपल्याबरोबर भारतीय हिंदू संस्कृती घेऊन गेले, त्याचे समर्थन करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ते आम्ही वेगवेगळ्या प्रकारे करत आहोत, असेही एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले.
 
 
एस. जयशंकर यांनी हिंदू वारशाच्या जतनाचे आणखी उदाहरण देताना श्रीलंकेतील तिरुकेथीश्वरम मंदिराचा उल्लेख केला. श्रीलंकेच्या मन्नारमधील तिरुकेथीश्वरम मंदिर भगवान शंकराला समर्पित असून, संपूर्ण भारतीय उपखंडातील शैव पंथीय तिथे पूजा-अर्चना करतात. मात्र, तिरुकेथीश्वरम मंदिर श्रीलंकेतील सशस्त्र संघर्षावेळी सुमारे 12 वर्षे बंद अवस्थेत होते. त्यानंतर ते उघडले मात्र, मंदिराच्या जीर्णोद्धाराची आवश्यकता होती. तेव्हा तिरुकेथीश्वरम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम आम्ही केल्याचे एस. जयशंकर म्हणाले. याबरोबरच, प्रभू श्रीराम आणि रामायण तमाम हिंदूंच्या श्रद्धेचा विषय. रामायणाशी संबंधित भारतातील ठिकाणे जोडण्याचे काम तर मोदी सरकार करतच आहे, पण मोदींनी नेपाळमध्येही रामायण सर्किटच्या उभारणीसाठी 200 कोटींचा निधी देण्याचे वचन दिलेले आहे. म्हणजेच, जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे तिथे मोदी सरकार हिंदू वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी प्रयत्नरत असल्याचे दिसून येते.
 
 
Powered By Sangraha 9.0