संगीत, विज्ञानातील ‘मराठे’शाही

09 Nov 2022 21:08:10
mukund


जागतिक विज्ञान दिननिमित्त ज्ञान-विज्ञान, संगीत, कला आणि खगोल क्षेत्रात ‘मराठे’शाहीचा ठसा उमटविणारे बहुआयामी मुकुंद राम मराठे यांच्याविषयी...

संगीतभूषण पं. राम मराठे यांचे सुपुत्र असलेले मुकुंद मराठे यांचा जन्म मुंबईत दादर येथे झाला. त्यांच्या वडिलांनी कुटुंबासाठी मोठी जागा हवी, म्हणून ठाणे गाठले.तेव्हा, मुकुंद दहा वर्षांचे होते. कोपरीतील ’नादब्रह्म’मध्ये मराठे कुटुंब वास्तव्यास आले. गानकोकिळा लता मंगेशकर, बिस्मिल्ला खाँ आदींसारखी नामवंत कलावंत मंडळी त्यांच्या घरी येत. वडिलांसह अन्य थोरामोठ्यांच्या सहवासातून मुकुंद यांना संगीत आणि कलेचे बाळकडू घरातच मिळाले.





बालपणापासून संस्कारी असलेल्या मुकुंद यांचे माध्यमिक शिक्षण ठाण्यातील मो. ह. विद्यालयात, तर उच्चशिक्षण ‘ठाणे कॉलेज’ आणि ‘रुईया’मध्ये झाले. 1980 मध्ये खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांचे व्याख्यान ऐकून ‘खगोल’ विषयात रूची वाढल्याने एकाचवेळी तनपुरा आणि दुर्बीण खांद्यावर लटकवून संगीत आणि विज्ञानाचा अत्युच्च मेळ घालणारे मुकुंद बहुदा पहिलेच असावेत. 1983 ला ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मधून ‘एमएससी’ला पहिले येण्याचा मान मिळवत मुकुंद यांनी सुवर्णपदकासह पदव्युत्तर पदवी मिळवली. संगीताच्या वारशाला विज्ञानाची जोड मिळाल्यामुळे मग, मुकुंद यांनी मागे वळून पाहिलेच नाही.





शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, गायक नट, निर्माता, अभिनेता तबलावादक, संवादक, लेखक, व्याख्याते, खगोल, अंतराळतज्ज्ञ म्हणून मुकुंद ज्ञात झाले. शास्त्रीय संगीत गायनात हातखंडा, तर मराठी संगीत रंगभूमीवरील गायक नट, संगीत मार्गदर्शक, नाट्यदिग्दर्शक म्हणूनही त्यांचे योगदान अमूल्य आहे. संगीत रंगभूमीच्या इतिहासाचा गाढा अभ्यास व अनेक आठवणी, किस्से त्यांच्या संग्रही व मुखोद्गत आहेत.





उत्तम लोकसंग्रह व निर्मळ स्वभाव असणारे मुकुंद मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असतात. व्यावसायिक व प्रायोगिक नाटकात मुकुंद यांनी ‘सुवर्णतुला’, ‘संशयकल्लोळ’,‘शारदा’, ‘सौभद्र’, ‘मृच्छकटिक’, ‘जय जय गौरी शंकर’, ‘मेघमल्हार’, ‘एकच प्याला’, ‘मत्स्यगंधा’ आदी संगीत नाटकांसह हिंदी व संस्कृत अशा तब्बल 40 नाटकांतून काम केले आहे.




मराठी, इंग्रजी दैनिके तसेच साप्ताहिकात त्यांनी लेखन केले आहे. आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार म्हणून कार्य बजावल्यानंतर मुकुंद यांनी संगीत संकल्पनांवर उत्तमोत्तम निर्मिती केल्या. त्यामध्ये ‘यमन मन भावन’, ‘कीबोर्ड वाद्य कचेरी’, ‘साठोत्तर नाट्यसंगीत’, ‘नांदी गुणगान’, ‘आठवणीतील सूर’, ‘रियाझ कार्यशाळा’, ‘जोड अनवट राग’, ‘बिहागचे सगेसोयरे’, ‘रामरंग’, ‘पाईक परंपरेचे’ यांचा समावेश आहे. गुरू पं. राम मराठे, पं. उल्हास कशाळकर, प्रदीप नाटेकर, यशवंत देव, स्नेहल भाटकर तसेच नाट्यगुरु गोविंदराव पटवर्धन, तुलसीदास बोरकर, भालचंद्र पेंढारकर, दाजी भाटवडेकर, शुभदा दादरकर, तबला गुरू पं. पंढरीनाथ नागेशकर, पं. भाई गायतोंडे व पखवाज गुरू पं. अर्जुन शेजवळ आदींच्या प्रेरणेतून घडल्याचे मुकुंद सांगतात.





संगीत व तबला दोहोंत ते उच्च श्रेणीमध्ये विशारद असून, संगीत नाटकांना व संगीत कार्यक्रमांना तबलासाथही केली आहे. याव्यतिरिक्त खगोल अंतराळतज्ज्ञ, वैज्ञानिक म्हणून सर्वश्रुत असलेल्या मुकुंद यांनी मुंबई विद्यापीठासह वरळीच्या नेहरू ‘प्लॅनेटोरियम’मध्ये मानद खगोल व्याख्याते म्हणूनदेखील काम केले आहे. अंतराळ खगोलशास्त्र आणि संगीतविषयक व्याख्याने देणार्‍या मुकुंद यांनी वडील पं. राम मराठे यांच्यावरील ’नादब्रह्म स्वरयोगी’ हा चरित्रग्रंथ संपादित केला आहे.





दूरदर्शनसाठी विविध संस्थांची संगीत नाटके व अनेक कार्यक्रमांचे समन्वयक व सल्लागार म्हणून कामगिरी बजावणारे मुकुंद, खगोल मंडळ या संस्थेचे माजी अध्यक्ष व आकाश निरीक्षक आहेत. शिवाय ‘इस्रो’मध्ये प्रकल्प अभ्यास आणि संशोधनपर कार्यातही त्यांचा सहभाग असतो. मुकुंद मराठे यांना नुकताच अत्यंत मानाचा असा ‘बालगंधर्व पुरस्कार’ त्यांना विद्यावाचस्पती पं. डॉ. शंकर अभ्यंकर यांच्याहस्ते पुण्यात प्रदान करण्यात आला.






कलाक्षेत्र चेन्नईसारख्या मातब्बर संस्थेत कार्यकारिणी सदस्य असून नुकतीच, केंद्र सरकारच्या सर्व भाषिक चित्रपट सेन्सॉर बोर्डावर त्यांची नेमणूक झाली आहे. ‘ठाणे गौरव’, ‘गानवर्धन’, ’कलासाधक पुरस्कार’, ’उत्कृष्ट विज्ञान प्रचारक’ आदींनी गौरवलेले मुकुंद ‘संस्कार भारती’च्या कोकण प्रांताचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘संस्कार भारती’चे अनेक सांगीतिक उपक्रम त्यांनी यशस्वी करून दाखवले आहेत.





 एकुलती एक कन्या अभिनेत्री-गायिका स्वरांगी हिचा विवाह सामाजिक बांधिलकी जपत अल्पखर्चात करून उर्वरित निधी त्यांनी विविध सामजिक, सांगीतिक संस्थांना अर्पण केला. महाराष्ट्र शासन तसेच इतर ठिकाणी नाट्य, चित्रपट ज्युरी, परीक्षक म्हणून त्यांनी कामे केलेली असून त्यांची पुढची पिढी ‘मराठे’शाहीची ही संगीत परंपरा व सामाजिक बांधिलकी समर्थपणे चालवत आहे.’संगीत मंदारमाला’ हे नाट्यपुष्प युवासंचात सादर करण्यासाठी ते झटत आहेत. अशा संगीत व विज्ञान क्षेत्राला वाहून घेतलेल्या मुकुंद यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’ च्या शुभेच्छा!




-दीपक शेलार



Powered By Sangraha 9.0