महाराष्ट्रीयन लघुउद्योजकांची ‘बिझनेस जत्रा’

05 Nov 2022 17:09:44
bijness jatra
ठाणे:आर्थिक आणि सामाजिक इको- सिस्टीम विकसित करण्यासाठी महाराष्ट्रीयन लघुउद्योजकांची ‘बिझनेस जत्रा’ दि. 11 व 12 नोव्हेंबर रोजी ठाण्यातील टीपटॉप प्लाझा येथे होत आहे. ‘लक्ष्यवेध व ‘ठाणेकर कॅम्पेन पार्टनर अ‍ॅडमार्क मल्टीवेंचर’च्या सहयोगाने होणार्‍या या मेळाव्यात 125 पेक्षा अधिक स्टॉल्स असणार असून वेगवेगळ्या इंडस्ट्रिजशी संलग्न संस्था आणि दिग्गज उपस्थित राहणार आहेत.


या मेळाव्याला मुख्य अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के आणि आ. प्रसाद लाड हे उपस्थित असतील. सहआयोजक गणेश दरेकर आणि अतुल राजोळी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


केंद्र सरकार, राज्य सरकार, ‘टिसा’, कोसिआ आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत असलेल्या या मेळाव्याचे यंदाचे दुसरे वर्ष असून दहा हजारांहून अधिक विविध क्षेत्रातील व्यावसायिक दोन दिवसांत भेट देणार आहेत. भारताच्या ‘इको-सिस्टीम’ तसेच ‘जीडीपी’मध्ये लघुउद्योगांचा मोठा वाटा आहे. त्यासाठी लघुउद्योगांना संकलित करणे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लक्ष्यवेध आणि 30 वेगवेगळ्या संघटनांद्वारे हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यादरम्यान लघुउद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी नामवंत आणि यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन आणि प्रदर्शनदेखील असणार आहे.

Powered By Sangraha 9.0