दहशतवादी संघटनांना पैसे पुरविण्यामध्ये पाकिस्तान सहभागी असल्याचे आढळून आले आहे. अमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर मार्गांचा वापर करून पैशांचे हस्तांतरण करून पाकिस्तानकडून अशा देशविघातक शक्तींना खतपाणी घातले जात आहे. ‘सीख्ज फॉर जस्टीस’ या संघटनेच्या संकेतस्थळ आणि कराचीस्थित संकेतस्थळ यांच्यात माहितीची देवाणघेवाण चालत असल्याचे दिसून आले आहे.
पाकिस्तान आणि त्या देशाची ‘आयएसआय’ ही संघटना कित्येक वर्षांपासून खलिस्तानवादी तत्त्वांना हवी ती मदत करीत असल्याचे जगजाहीर आहे. खलिस्तानवादी तत्त्वांना हाताशी धरून भारतात असंतोष कसा माजेल, असा प्रयत्न पाकिस्तानकडून नेहमीच केला जात असतो. दिल्लीच्या सीमांवर प्रदीर्घ काळ जे शेतकरी आंदोलन झाले, त्या आंदोलनास खलिस्तानवाद्यांची फूस असल्याचे उघड झाले होते. आंदोलनात सहभागी झालेल्या काहींच्या वाहनांवर भिंद्रनवाले याची पोस्टर्स झळकल्याचे अनेकांच्या पाहण्यात आले होते. तसेच, ‘सीख्ज फॉर जस्टीस’ या संघटनेने, या आंदोलनाच्या दरम्यान जो कोणी लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकवेल त्यास मोठे बक्षीस देण्याचे घोषित केले होते.
26 जानेवारीच्या दिवशी शेतकरी आंदोलनात घुसलेल्या काही असामाजिक तत्त्वांनी लाल किल्ल्यामध्ये आणि परिसरात जो धुडगूस घातला, तो देशातील नागरिकांच्या अजूनही चांगलाच स्मरणात असेल. काही वर्षांपूर्वी खलिस्तानवाद्यांचा बीमोड करण्यामध्ये सरकारला यश आले असले तरी ती विचारसरणी अद्याप पूर्णपणे नष्ट झालेली नाही. या खलिस्तानवादी तत्त्वांना देशातून आणि विदेशातून रसद पुरविली जात आहे. दहशतवादी शीख संघटना ‘बब्बर खालसा’, ‘खलिस्तान कमांडो फोर्स’, ‘खलिस्तान लिबरेशन फोर्स’ अशा संघटनांना 1980च्या दशकात पाकिस्तानकडून शस्त्रास्त्रे, अन्य दारुगोळा पुरविला जात होता, हे सर्वविदित आहे.
खलिस्तानवाद्यांना भारताच्या भूमीत स्वतंत्र देश हवा आहे आणि त्यासाठी त्यांना ब्रिटन आणि कॅनडा या देशातील मुस्लिमांचाही पाठिंबा मिळत आहे. अलीकडेच इंग्लंडमध्ये हिंदू आणि मुस्लिमांमध्ये ज्या दंगली झाल्या, त्यातील मुस्लीम दंगेखोरांना खलिस्तानवाद्यांची चिथावणी होती, हे दिसून आले आहे. पाकिस्तान आणि अन्य देशांमधून कार्यरत असलेल्या नऊ खलिस्तानवाद्यांना भारताच्या गृहमंत्रालयाने बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली दहशतवादी ठरविले आहे. दहशतवादी संघटनांना पैसे पुरविण्यामध्ये पाकिस्तान सहभागी असल्याचे आढळून आले आहे. अमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर मार्गांचा वापर करून पैशांचे हस्तांतरण करून पाकिस्तानकडून अशा देशविघातक शक्तींना खतपाणी घातले जात आहे. ‘सीख्ज फॉर जस्टीस’ या संघटनेच्या संकेतस्थळ आणि कराचीस्थित संकेतस्थळ यांच्यात माहितीची देवाणघेवाण चालत असल्याचे दिसून आले आहे.
पाकिस्तानमध्ये खलिस्तानचे जे समर्थक आहेत ती भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. या खलिस्तान समर्थकांनी पाकिस्तानस्थित विविध गुरूद्वारांमध्ये आपला चांगलाच जम बसविला आहे. या गुरूद्वारांना भेट देण्यासाठी येणार्या भारतीय शिखांवर प्रभाव पाडण्याचे काम हे खलिस्तानवादी करीत असतात. पाकिस्तानच्या पाठिंब्यामुळेच खलिस्तान समर्थक तेथे राजरोसपणे वावरत असल्याचे उघड आहे. कर्तारपूर मार्गिका प्रकल्पामधील पाकिस्तानी गटामध्ये असे खलिस्तानवादी झळकले होते. त्यावेळी भारताने आपला निषेध नोंदविला होता.
1984 मध्ये रविंदरसिंग पिंका या खलिस्तानी दहशतवाद्याने आपल्या आठ साथीदारांच्या मदतीने श्रीनगरहून ‘इंडियन एअरलाइन्स’च्या विमानाचे अपहरण करून ते विमान लाहोरला नेले होते. पिंका आणि त्याच्या आठ साथीदारांना त्या गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पण, नंतर दया दाखवून त्या सर्वांची सुटका करण्यात आली! आता हाच पिंका उजळ माथ्याने गुरूद्वारा पंजासाहिबमध्ये भारतातून तेथे गेलेल्या शीख भाविकांमध्ये मिसळत होता. खलिस्तानी अतिरेक्यांना पाकिस्तानकडून कसे पाठीशी घातले जाते त्याचे हे एक उदाहरण आहे.
अकाल तख्ताचे जथेदार ज्ञानी हरप्रितसिंग यांनी पाकिस्तानमधील गुरूद्वारास भेट दिली असता त्यांच्यासमवेत व्हिडिओ काढण्याची संधी पिंकाने सोडली नाही. त्यानंतर समाजमाध्यमांवर हा व्हिडिओ ‘व्हायरल’झाला होता. शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीच्या पदाधिकार्यांना यासंदर्भात माहिती दिल्यावर सदर व्हिडिओ संकेतस्थळावरून त्वरित हटविण्यात आला. पण, तोपर्यंत हा व्हिडिओ सर्वदूर गेला होता. खलिस्तानचे समर्थक असलेले दहशतवादी पाकिस्तानमधील ऐतिहासिक गुरूद्वारांमध्ये अनेकदा दिसून आले आहेत.
शीख भाविकांवर खलिस्तानी विचारसरणीचा प्रभाव पाडण्याचे काम ते करीत आहेत. पाकिस्तान सरकार, पाकिस्तानची ‘आयएसआय’ ही संघटना खलिस्तानवाद्यांच्या मागे उभी असल्यानेच हे खलिस्तानी अतिरेकी पाकिस्तानात मुक्तपणे संचार करीत आहेत हे स्पष्ट आहे. पण भारत सरकारचे या खलिस्तानी अतिरेक्यांकडे, त्यांना पाठबळ देणार्या पाकिस्तान व ‘आयएसआय’कडे बारकाईने लक्ष आहे. खलिस्तानवाद्यांचे देश तोडण्याचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत हे त्यांनी पक्के लक्षात ठेवावे!
विजयन यांचा वादग्रस्त विदेश दौरा
केरळमधील डाव्या आघाडी सरकारचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे नेहमीच राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. राज्यपालांनी काही आदेश दिला की ते धाब्यावर बसविण्याची प्रवृत्ती या डाव्या सरकारची आहे की काय, असे वाटण्यासारखी स्थिती केरळमध्ये दिसून येत आहे. राज्यपालांनी घेतलेल्या काही निर्णयाविरूद्ध सरकार पुरस्कृत निदर्शने करण्यापर्यंत या डाव्या आघाडीची मजल गेली आहे. असेच एक उदाहरण अलीकडे घडले. केरळचे मुख्यमंत्री विजयन आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही सहकारी विदेश दौर्यावर गेले होते. आपल्या या दौर्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना कळविणे आवश्यक असते. पण, विजयन महाशयांना तसे काही करणे गरजेचे वाटले नाही. मुख्यमंत्री विजयन हे दि. 3 ते 13 ऑक्टोबर दरम्यान चार दिवसांच्या विदेश दौर्यावर होते. पण यासंदर्भात राज्यपालांना काहीही कळविण्यात आले नाही.
दौरा करून आल्यानंतर त्या दौर्यासंदर्भांत राज्यपालांना काही माहिती देण्यात आली नाही किंवा त्यांच्याशी चर्चा करण्यात आली नाही. राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांना ही सर्व माहिती देणे आवश्यक असताना विजयन यांनी या सर्व गोष्टी धाब्यावर बसविल्या. मुख्यमंत्री आणि त्यांच्या काही सहकार्यांच्या या वर्तनाबद्दल राज्यपालांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी लेखी वा तोंडी स्वरूपात या विदेश दौर्याची माहिती आपणास दिली नाही, याचा उल्लेख त्या पत्रात करण्यात आला आहे. केरळमधील डाव्या आघाडीचे लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले सरकार लोकशाहीचे संकेत कसे गुंडाळून ठेवत आहे ते या घटनेवरून सर्वांच्याच लक्षात यावे! डाव्या आघाडी सरकारचा मुजोरपणा या घटनेवरून दिसून आला आहे.
‘भारतमाता की जय’म्हटल्याबद्दल शिक्षा!
मध्य प्रदेशातील गुणा जिल्ह्यात असलेल्या ‘ख्राईस्ट सिनिअर सेकंडरी स्कूल’मध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने राष्ट्रगीतासाठी सर्व विद्यार्थी एकत्र आले असता राष्ट्रगीत झाल्यावर ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा दिल्याबद्दल त्या विद्यार्थ्यास चार तास वर्गामध्ये जमिनीवर बसून राहण्याची शिक्षा देण्यात आली. शिवांश जैन नावाच्या या विद्यार्थ्यास शाळेतील अन्य शिक्षकांनीही फैलावर घेतले. ‘तू वर्गाचे नाव खराब करीत आहेस,’ असे त्यास त्याच्या वर्गशिक्षकाने सुनावले. त्यानंतर घरी परतल्यावर शिवांशने स्वतःस घरात कोंडून घेतले. काही खाल्ले नाही. शाळेतील सर्व घटना त्याने आपल्या आईला सांगितली. या घटनेच्या निषेधार्थ काही सामाजिक संघटनांनी आणि काही पालकांनी शाळेसमोर निदर्शने केली, अशी माहिती गुणा जिल्ह्याचे साहाय्यक जिल्हा दंडाधिकारी वीरेंद्रसिंह बघेल यांनी दिली. पालकांच्या तक्रारीनंतर या घटनेची चौकशी केली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, सदर विद्यार्थ्याने देशप्रेमाच्या भावनेने ही घोषणा दिली नव्हती, तर गंमत म्हणून दिली होती, असे त्या शाळेचे मुख्याध्यापक फादर थॉमस यांनी म्हटले आहे. या प्रकरणी शाळेची शिस्तभंग समिती तपास करीत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. पण, ही घटना लक्षात घेऊन शाळेच्या व्यवस्थापनाने एक पत्रक काढून, अशा घटनांची भविष्यात पुनरावृत्ती होणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच यापुढे राष्ट्रगीत झाल्यानंतर ‘भारतमाता की जय’ची घोषणा केली जाईल, असेही व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले. शाळेच्या व्यवस्थापनाने उशिरा का होईना आपली चूक सुधारली हेही नसे थोडके!