काय आहे पत्राचाळ घोटाळा ज्यात मिळाला राऊतांना जामीन?

    09-Nov-2022
Total Views |
sanjay raut
 
मुंबई : गोरेगावमधील पत्राचाळ जमीन घोटाळा १,०३४ कोटी रुपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ‘ईडी’च्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या ‘गुरुआशिष कन्स्ट्रक्शन’ कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.या घोटाळ्यात संजय राऊत यांचा ही समावेश आहे .


संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणार्‍या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. ‘गुरुआशिष कन्स्ट्रक्शन’ला पत्राचाळचे तीन हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूंना द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट ‘म्हाडा’ आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. परंतु, २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी ‘गुरूआशिष कन्स्ट्रक्शन’ कंपनीचे २५ टक्के शेअर ‘एचडीआयएल’ला विकले. यानंतर २०११, २०१२ आणि २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.



 
या जमिनीवर बँकेकडून एक हजार कोटींहून जास्त रकमेचे कर्जही घेण्यात आले होते. याच रकमेतून संजय राऊत यांची पत्नी वर्ष राऊत यांना २०१० साली ५५ लाखांचे बिनव्याजी कर्ज देण्यात आले होते आणि हा प्रकल्प रखडला. पत्राचाळ रहिवाशांनी यासंदर्भात ‘म्हाडा’कडे तक्रार केली. ‘म्हाडा’ आणि खेरवाडी पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली. ‘म्हाडा’ने नोंदवलेल्या ‘एफआयआर’च्या आधारावर ‘ईडी’ने याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. यात ‘गुरुआशिष कंपनी’, संजय राऊत ,सारंग वाधवान, राकेश कुमार वाधवान यांचाही समावेश असल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे.

गोरेगावच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने 31 जुलै रोजी राऊत यांना अटक केली होती. सुरुवातीला पोलिस कोठडी व त्यानंतर दोनदा संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली होती. त्यामुळे आज राऊत यांना जामीन मिळण्याची शक्यता होती. त्यानुसार अखेर राऊत यांना जामीन मिळाला.

 
  
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.