आप्पा परब यांच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन

04 Nov 2022 17:22:21

appa
 
 
 
मुंबई : श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड आणि दुर्गसृष्टी प्रतिष्ठान, विक्रोळी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ इतिहास संकलक मा. श्री आप्पा परब यांच्या ३४ व्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. "युद्धपति श्रीशिव युद्ध पंचअंग कोष" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवार, २ नोव्हेंबर २०२२ रोजी दादर येथील मामा काणे हॉटेल सभागृहात इतिहासप्रेमींच्या मोठया उपस्थितीत पार पडला.
 
 
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास श्री शिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगडचे अध्यक्ष श्री. सुनिल पवार, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकचे प्रमुख कार्यवाह श्री. राजेंद्र वराडकर आणि कोषाध्यक्ष सौ. मंजिरीताई मराठे, समाजसेविका डॉ. अलका नाईक, जुन्या मुंबईचे इतिहास अभ्यासक श्री. नितीन साळुंखे आणि शिवभक्त श्री. राम धुरी आणि दुर्गसृष्टी प्रतिष्ठान चे संस्थापक श्री समीर वारेकर आदी मान्यवर पाहुणे म्हणून लाभले होते.
 
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आप्पांची लेक सौ. शिल्पाताई परब प्रधान यांनी आप्पांचा आजपर्यंतचा जीवनप्रवास थोडक्यात उलगडवला. दुर्गसृष्टी प्रतिष्ठानचे श्री. समीर वारेकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले कि, छत्रपति शिवाजी महाराज यांच्या कालखंडाशी संबंधित दुर्ग, आरमार, शस्त्र, अश्व आणि युद्ध या पंचअंगाचा शब्दकोष असे या पुस्तकाचे स्वरूप असून सर्वच इतिहासप्रेमी व अभ्यासक यांना उपयोगी पडेल असे हे पुस्तक आहे. केवळ शिवचरित्राचा प्रसार करण्याच्या उद्देशाने अत्यंत अल्प दरात ही पुस्तके प्रकाशित केली जातात. यावेळी त्यांनी आप्पांच्या आजवर शिवचरित्रातील न उलगडलेल्या विषयांवर प्रकाशित केलेल्या ३३ पुस्तकांच्या प्रकाशनाचा अनुभव कथन केला तसेच आप्पांच्या आगामी प्रकाशित होणाऱ्या १० पुस्तकांविषयी सर्वाना माहिती दिली.
 
 
"छत्रपती श्रीशिवाजी महाराजांनी राजाभिषेक पश्चात स्वभाषेच्या रक्षणासाठी आणि वृद्धीसाठी राज्यव्यवहारकोष निर्माण केला, त्यांना गुरू मानणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ उभी करून नवे शब्द मराठी भाषेला दिले. आणि आता छत्रपतींनाच गुरू मानणाऱ्या आप्पांनी हा कोष निर्माण केला". असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा सौ. मंजिरी मराठे यांनी या प्रसंगी सांगितले.
 
 
श्री शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष श्री सुनील पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आजचे हे प्रकाशन खऱ्या अर्थाने शिवभक्तांचा सोहळा असून श्रीशिवप्रभूंना कायम चित्तात स्मरणारे, गुरुवर्य आप्पा आणि त्यांच्या मार्गदर्शनाने विविध विषयांवर आज आपली मुद्रा उमटवणारे गडदुर्गांचे धारकरी, दुर्गप्रेमी, इतिहासप्रेमी यांच्या भेटीचा सोहळा आहे. पुढील वर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीला ३५० वा श्री शिवराजाभिषेक सोहळा किल्ले रायगडावर समितीतर्फे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने श्री आप्पा परब यांनी लिहिलेल्या राजाभिषेक विधी विवेचन या पुस्तकाचे प्रकाशन समितीतर्फे लवकरच करण्यात येईल.
 
 
Powered By Sangraha 9.0