जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. कारण एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा भाजपचे चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांनी पराभव केला. भाजपा (शिंदे गटाचे)शेतकरी विकास पॅनलने २० पैकी १६ जागांवर विजय मिळवला आहे. एकनाथ खडसे यांचे महाविकास आघाडीचे सहकार पॅनलला केवळ ४ जागा मिळाल्या आहे.
२०२२-२७ या पंचवार्षिकासाठी ही निवडणूक होती.२० संचालकांची निवड करण्यात येणार होती. भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मंदाकिनी खडसे यांचा तब्बल ७६ मतांनी पराभव केला आहे. दूध संघाच्या निवडणुकीत आमदार चव्हाण यांना २५५ मते मिळाली आहेत, तर मंदाकिनी खडसे यांना १७९ मते मिळाली आहेत. त्यामुळे खडसे यांच्यावर पराभवाची नामुष्की आली आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत खडसे यांचा गृहतालुका असलेला मुक्ताईनगरमधून मंदाकिनी खडसे यांना चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आव्हान दिले होते.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलने २० पैकी १६ जागांवर विजय मिळवला आहे. तर एकनाथ खडसेंच्या महाविकास आघाडी सहकार पॅनलला केवळ ४ जागाच जिंकता आल्यायत. मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, भाजप आमदार मंगेश चव्हाण, शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील हे दिग्गज नेते विजयी झालेत. तर एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या पराभवावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर जोरदार निशाणा साधला आहे. "एकनाथ खडसे तुम्ही राष्ट्रवादी संपवायला निघालात, शरद पवारांनी तुम्हाला दिलेली एमएलसी पण वापस घेतली पाहिजे" अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंवर केली आहे.