मतदानासाठी ‘इसुदान’ – आम आदमी पक्षाची स्ट्रॅटेजी

    09-Nov-2022   
Total Views |
ESUDAN
नवी दिल्ली, पार्थ कपोले: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) पत्रकार – संपादक इसुदान गढवी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहिर केले आहे. गुजरातच्या नागरिकांसाठी ‘ओळखीचा चेहरा’ असलेल्या गढवी यांच्याद्वारे गुजरातमध्ये काँग्रेसची जागा घेण्यासाठी आपने जय्यत तयारी केल्याचे स्पष्ट होत आहे.
 
 
 
गुजरातमध्ये यंदा सत्ताधारी भाजपसमोर ‘आप’ने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न चालविला आहे. गुजरात काँग्रेसची स्थिती अतिशय बिकट असल्याने सध्या तरी पक्ष स्पर्धेत नाही. त्यामुळे काँग्रेसची जागा घेण्यासाठी आप सज्ज आहे. आपने पंजाबप्रमाणेच गुजरातमध्येही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहिर केला आहे. राज्यातील प्रसारमाध्यम विश्वातील प्रमुख नाव असलेल्या इसुदान गढवी यांना ‘आप’ने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनविले आहे. गढवी यांच्या चेहऱ्याचा लाभ घेण्याची ‘आप’चा अतिशय स्पष्ट मानस आहे. कारण, गुजरातमधील ‘व्ही टिव्ही’ या प्रादेशिक वृत्तवाहिनीवर महामंथन या कार्यक्रमाद्वारे गढवी यांनी आपली एक प्रतिमा गुजरातमध्ये निर्माण केली आहे. गुजरातमधील सर्वपक्षीय प्रस्थापित आणि नेहमीच्या चेहऱ्यांमध्ये गढवी यांचा नवा आणि स्वच्छ चेहरा जनतेला आकर्षित करून घेईल, अशी ‘आप’ची अपेक्षा आहे.


अर्थात, गुजरातमध्ये थेट सत्ताच प्राप्त होणार असा विचार अरविंद केजरीवाल यांच्यासारखा कुशल राजकारणी निश्चित करणार नाही. गुजरातमध्ये अन्य समुदायाच्या तुलनेत राज्यात अल्पसंख्य असलेल्या गढवी – चारण या समुदायातून इसुदान गढवी येतात. त्यामुळे अन्य नेत्यांप्रमाणे त्यांच्याकडे स्वत:ची अशी मतपेढीही नाही. मात्र, गढवी यांचा नवा चेहरा, भाजपची २७ वर्षांची राजवट, त्यामुळे निर्माण झालेली अँटीइन्कम्बन्सी, राज्यातील कंत्राटी नोकरभरतीचा गंभीर प्रश्न, सरकारी भरतीच्या परिक्षांमध्ये झालेला गोंधळ या सर्व मुद्द्यांवर आपने अतिशय नियोजनबद्धपणे प्रचार चालविला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कंत्राटी कर्मचारी, आरोग्यसेवक आणि सरकारी भरतीतील गोंधळामुळे त्रस्त मतदारांना आप आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी पंजाब निवडणुकीत वापरलेल्या गॅरंटी कार्ड धोरणाचाही वापर केला जात आहे. या निवडणुकीत ‘आप’ला ६ टक्के मते प्राप्त झाल्यास त्यांना राष्ट्रीय पक्ष असा दर्जाही प्राप्त होणार आहे.

 
या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचाराची सर्व मदार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे आहे. भाजपने प्रामुख्याने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा प्रचार चालविला आहे. गढवी यांच्याविरोधात भाजपने थेट प्रचार करण्यास अद्याप तरी प्रारंभ केलेला नाही. मात्र, आपचा असलेला धोका भाजपने ओळखला आहे. त्यामुळे यावेळी प्रथमच उमेदवार निवड समिती स्थापन करून उमेदवारांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्थानिक समीकरणे, मतदारसंघातील पक्षाची स्थिती, तेथील समस्या, मतदारांची समीकरणे आदी सर्वांचा विचार केला जात आहे. या व्यवस्थेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बारकाईने नजर आहे.

सुरत महानगरपालिका निवडणूक ठरली ‘आप’साठी गेमचेंजर


गुजरातमधील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या सुरतच्या महानगरपालिकेची २०२१ सालची निवडणूक ‘आप’साठी अतिशय महत्वाची ठरली. या निवडणुकीमध्ये आपला तब्बल २७ जागांवर विजय मिळाला. सुरत हा पाटिदार आंदोलनाचा त्यावेळी बालेकिल्ला मानला जात होता. या निवडणुकीमध्ये पाटिदार अनामत आंदोलन समिती अर्थात ‘पास’ने आपच्या पारड्यात आपले वजन टाकले होते. या निवडणुकीमध्ये चमकदार विजय मिळाल्यानंतरच्या विजयी शोभायात्रेमध्ये अरविंद केजरीवाल सहभागी झाले होते आणि त्यांनी गुजरातमध्ये पक्ष अधिक सक्रिय करण्याचा निर्णय घेतला होता.


नेतृत्वाची फळी नसणे हे भाजपसाठी त्रासदायक


गुजरातमध्ये १९९५ सालापासून भाजपचा एकछत्री अंमल आहे. त्यातही २००२ ते २०१३ असे ११ वर्षे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्रीपदी होते. त्यामुळे गुजरात आणि भाजप हे एक अभेद्य समीकरण बनले आहे. अर्थात, २००२ सालापासून दर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या जागा घटत असल्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गतवेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ९९ जागा प्राप्त होऊन भाजपला सत्ता टिकवण्यास यश आले होते. मात्र, गुजरातमध्ये आनंदीबेन पटेल वगळता अन्य जनाधार असलेले नेतृत्व किंवा अथवा नेतृत्वाची फळी भाजपकडे नाही. त्यामुळे त्याचा फटका भाजपला निश्चितच बसत आहे, असे मत गुजरातमधील वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हरिश गुर्जर यांनी व्यक्त केले आहे.
 
 
  
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.