उगवत्या पिढीला प्रेरणा देऊन किती समर्पित जीवन जगता येते, आपल्या मातृभूमीसाठी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही शेतकरी या पोशिंद्यासाठी किती महान कार्य करता येते, पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जीवनपट हे त्याचे प्रात्यक्षिक आहे. आज, दि. 7 नोव्हेंबर या त्यांच्या 138वी जयंतीने त्यांच्या कार्याचे स्मरण करणारा हा लेख...
इयत्ता दुसरीला शिवाजी महाराजांचा पाठ शिकवणार्या वैद्य सरांनी महाराजांचा उल्लेख ‘दरोडेखोर’ असा केला. दुसरीत शिकणार्या मुलांची अवस्थाच अशी असते की, गुरुजी म्हणतील ती पूर्व दिशा, म्हणून त्यांच्या सुरात सूर मिसळविणे महत्त्वाचे. त्यांना कुठे असतात स्वतःची मतं? त्या मतावर ठाम राहून आपल्या शिक्षकालाते विरोध करतील, याची सुतराम शक्यताच नव्हती. पण, त्यादिवशी पालकवाडी (वर्धा) येथे क्राडक शाळेत अध्यापन करणार्या वैद्य सरांना वेगळा अनुभव मिळणार होता. तो बालक अतिशय त्वेषाने वैद्य सरांच्या समोर गेला. त्याच्या डोळ्यांत अंगार फुलत होता. चेहर्यावर त्वेष ओसंडून वाहत होता. रागाने त्याचे सर्वांग लाही लाही झाले.
इतिहासाचे पुस्तक त्याने सरांच्या पुढ्यात टराटरा फाडले आणि रागाने तो बाहेर निघून गेला. वैद्य सर पाहताच राहिले. छत्रपती शिवरायांना तो आपले दैवत समजत होता. ‘माझे गुरुजी मला वंदनीय आहेतच, पण माझ्या दैवतांचा ते अपमान करणार असतील, तर त्यांनी शिवचरित्र नव्याने अभ्यासण्याची गरज आहे आणि त्यांना इतिहास समजण्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांनीच नवा इतिहास घडवण्याची गरज आहे,’ असा मनोनिश्चय करणारा तो बालक म्हणजेच वर्ध्याचा पांडुरंग सदाशिव खानखोजे, या गदरवीराचा जन्म दि. 7 नोव्हेंबर, 1884 ला मध्य प्रांत आणि बेरार यांच्यात मोडणार्या वर्ध्यातील पालकवाडी येथे झाला.
त्यांच्या विद्यार्थी जीवनातला दुसरा प्रसंग 1902 ला इंग्लंडचा बादशहा एडवर्ड यांच्या राज्यरोहणाचा समारंभ मोठ्या जोमाने सर्व भारतभर साजरा केला जात होता. प्रत्येक शाळेतील मुलांना मिठाईचे वाटप झाले. याप्रसंगी नागपूरच्या निलसिटी हायस्कूल (आताचे ’धनवटे नॅशनल स्कूल’)मध्ये पेढे वाटपाच्या वेळी पांडुरंगाच्या हातावर पेढा येताच त्याने सर्वांसमक्ष तो पेढा भिरकावून दिला. परिणामाची चिंता केली नाही.
या प्रसंगाला जास्त महत्त्व दिले, तर या बालकाचे महत्त्व वाढेल व इंग्रज राजवटीविषयी भारतीयांच्या मनातला रोष वाढेल, हा सम्यक् विचार करून या घटनेला अधिक महत्त्व न देण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर करण्यात आला. वरील दोन्ही प्रसंग पांडुरंग यांच्या मनातील देशप्रेमाची साक्ष देतात. 1902 ला मॅट्रिकच्या इयत्तेत असताना वडिलांनी त्यांचा विवाह करण्याचा निश्चय दुसर्यांदा केला. पण, उच्चशिक्षणाचे समर्पक कारण दाखवून पांडुरंग यांनी विवाहास नकार दिला.
पांडुरंग यांचे आजोबा व्यंकटेश जोशी 1857च्या उठावात सहभागी होते. भूमिगत होण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी मूळ नाव बदलले. पण, त्या नावबदलाला एक इतिहास आहे. एका अत्यंत जुलमी खानाला शोधून त्याचा बंदोबस्त करण्याचे काम त्यांच्या पूर्वजांनी केले. (याने की खान की खोज कियी यह कामसे ओ खानखोजे हो गये।)असा हा पराक्रमाचा इतिहास या घराण्याला लाभला होता. सदाशिवराव यांना पांडुरंग व श्रीराम हे दोन पुत्ररत्न आणि सुंदरी हे कन्यारत्न.
अत्यंत संस्कारशील कुटुंब. पतीपत्नीने मुलावर अत्यंत चांगले संस्कार केले होते. देशभक्तीपर व्याख्यान, कीर्तन, प्रवचन-श्रवणाचा पांडुरंग आणि त्यांच्या मित्रांचा आवडता छंद. त्याचा खूप चांगला परिणाम या सर्व मुलांवर झाला. त्यामुळेच शिवछत्रपतींना आपले दैवत ते समजत होते. त्याचाच परिणाम असा झाला की, वैद्य गुरुजींनी शिवछत्रपतींविषयी वापरलेले अपशब्द ते ऐकू शकला नाही आणि आपला संताप त्यांनी आपल्या कृतीतून व्यक्त केला.
आपल्या मित्रासमवेत पालकवाडीला बालसमाज ही संघटना स्थापन करून हनुमान गडीवर मित्रांसोबत भ्रमंती, योगिक क्रिया, अश्वारोहण कला आत्मसात करणे हा सर्व मित्रांचा आवडता छंद. नागपूर वास्तव्यात आणखी मित्रपरिवार वाढल्यामुळे बालसमाजाचे रूपांतर बांधवसमाजात झाले. परमेश्वराची इच्छा असेल तर स्वातंत्र्यप्राप्ती होईलच, हा भाबडा समज घेऊन जगनारे दैववादी बांधव आपल्या भारत देशात त्यावेळी फार मोठ्या प्रमाणात होते. पण, स्वातंत्र्य मिळेल, ते क्रांतीनेच.शत्रूच्या मनात भय निर्माण झाल्याशिवाय तो सत्ता सोडणार नाही, हा दृढनिश्चय लोकमान्यांच्या प्रत्यक्ष भेटीतून व मित्रपरिवारांच्या संपर्कातून निर्माण झाला होता.
अमेरिकेत शिक्षणासाठी जाताना भारतीय स्वातंत्र्य हा प्रमुख हेतू आपण कधीही विसरता कामा नये, हे त्यांनी पक्के मनाशी ठरविले होते. औपचारिक शिक्षणाबरोबरच लष्करी शिक्षण, तांत्रिक व अभियांत्रिकी शिक्षण महत्त्वाचे, हे त्यांनी खूप लवकर ओळखले होते. अमेरिकेतील लोकशाही व्यवस्था व वैचारिक स्वातंत्र्य आपण समजून घेणे व हजारो वर्षांपासून गुलामगिरीत दडपलेल्या आपल्या बांधवांना सांगणे हे एक ईश्वरी कार्य ठरणार होते. ते कार्य करण्याचा वसा पांडुरंग आणि त्यांच्या मित्रांनी घेतला होता.
हनुमंत नायडू यांच्या ओळखीने आणि स्वामी रामतीर्थ यांच्या प्रमाणपत्राने त्यांना अमेरिकेत वास्तव्य करणे शक्य झाले. लष्करी शिक्षण घेण्यासाठी त्यांचे मित्र गिरीन मुखर्जी यांनी सहकार्य केले. माऊंट टमाल पेस या सैनिकी शाळेत त्यांना महत्प्रयासाने प्रवेश मिळाला. या शिक्षणाची पदविका पूर्ण झाली. वेस्टकोटातील ‘मिलिटरी अकॅडमी’त प्रवेश घेऊन त्यांनी हा अतिशय कठीण अभ्यासक्रम पूर्ण करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ही वार्ता मंडालेच्या तुरुंगात लोकमान्यांना कळवण्यात आली तेव्हा या आपल्या रांगड्या शिष्याचा त्यांना खूप अभिमान वाटला व मनोमन आनंद झाला.
अमेरिकेत असताना त्यांनी एक ‘फिल्म प्रोजेक्टर’ विकत घेतला. त्यावर स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे प्रकाशचित्रे अमेरिकनवासीयांना दाखवणे सुरू केले. भारतीय स्वातंत्र्यलढा सशक्त व्हावा, यासाठी ते ‘इंडियन इंडिपेडन्स लीग’मध्ये सहभागी झाले.1913 ला या लीगची स्थापना झाली. पुढे लाला हरदयाल व सोहनसिंग भकाना यांच्या अध्यक्षतेत ‘गदर पार्टी’ची स्थापना झाली. पांडुरंग खानखोजे ’गदर’चे संस्थापक सदस्य झाले. सशस्त्र क्रांती स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व सर्वांचा पोशिंदा शेतकरी त्याच्यासाठी कृषिक्रांती आवश्यक होती. वॉशिंग्टन विद्यापीठात त्यांनी कृषी विषयात एमएस्सी व पीएच.डी प्राप्त केली. त्याच विद्यापीठात विष्णू गणेश पिंगळे अभियांत्रिकेचा अभ्यास करीत होते. दोघेही समविचारी असल्याने ते लवकरच खूप जवळचे मित्र झाले.
डॉ. खानखोजे युद्धशास्त्राचे पदवीधर असल्यामुळे त्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून त्यांनी ’गदर’ नावाचे वृत्तपत्र मराठी व बंगालीत काढून भारतात पाठवण्याची योजना तयार केली. स्फोटके तयार करण्याचे कौशल्य प्राप्त करून त्यांनी सशस्त्र क्रांती वेगवान बनविली. ‘गदर पार्टी’चे सदस्य पकडून देण्यासाठी अमेरिकेवर ब्रिटनचा दबाव वाढत होता.
काही सदस्य पकडले गेले. पण, काही महत्त्वाचे सदस्य जर्मनी, रशिया, फ्रान्स, स्वीत्झर्लंड आणि स्पेन इथे पसार झाले. पुढे ते कार्य कॅनडा, मेक्सिको जर्मनी व राशियातून सुरू झाले. 1914 ला खानखोजेंनी मॅडम कामाच्या सहकार्याने बर्लिनला राजा महेंद्र प्रतापसिंग यांची भेट घेऊन त्यांच्या माध्यमातून जर्मनीचा सर्वेसर्वा विल्यम कैसर यांची भेट घेऊन भारतीय स्वातंत्रलढ्यासाठी मदत करावी, असा विचार मांडला.
डॉ. खानखोजे यांचा पहिल्या महायुद्धातील प्रत्यक्ष सहभाग त्यांच्या पराक्रमाची साक्ष देतो.ब्रिटिश फौजाविरुद्ध प्रत्यक्ष रणांगणात युद्ध केले. हे युद्ध इराण अफगाणिस्तान सीमेअंतर्गत झाले. या युद्धात खानखोजे जखमी झाले. युद्धकैदी म्हणून ते पकडले गेले. जनरल डायर हा ब्रिटिशांच्या बाजूने सेनापती होता. प्रकृती ठीक झाल्यावर ते गनिमीकाव्याने ते तिथून निसटले. शिवाजी महाराजांचा आदर्श इथे त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडला.
पुढे इराणी सरदारासोबत शेख बनून ते भारतात परतले. सरदारगृहात लोकमान्यांची भेट घेतली. पोलिसांचे अतिशय बारीक लक्ष त्यांच्यावर होते. त्यांना चुकवून भारतात काही दिवस डॉक्टरांना राहता आले.आपल्या आईवडिलांना भेटणे मात्र त्यांना शक्य झाले नाही.ते अफगाणिस्तान बर्लिनमार्गे रशियाला पोहोचून अनेक क्रांतिकारकांच्या मदतीने त्यांनी भारतीय स्वातंत्र्याची योजना आखली. त्यानंतर इराणला जाऊन शिक्षण व कृषी विभागाच्या पदावर कार्यरत झाले.
1921 ला जर्मनीत शेतकरी शोषणविरोधी चळवळीत सहभागी झाले. नंतर मेक्सिकोत परतले. तेथील नागरिकत्व प्राप्त झाल्यावर कृषी संशोधनात आमूलाग्र क्रांती घडवून आणली. वाळवंटी भागात जास्त पीक देणारे बियाणे शोधून काढले. त्याला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली. त्यामुळे अनेक सन्मानाचे मानकरी ते ठरले. स्पेनला व्याख्यानासाठी गेल्यावर मेक्सिकन राजदूत मेड्रीक यांची मेहुनी जेनी सिंड्रेक सोबत परिचय झाला आणि ती त्यांची सहचरिणी झाली.1936 साली हिंदू पद्धतीने त्यांचा विवाह झाला.
विवाहानंतर ‘जेनी’ या ‘जानकी’ झाल्या आणि हिंदू संस्कृतीला शोभेल अशी सहधर्मचारिणी म्हणून पांडुरंगांना साथ दिली. 1949 ला रा. कृ. पाटील यांच्या मध्यस्थीने ते भारतात आले. मेक्सिकोत असलेले सर्व ऐश्वर्य सोडून मायभूमीच्या दिशेने धाव घेणार्या देशभक्ताला एप्रिल 1949 मध्ये मुंबईत पोहोचल्यावर पोलिसांनी अटक केली.ब्रिटिशांनी हे नाव तोपर्यंत काळ्या यादीतच ठेवले होते.
स्वतंत्र भारतातील राज्यकर्त्यांनाही तोपर्यंत त्या नावाचे स्मरण ठेवून काळ्या यादीतून या देशभक्ताचे नाव काढवसे वाटले नाही. या नि:स्वार्थ देशभक्ताचे व जागतिक पातळीवरील कृषितज्ज्ञाच्या ज्ञानाचा, राष्ट्रप्रेमाचा भारतासाठी उपयोग करून घ्यावा असे वाटले नाही, या कृतघ्नपणाची निंदा करावी तेवढी कमीच. त्यांच्यावरील आरोपाची छाननी करून दि. 30 एप्रिल, 1949 ला त्यांना भारतात पोहोचणे शक्य झाले. सावित्री व माया ही खानखोजे यांची दोन कन्यारत्नं. पुढील जीवनात खानखोजे नागपुरालाच स्थायिक झाले. त्यांच्या संशोधनाचा मेक्सिको सरकारने जेवढा लाभ करून घेतला, तेवढा भारत सरकारने घेतला नाही, याची खंत त्यांना सदैव बोचत राहिली.
दि.18 जानेवारी 1967 ला निद्रावस्थेत असतानाच त्यांना चिरनिद्रा घ्यावी लागली आणि एक धगधगते अग्निकुंड शांत झाले. भारतमातेला बंधमुक्त करून आणि संपन्न करण्याचे स्वप्न अपूर्ण ठेवून. पण, उगवत्या पिढीला प्रेरणा देऊन किती समर्पित जीवन जगता येते आपल्या मातृभूमीसाठी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही शेतकरी या पोशिंद्यासाठी किती महान कार्य करता येते, पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जीवनपट हे त्याचे प्रात्यक्षिक आहे. त्यांची दि. 7 नोव्हेंबर ही 138वी जयंती. त्यांच्या जीवनपटाकडे पाहून किती तरुणांना आपल्या कार्यकक्षाची व्याप्ती विस्तृत करावशी वाटते, हे खूप महत्त्वाचे.
-प्रा. वसंत गिरी