नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून दलित तरुणाची हत्या!

25 Nov 2022 15:34:50
 स्वप्निल नागेश्वर

मुंबई:
नांदेडच्या वसंतनगर परिसरातील रहिवासी असलेल्या एका दलित युवकाची मुस्लीम समाजातील मुलीशी प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वप्निल नागेश्वर असे मृत युवकाचे नाव असून मुस्लीम समुदायातील तरुणीशी त्याचे प्रेमप्रकरण होते. याचाच राग मनात धरून सोमवार, दि. 21 नोव्हेंबर रोजी दुपारी दहा जणांच्या टोळक्याने या प्रेमीयुगुलांवर हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या हल्ल्यात पीडित तरुण स्वप्निल नागेश्वरचा लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडने केलेले मार्‍यामुळे मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून दहा जणांवर ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला असून यापैकी सात जणांना अटकदेखील करण्यात आली आहे, अशी माहिती विमानतळ पोलिसांकडून देण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरील पीडित युवक आणि महिला दोघांचे प्रेमप्रकरण होते. सोमवारी ते दोघेही डंकिन भागातील एका हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर मुस्लीम समाजातील आठ ते दहा लोकांनी या दोघांवरही हल्ला केला. “तू या महिलेसोबत काय करत आहेस,” असा सवाल विचारत त्या दोघांनाही एका गाडीत टाकून काही किलोमीटर अंतरावर घेऊन जात बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचा मारहाणीमुळे मृत्यू झाला अशी माहिती, विमानतळ पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांकडून दै. ’मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधींना देण्यात आली आहे.



आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी

पीडित युवक स्वप्निलच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर विमानतळ पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या ‘कलम 302’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीत आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार, स्वप्निलची प्रेयसी आणि हल्ला करणार्‍या आरोपींचा परस्परांशी काहीही संबंध नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. पोलीस तक्रार दाखल झालेल्यांपैकी शायबाज खान एजाज खान, मोहम्मद सदाम मोहम्मद साजिद कुरेशी, मोहम्मद उसामा मोहम्मद साजिद कुरेशी, शेख अयान शेख इमाम, सोहेलखान साहेबखान, सय्यद फरान ऊर्फ साहिल सय्यद मुमताज आणि उबेद खान युनूस खान अशा एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

तिन्ही प्रकरणांमध्ये कठोर कारवाई होणे गरजेचे


महाराष्ट्रात सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. महिनाभरापूर्वी अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये आदिवासी युवक दीपक बर्डे व मुस्लीम युवतीने विवाह केला म्हणून मुलीच्या घरच्यांनी दीपकची हत्या केली. संभाजीनगरमध्ये अभियंता दलित युवक दीपक सोनवणे व मुस्लीम युवतीचे प्रेम झाले. पण, मुलगी व तिच्या घरच्यांनी विवाहासाठी इस्लाममध्ये धर्मांतरित होण्याची अट घातली. त्याला नकार दिल्याने दीपकचा छळ झाला. मारहाण करून त्याची बळजबरी सुंता केली गेली. असाच प्रकार आता नांदेडमध्येदेखील घडला असून इथेही दलित युवकाचीच हत्या झाली आहे. नोंदणीय बाब म्हणजे, या तिन्ही ठिकाणी आरोपी कट्टरतावादी मुस्लीम आहेत.



श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची समाजात चर्चा होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर कम्युनिस्ट आणि तथाकथित पुरोगामी, आंबेडकरवादी संघटनादेखील मूग गिळून सोयीस्कर मौन बाळगतात हे गंभीर आहे. त्यामुळे इस्लामिक कट्टरतावाद किती दाहक असून त्याचे किती गंभीर परिणाम होत आहेत, ते दिसून येते आहे. समाजाने या प्रकरणांचे अवलोकन करणे गरजेचे असून तिन्ही प्रकरणांमध्ये कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
- सागर शिंदे, राज्य संयोजक, विवेक विचार मंच






Powered By Sangraha 9.0