जनरल मुनीर विरुद्ध इमरान खान

    28-Nov-2022   
Total Views |
 
असीम मुनीर
 
 
 
 
अपयशी राष्ट्र ठरलेल्या पाकिस्तानला अखेर नवे लष्करप्रमुख मिळाले आहेत. यापूर्वी जनरल कमर जावेद बाजवा यांनाच मुदतवाढ देण्यात येईल, अशीही एक चर्चा पाकिस्तानात रंगली होती. त्यासाठी जनरल बाजवादेखील प्रयत्नरत असल्याचे म्हंटले जात होते. मात्र, अखेरीस पाकिस्तान सरकारने लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांना नवे लष्करप्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये नव्या लष्करप्रमुखाचा शोध आता संपला आहे.
 
 
या नियुक्तीचा पाकिस्तानच्या लोकशाहीच्या भविष्यावर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता आहे. या नियुक्तीमुळे पाकिस्तानचे भारतासोबतचे संबंध सुधारतील की नाही, याबाबत आताच काही सांगणे, त्याबाबत निष्कर्ष काढणे अतिशय घाईचे ठरणार आहे. मात्र, लष्करप्रमुखांवरून पाकिस्तानमध्ये सुरू असलेले राजकारण अद्याप संपलेले नाही. असीम मुनीर यांच्याकडे लष्कराची कमान सोपवण्याच्या घोषणेसह या शर्यतीत असणारे लेफ्टनंट जनरल अझहर अब्बास यांनी आता निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
मुनीर यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती करण्यामागे शाहबाज शरीफ सरकारचे प्रमुख कारण म्हणजे त्यांना भारताविरोधात लष्करी रणनीती आखू शकेल असा व्यक्ती हवा होता. मुनीर हे भारताला योग्य प्रत्युत्तर देऊ शकतील, असे पाक सरकारचे मत आहे. या नियुक्तीद्वारे आपले राजकीय हित साधण्याचाही शाहबाज सरकारचे प्रयत्न केला आहे. शाहबाज सरकारला आव्हान देणार्‍या इमरान खान यांना शह देणे हे सध्या शाहबाज सरकारसह ‘आयएसआय’ आणि पाक लष्कराचीही गरज आहे. त्यामुळे इमरान खान यांच्या टिकेचे लक्ष्य असलेल्या मुनीर यांना लष्करप्रमुख करून इमरान खान यांच्या राजकारणास शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तान ‘मुस्लीम लीग-नवाझ’ या पक्षाच्या चाहत्यांचा एक मोठा वर्ग मुनीर यांचाही चाहता आहे. शाहबाज सरकार, ‘आयएसआय’ आणि लष्करास आव्हान देणार्‍या इमरान खान यांना मुनीर हेच चाप लावू शकतात, असे त्यांचे मत आहे. त्याचप्रमाणे भारतीय लष्कराच्या रणनीतीस आव्हान देण्याची हिंमत मुनीर यांच्यामध्ये असल्याचा समज पाकिस्तानमध्ये पसरविण्यात आला आहे. मात्र, पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे भेदरलेल्या पाक लष्कराच्या अधिकार्‍यांमध्ये मुनीर यांचाही समावेश होता, हे सोयीस्करपणे झाकण्यात आले आहे.
 
 
अर्थात, मुनीर यांच्या नियुक्तीमुळे पाकिस्तानच्या लष्करामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. त्याचा सामना शाहबाज सरकारसह नवे लष्करप्रमुख जनरल मुनीर यांनाही करावा लागणार असून त्यातून आपले पद शाबूत ठेवण्याचे आव्हान अतिशय मोठे असणार आहे. पाकिस्तानच्या लष्करात फूट पडण्याची चिन्हे आहेत. नवे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही जनरल माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या जवळचे आहेत. यापैकी एक लेफ्टनंट जनरल फैज हमीद हे इमरान सरकारच्या काळात ‘आयएसआय’चे प्रमुख होते. जनरल कमर जावेद बाजवा यांनी त्यांना या पदावरून हटवले आहे. लेफ्टनंट जनरल अझहर अब्बास असे दुसर्‍या अधिकार्‍याचे नाव आहे. तेदेखील इमरान खान यांचे खास अधिकारी मानले जातात.
 
  
लष्करप्रमुखपदावर असीम मुनीर यांची नियुक्ती झाल्यानंतर इमरान खान यांनीदेखील आपल्या रणनीतीमध्ये बदल केल्याचे दिसते. इमरान खानवर 3 नोव्हेंबर रोजी वजिराबादच्या रॅलीत हल्ला झाला तेव्हा त्यांनी ‘आयएसआय’ आणि पाक लष्करावर त्यावेळी आरोप केले होते. परंतु, कोणत्याही लष्करी अधिकार्‍याचे नाव घेतले नव्हते, मात्र मुनीर हेच त्यांच्या लक्ष्यावर असल्याची चर्चा होती. मात्र, आता मुनीर यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांनी आता पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले असल्याचे दिसत आहे. महागाई, बेरोजगारी आणि ढासळत चाललेली अर्थव्यवस्था यासाठी सरकारला जाब विचारण्यास त्यांनी प्रारंभ केला आहे. सध्या इमरान खान जनतेला आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. ’भ्रष्ट व्यवस्था’ हा मुद्दा त्यांनी ऐरणीवर आणला. इमरान खानच्या ‘लाँग मार्च’चे गंतव्यस्थान इस्लामाबाद होते. मात्र, रावळपिंडीत नवे वळण घेतले. यातून त्यांना काय फायदा होणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.