सध्या मुंबईचे वातावरण हे दिल्लीपेक्षाही खराब असल्याचे हवा निर्देशांक आकडेवारीवरुन समोर आल्याने चिंतेत भर पडली आहे. पण, केवळ वायुप्रदूषणच नव्हे, तर मुंबईतील गोवंडी भागात कचर्याच्या आणि जैवकचरा प्रक्रिया प्लांटमुळे श्वसनाचे रोग, टीबीचे रुग्ण यांच्या संख्येतही अलीकडे मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. तेव्हा, मुंबईतील या डम्पिंग प्लाटंमुळे उद्भवलेल्या गंभीर समस्येचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबईच्या पूर्व उपनगरातील गोवंडी येथे वास्तव्यास असणार्या रहिवाशांपैकी ‘डम्पिंग ग्राऊंड’ व जैववैद्यकीय कचर्यावरील प्रक्रियेमुळे उद्भवणार्या प्रदूषणामुळे घरोघरी किमान एका माणसाला तरी क्षयरोगाची (टीबी) लागण झाल्याचे समोर आले आहे. मुंबई महापालिकेच्या माहितीप्रमाणे जानेवारी 2022 ते मे 2022 या काळात ‘एम पूर्व’ प्रभागामध्ये ’टीबी’ने आजारी पडलेल्या रुग्णांची संख्या ही 2,058 इतकी होती.
महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थेतील देवनार डम्पिंग ग्राऊंड व जैववैद्यकीय कचर्यावर तिथे जी प्रक्रिया केली जाते, त्यामुळे महापालिकेला येथील झोपडपट्टीतील नागरिक दोषी ठरवित आहेत. कचर्यावरील ही प्रक्रिया केंद्र येथून लवकरात लवकर दुसरीकडे स्थलांतरित करायला हवी, अशा सूचनादेखील या नागरिकांनी वारंवार पालिकेकडे केल्या. परंतु, पालिकेने त्याची अद्याप तरी गांभीर्याने दखल घेतलेली दिसत नाही.
देवनारचे डम्पिंग ग्राऊंड व जैवकचरा प्लांट या झोपडपट्ट्यांच्या वस्तीच्या अगदी जवळ स्थित आहे. या प्लांटमधून कचर्यावरील प्रक्रियेनंतर विषारी वायू बाहेर पडतात. परिणामी, या संपूर्ण भागातील हवा ही प्रदूषित होऊन अत्यंत धोकादायक बनली आहे. तसेच नागरिकांच्या फुप्फुसात उत्सर्जित विषारी वायू शिरून तेथील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. याच भागात अलीकडच्या काळात दोन मुले ’टीबी’ने दगावली आहेत.
2015 मध्ये मुंबई महापालिकेने देवनार डम्पिंग ग्राऊंड क्षेत्राभोवतीच्या मोठ्या वस्तीचे सर्वेक्षण केले होते. जवळच म्हणजे डम्पिंग ग्राऊंड प्रक्रिया 700 मी. अंतरावर व ‘बायो वेस्ट इन्सिनरेटर’ प्लांटच्या प्रक्रियेचे काम दीड किमी अंतरावर होत आहे. येथे 84 इमारती बांधल्या आहेत. प्रत्येक इमारतीत 61 बिर्हाडे आहेत. या इमारतीत प्रत्येक घरात सहा ते दहा माणसे राहतात. घरात जागा पुरत नाही म्हणून बरेचजण इमारतीच्या बाजूला कॉरिडोरमध्येसुद्धा रात्रीच्या वेळीस झोपतात. त्यामुळे रात्रभर हे लोक या विषारी हवेच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नागरिकांच्या तक्रारी
या भागातील अनेक त्रस्त नागरिकांनी दूषित हवेसंबंधीच्या तक्रारी पालिकेसोबतच ‘एमपीसीबी’ व ‘सीपीसीबी’कडे, तसेच राज्य व केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याकडेही पाठविल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, डम्पिंग ग्राऊंड व जैवकचरा प्लांट दुसरीकडे लवकरात लवकर स्थानांतरित करावा. या वर्षीच्या जुलैमध्ये येथील एका नागरिकाने एक तक्रार राष्ट्रपतींकडेही पाठविली होती, तर एक स्थानिक रहिवासी फैयाझ आलम शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयातही तक्रार सादर केली आहे. या क्षेत्रातील डम्पिंग ग्राऊंड व जैवकचरा प्रक्रिया प्लांटमुळे पालिकेच्या 2018 ते 2022च्या नोंदणीप्रमाणे शहरातील आठ ते दहा टक्के ‘टीबी’चे रुग्ण हे एकट्या गोवंडी भागातच आहेत. प्रत्येक वर्षी हे ‘टीबी’ रुग्णांचे प्रमाण वाढते आहे. याचे कारण म्हणजे, डम्पिंग ग्राऊंड व जैवकचरा प्रक्रिया प्लांटमुळे उत्सर्जित होणारा घट्ट काळा आणि विषारी वायू.
या भागातील कुठलाही रुग्ण डॉक्टरकडे उपचाराकरिता गेला, तर डॉक्टरांकडून त्यांना प्रथम ’टीबी’च्या चाचण्या करा म्हणून सांगितले जाते. त्यातच गरिबीमुळे येथील मुले कुपोषित असून त्यात प्लांटमुळे विषारी हवाही त्यांना पोटात घ्यावी लागते. तसेच या क्षेत्रातील हवा दूषित असल्याने येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 200 ते 300 इतका म्हणजे ‘अगदी खराब’ या वर्गात नोंदवला गेला आहे.
‘टीस’मधील पर्यावरणतज्ज्ञ अमीता भिडे काय म्हणतात?
या संपूर्ण क्षेत्रामध्ये (म्हणजे शिवाजी नगर, मानखुर्द व गोवंडी भाग) नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या अतिशय तीव्र झाल्या आहेत. या समस्या पर्यावरणाच्या असल्याने त्या गुंतागुंतीच्या व धोक्याच्या बनल्या आहेत.
या क्षेत्रात घनकचर्यावर डम्पिंग ग्राऊंडमध्ये प्रक्रिया होत असल्यामुळे ‘वेस्ट इन्सिनरेटर’चा प्लांट आणायला नको होता, असे तज्ज्ञांचे मत आहे. मुंबई महापालिका व ‘एमपीसीबी’ अशा प्राधिकरणांनी हा दुसरा जैवकचरा प्रक्रिया प्लांट येथे आणला. त्यामुळे या भागात आरोग्याचा दुहेरी धोका निर्माण झाला. ‘एम पूर्व’ भागातील मुलांचे कुपोषण, खराब हवा व श्वसनरोगाचे रुग्ण, देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा प्रक्रियेमुळे रहिवाशांवर होणारे परिणाम यांसारख्या विषयांवर ‘टीस’च्या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे.
तज्ज्ञांच्या मते, मुंबईतल्या प्रत्येक प्रभागात असे प्लांट असायला हवे, म्हणजे जैविक कचर्याचे प्रमाण कमी होऊन समस्यांची व्याप्ती थोड्या फार प्रमाणात का होईना कमी करता येईल. पण, मुंबईबाहेर असे प्लांट नेण्याचे ठरविल्यास त्याला तेथील स्थानिकांकडून विरोध होण्याची शक्यता आहेच. त्यामुळे या समस्येकडे आज अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
देवनारचे स्थानिक नागरिक गरीब आहेत व त्यांची मुले कुपोषणाने बेजार आहेत. शिवाय घरात माणसे गर्दीमध्ये राहतात व त्यांना मोकळी जागा मिळत नाही. अशा त्यांच्या अंतर्गत समस्याही सोडवण्याकरिता हे देवनार डम्पिंग ग्राऊंडही इतरत्र स्थलांतरित करता येईल का, याचाही विचार व्हायला हवा, असे तज्ज्ञ मानतात.
‘बायो वेस्ट इन्सिनरटेर’ प्लांट विषयी...
हा प्लांट ‘एसएमएस एन्वोक्लिन प्रा. लि.’ नामक संस्था चालवते. हे कंत्राट मुंबई महानगरपालिकेने व ’एमपीसीबी’ने त्यांच्याकडे 2009 सालापासून दिले आहे. पालिका अधिकारी म्हणतात की, प्रथम मुंबईत असे तीन प्लांट उभे करायचे नियोजन होते. (शहर, पश्चिम उपनगर व पूर्व उपनगर) परंतु, योग्य जागा न मिळाल्याने गोवंडीमध्ये एकाच ठिकाणी असा प्लांट उभारला गेला. गेल्या वर्षी तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही या भागाला भेट दिली होती. त्यांचे म्हणणे पडले की, हा प्लांट खालापूरला स्थलांतरित करावा. या स्थलांतरणाच्या प्रस्तावाला जून 2023 पर्यंत मुदतवाढ द्यावी लागत आहे. कारण, पर्यावरण संस्थेकडून याला मंजुरी मिळायला हवी. डम्पिंग ग्राऊंड प्लांट व ‘बायो मेडिकल इन्सिनरेटर’ प्लांट या दोन्हीच्या क्षमता, कचर्याचे होणारे वर्गीकरण यामध्ये यासाठी पुरेशी स्पष्टता असणे तितकेच गरजेचे आहे.
‘इन्सिनरेटर’ प्लांटचे संचालक अमित निलावर म्हणतात की, “स्थानिक लोकांची समजूत असते की, धुराच्या चिमणीमधून गॅस निघाला म्हणजे हवा दूषित होते. पण, धूर निघतो, हा एक हा प्लांट शिफ्ट करण्याचा टप्पा मानला जातो. त्यामुळे वस्तीला त्रास होत नाही. आम्ही प्लांटमधील सर्व गोष्टींची चाचणी करून घेतो व या प्लांटमध्ये आम्ही ‘क्वालिटी कंट्रोल’ प्रणालींच्या साहाय्याने उत्तम दर्जा ठेवतो. चिमणीमधून धूर बाहेर आला म्हणजे हवेत विषारी वायू येणार, असा जो समज आहे तो चुकीचा आहे. आमच्या प्लांटमुळे आरोग्य बिघडण्याचे थांबणार आहे. ‘कोविड’च्या काळात ‘बायो वेस्ट’ची व्याप्ती खूप वाढली होती, पण ते संकट आता अर्ध्याहून कमी झाले आहे.”
महापालिका व ‘एमपीसीबी’च्या अधिकार्यांचे म्हणणे आहे की, “आम्ही या ’इन्सिनरेटर’च्या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. या ’बायो वेस्ट’ला वेगळ्या प्रकारच्या प्रक्रियेची गरज पडते तशी आम्ही ती देत आहोत. ती प्रक्रिया दिली नाही, तर सर्व घनकचर्याकरिता समस्या निर्माण होऊ शकते. देवनारला समुद्र जवळ नसल्याने वार्याचा वेग कमी असतो व ‘पार्टिक्युलेट मॅटर’ जास्त वेळ तरंगत राहतात. हवेच्या निर्देशांकावरून हवेचा दर्जा खालावला आहे, असेच दाखविले जात आहे.”
‘एमपीसीबी’च्या अधिकार्यांनी ’बायो वेस्ट इन्सिनरेटर’च्या चालकांना आदेश दिले आहेत की, 50 टक्के ‘बायो वेस्ट’ प्रक्रिया काम तळोजाला लवकर स्थलांतरित करावे. हे ‘इन्सिनरेटर’ खालापूरला की तळोजाला कुठे स्थलांतरित करावे, ते पालिकेने नक्की करावे.
गोवंडी व देवनारचा परिसर
‘एम पूर्व’ प्रभागातील गोवंडी परिसर हा डम्पिंगकरिता 132 हेक्टरमधील भाग वापरला जातो. हा ‘डम्पिंग’ प्रदेश झोपडपट्ट्यांच्या दाट वस्तीच्या पाठी वसलेला आहे. ही झोपडपट्टीची वस्ती गरीब लोकांची आहे व कोरोना काळात हे क्षेत्र फार वाईट प्रकारच्या संकटात सापडले होते.
या झोपडपट्टीत एकूण 250 झोपडपट्ट्या आहेत. देवनारला 2500 टन घनकचरा डम्पिंग ग्राऊंड प्रक्रियेने रोज फेकला जातो. ’एसएमएस एन्वोक्लिन’ कंपनीचे ‘वेस्ट इन्सिनरेटर’ प्लांट देवनार डम्पिंग ग्राऊंडपासून काही किमी अंतरावर आहे. ते चालू करायला मुंबई महापालिका व ‘एमपीसीबी’ या दोन्ही संस्थांनी 2009 पासून मान्यता दिली आहे.
असे हे गोवंडी-देवनार क्षेत्र ‘टीबी’च्या रुग्णांसाठी एक मोठे ‘हॉटस्पॉट’ बनले आहे, अशी लोकांची धारणा झाली आहे. संपूर्ण कोरोनाच्या काळात या ’इन्सिनरेटर’च्या ठिकाणी अनेक ट्रक मुंबईतील सर्व ठिकाणचा जैवकचरा ‘बायो वेस्ट’ या एकट्या ’इन्सिनरेटर’कडे पाठविले जात होते. त्यामुळे हे ठिकाण फार महत्त्वाचे ठरले होते. या ‘बायोवेस्ट’करिता ’इन्सिनरेटर’च्या प्रक्रियेची गरज होती. पालिकेने हे ’इन्सिनरेटर’ विशिष्ट काळामध्ये स्थलांतरित करायचे ठरविले आहे. हा प्लांट स्थलांतरित झाला की रहिवाशांची समस्या सुटेल, ही कल्पना पण चुकीची आहे.
कारण, मुळात देवनार ‘डम्पिंग ग्राऊंड’ जागेची क्षमता संपूनही काही वर्षे लोटली आहेत व ही जागा महापालिकेकडून बंद करायची, असे ठरले आहे. हे ‘डम्पिंग ग्राऊंड’चे काम त्यांनी लवकर बंद करण्यास घ्यायला हवे व पर्यायी व्यवस्था कार्यान्वित करावी.