भारतीय राज्यघटना आणि संस्कृती : आम्ही भारताचे लोक

25 Nov 2022 20:17:16
 
Constitution and Culture
 
 
 
कोणत्याही देशाचे संविधान म्हटले की, काही प्रश्न मनात उपस्थित होतात. एखाद्या देशाचे संविधान तयार होताना कोणत्या मूलभूत गोष्टींचा विचार व्हायला हवा, प्रत्येक देशाचे संविधान हे वेगवेगळे का असते, कोणत्याही संविधानामध्ये त्या देशाची, तेथील संस्कृतीची, परंपरेची, ऐतिहासिक वारशाची आणि सभ्यतेची ओळख प्रतिबिंबित व्हावी की नाही आणि व्हावी तर ती कशा प्रकारे व्हावी, असे ते काही प्रश्न. भारतीय संविधानाच्या बाबतीत या प्रश्नांची अंशत: का होईना, उकल व्हावी, असा एक आज संविधान दिनानिमित्त केलेला हा प्रयत्न...
 
 
आपल्या देशाचे नाव ‘इंडिया’/ ‘भारत’ असे ठेवण्यामागे संविधान सभेतदेखील सविस्तर चर्चा झाल्याची पाहावयास मिळते. संविधान सभेतील चर्चेदरम्यान एम. ए. अय्यंगार यांनी ‘भारतवर्ष’, ‘भारत’, ‘हिंदुस्थान’; शिब्बनलाल सक्सेना यांनी आपल्या देशाचे नाव भारत असावे, असे आग्रही मत मांडले.
 
 
सेठ गोविंददास यांनी देशाचे नाव ‘भारत’ असेच असावे आणि त्यासाठी सभागृहाचे एकमत व्हावे, असे मत प्रदर्शित केले. कमलापती त्रिपाठी यांनी स्वतंत्र होणार्‍या नव्या, परंतु पुरातन इतिहास असणार्‍या देशाच्या बारशाची आवश्यकता तरी आहे का, असे मत प्रदर्शित करून त्या काळी इंग्रजांनी प्रचलित केलेले नाव ‘इंडिया’ हे पुरेसे आहे, असे प्राथमिक मत प्रतिपादित केले.
सेठ गोविंददास यांनी बारशाच्या विधीसाठी मुहूर्त पाहून, अतिशय सुंदर नाव ठेवले जाते, असे प्रतिपादित करून आनंद व्यक्त केला. देशाचे नाव ‘भारत’ असे ठेवले जाते आहे. परंतु, त्यांनी सूचना केली की, ’इंडिया दॅट इज भारत’च्या ऐवजी ‘भारत, जो परदेशात इंडिया म्हणूनदेखील ओळखला जातो,’ अशी सूचना केली. पुरातन असे नाव देत असताना आपण देशाला मागे घेऊन जात नाही आहोत, असेदेखील ठामपणे मत मांडले. त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामाचे उदाहरण देऊन, ‘भारतमाता की जय’ या घोषणेच्या आधारे स्वातंत्र्याचा लढा लढला गेला, याचीदेखील आठवण सभागृहास करून दिली.
 
 
कला व्यंकटराव यांनी ‘भारत’ या नावाचे स्वागत करीत, ‘भारत’ या नावाचे ऋग्वेदातील, तसेच वायुपुराणातील संदर्भ दिले. कमलापती त्रिपाठी यांनी पुन्हा भाषण करताना अत्यंत धडाकेबाज मांडणी केल्याचे दिसून येते. ते म्हणतात, “पारतंत्र्याच्या बेड्यांनी जेव्हा देश जखडला जातो, तेव्हा त्याचे स्वत्व तो विसरतो. आपल्या देशानेही हजार वर्षांच्या गुलामगिरीतून आपले, सर्वस्व, संस्कृती, स्वाभिमान, इतिहास सगळे गमाविले आहे. आज पुन्हा एकदा आपला देश नव्याने उभारी घेत आहे. त्याच्या पुरातन नावासह, आपल्या देशाची या पारतंत्र्यातून मुक्तता होऊन त्याच्या मूळच्या आत्मप्रकाशाने हा देश मोठी भरारी मारेल, यात कोणतीच शंका नाही. केवळ ‘भारत’ या नामोच्चाराने जादुई पद्धतीने तत्क्षणी शेकडो वर्षांच्या सांस्कृतिक इतिहासाचे, संस्कृतीचे, इथल्या ऋषी आणि ज्ञान परंपरेचे स्मरण होते, यासोबतच स्मरण होते. आद्य शंकराचार्यांचे, प्रभू श्रीरामाच्या धनुष्याचे आणि कृष्णाच्या सुदर्शनचक्राचे, ऋग्वेदातील ऋचांचे, देशाच्या सीमांचे, हिमालयाचे आणि त्रि-सागरांचेदेखील स्मरण होते.”
 
 
जगात कदाचितच एखादा असा देश असेल, ज्यास आपल्या इतका वारसा लाभला असेल. वेद आणि पुराण काळाचे दाखले देत, देवांनादेखील या भूमीवर वारंवार जन्म घेण्याची इच्छा होते, असे कमलापती म्हणले होते. ते पुढे म्हणतात, “सनातन संस्कृतीचा प्रभाव या राष्ट्रात जन्म घेऊन जगभर पसरला.”
 
 
हर गोविंदपंत यांनी भारताच्या पुरातन, इतिहासाचे वर्णन करीत- ‘जंबू द्वीपे, भारत वर्षे, भारत खंडे, आर्याव्रते...’ स्नान आणि नैमित्तिक कर्मे करताना संकल्प करताना घेतो, असे मत मांडले. पुढे संस्कृत कविकुलगुरू कालिदासाच्या ‘शाकुंतल’चे नाव घेऊन दुष्यंत आणि शकुंतलेचा पुत्र भारत आणि त्या भारताच्या शौर्याचे वर्णन केलेले आढळते. ते ज्या उत्तर भारतातील लोकांचे सभागृहात प्रतिनिधित्व करतात, त्या सर्वांची इच्छा आपल्या देशाचे नाव ‘भारतवर्ष’ असावे, अशीच आहे.
 
 
भारताच्या जाज्वल्य इतिहासाची, संस्कृतीची आणि मापदंडांची चर्चा होऊन ’इंडिया दॅट इज भारत’ म्हणजेच ‘भारत’ या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आणि या पुरातन सांस्कृतिक वारसा लाभलेल्या भारताच्या लोकांनी राज्यघटना लिहिली, जिचा आपणा सर्वांना सार्थ अभिमान आहे.
 
 
सर्वसामान्य समज असा की, संविधान हे केवळ आपल्या नागरी विधानाचे सर्वोच्च घोषणापत्र असते. परंतु, हा केवळ इतकाच मर्यादित विषय नाही, तर आपले संविधान ही आपली ओळख असते आणि ती तशी असायलाच हवी. म्हणूनच घटना लिहिताना आपल्या संविधानाची सुरुवातच ’आम्ही भारताचे लोक’ अशी होते. आपल्या घटनेच्या उद्देशिकेमध्ये पुढे आपण भारताला सार्वभौम, लोकशाही गणराज्य बनवण्याचा संकल्प केला. उपरोक्त नमूद सर्वोच्च जीवनमूल्यांचा कालसापेक्ष बदल करून आपल्या नागरिकांना सर्वांगीण न्याय, स्वातंत्र्य आणि समानता प्राप्त करून देण्याचा निर्धार राज्यघटनेत केला गेला. या सर्वांमध्ये आपण व्यक्तीची प्रतिष्ठा आणि आपल्या राष्ट्राची एकता प्रवर्धित करण्याचा संकल्पदेखील केला. ही वचनबद्धता घेऊन आपला देश पुढे नेणे, ही काही सोपी गोष्ट नव्हती. मग ही सगळी जबाबदारी कोणी घेतली तर ती ’आम्ही भारताच्या लोकांनी!’
 
 
मग प्रश्न असा उपस्थित होतो की, ‘आम्ही भारताचे लोक’ म्हणजे कोण? आपली ओळख काय? निश्चितच हे शोधण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल, निदान आपण जेव्हा पारतंत्र्यात गेलो, त्यापूर्वी जेव्हा आपण सर्वार्थाने स्वतंत्र होतो तिथपर्यंत.
म्हणजेच सर्वसाधारपणे एक ते दीड हजार वर्षांपूर्वीचे आपण. त्यावेळची आपली सामाजिक, सांस्कृतिक राजकीय ओळख काय होती, आपली सार्वत्रिक अभिव्यक्ती काय होती, आपल्या सामूहिक प्रेरणा काय होत्या हे आपण शोधून पाहावे, असे आपल्या घटनाकारांना ’आम्ही भारताचे लोक’ या तीन शब्दांतून सूचित करायचे असावे. आपले संविधान तयार करताना देखील ही बाब प्रकर्षाने लक्षात घेतली गेली, हे उपरोक्त निवेदनातून स्पष्ट होते.
 
 
यामधून ‘भारतीय’ ही आपली प्रधान ओळख असली पाहिजे, असे घटनाकारांना वाटत होते, हे लक्षात घेतले पाहिजे. आजही ही भारतीयत्वाची भावना आपल्यामध्ये खोलवर रुजलेली दिसते. आपणही एखाद्या समूहाला संबोधून झाल्यावर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ असे म्हणतो. यावरूनदेखील आपल्यासाठी आपली ‘भारतीय’ ही ओळख ’प्रथम ओळख’ असल्याचे आपण अनुभवतो.
 
 
-अधिवक्ता प्रवीण देशपांडे
 
-अधिवक्ता आशिष सोनवणे
 
 
 
Powered By Sangraha 9.0