भक्तीशिवाय जगण्याला अर्थ नाही!

02 Nov 2022 21:44:00
 
भक्ती
 
 
 
भक्तीशिवाय जगणे हीनदर्जाचे होते. असे दैन्यवाणे जीवन जगण्यात काही अर्थ नसतो. हे अतिमूर्खपणाचे लक्षण आहे. अशा गर्व, ताठा, उद्धट जीवन जगण्याने त्या माणसाचे दुःख दिवसेंदिवस वाढत जाते. भक्तिहीन जीवनात दुर्गंणांचा प्रवेश होऊन एक विलक्षण नैराश्य माणसाच्या वाट्याला येते. यासाठी प्रत्येकाने वेळीच सावध होऊन भगवंतावर, रामावर मोठ्या आदराने प्रेम करण्याचा अभ्यास करावा.
 
 
 
 
दासबोधाप्रमाणे मनाचे श्लोक सांगताना समर्थांची भूमिका लोकशिक्षकाची आहे, हे लक्षात येते. खर्‍या रामभक्ताच्या अंतरंगातील असणार्‍या आनंदाचे वर्णन सांगून झाल्यावर ज्याला भगवंताच्या भक्तीचा आनंद माहीत नाही, अशा करंट्या माणसाचे वर्णन स्वामी ‘त्यागार्थ’ करतात. अशी दोन्ही प्रकारची वर्णने आपल्या समोर ठेवल्याने आपण काय करायला हवे आणि काय करायला नको, ते श्रोत्यांना ठरवता येते. ‘शहाणे करूनी सोडावे सकळ जन’ असे स्वामींना वाटत असल्याने लोकांनी काय स्वीकारायचे आणि काय सोडून द्यायचे, याची कल्पना एखाद्या अध्यापन कुशल शिक्षकाप्रमाणे स्वामी लोकांसमोर मांडतात. त्याहीपुढे जाऊन आपल्यासारख्या नाठाळ विद्यार्थ्यांसाठी स्वामी दृष्टांताचा आधार घेऊन त्यांचे विचार अधिक स्पष्ट करतात. आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वीच्या श्लोकात स्वामी म्हणाले की, हा करंटा मनुष्य घरची कामधेनू दुर्लक्षित करून बाहेर फुकटात ताक मिळते का, ते शोधत गावभर हिंडतो; किंवा या अभ्याग्याच्या अंगणात ’चिंतामणी’ पडलेला असला, तरी त्याकडे न बघता रंगीबेरंगी काचेचे तुकडे गोळा करीत तो हिंडतो आणि त्याला ते काचखंड हवे तेवढे मिळतात. थोडक्यात, या दृष्टांतांद्वारा स्वामींनी सांगायचे आहे की, माणसाला आपल्या अंतरंगातील भगवंताच्या आनंदाचा ठेवा न दिसता तो क्षुल्लक विषयातील भासमान आनंद शोधत फिरत असतो. परंतु, असे करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. हे मूर्खपण वारंवार करणार्‍या माणसाची बुद्धी ठाम कशी असेल, हेच स्वामींना पुढील श्लोकातून सांगायचे आहे.
 
 
 
अती मूढ त्या दृढ बुधी असेना।
अती काम त्या राम चित्तीं वसेना।
अती लोभ त्या क्षोम होईल जाणा।
अती वीषईं सर्वदा दैन्यवाणा॥64॥
 
 
 
विकारांच्या आहारी गेलेल्या व त्यामुळे सारासार विचारशक्ती गमावून बसलेल्या माणसाचे वर्णन स्वामींनी येथे केले आहे. तथापि विकारांच्या बाबतही स्वामींचा विवेक कायम असल्याने ते ‘अती’शब्दाचा वापर करून त्याचे दुष्परिणाम सांगतात. काम, लोभ किंवा संताप त्यांच्या शुद्ध स्वरूपात आपले शत्रू नाहीत. त्यांचा अतिरेकी वापर माणसाच्या नाशाला कारणीभूत होतो, असे स्वामींना सांगायचे आहे. सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी अल्प प्रमाणात का होईना, पण काम, लोभ, संताप हे उपयोगी पडतात. वैयक्तिक तसेच सामाजिक जीवनातील समतोलपणा साधण्यासाठी हे अल्पप्रमाणात वापरण्यात काही गैर नाही. निसर्गाने दिलेल्या या देणग्या आहेत. त्यामुळे त्यांचा विवेकपूर्ण वापर मानवी जीवनाच्या विकासाला हातभार लावतो. यापैकी कामाचे उदाहरण पाहा. ही जीवसृष्टी चालू राहावी म्हणून धर्मानुकूल कामाला व्यवहारात विशेष स्थान आहे.
भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की, सर्व भूतांच्या ठिकाणी धर्माला अनुकूल असणारा काम मी आहे.
 
 
 
बलं बलवतां चाहं कामरागविनर्कितम्।
धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ॥ (7.11)
 
 
 
परंतु, जेव्हा हा भोग शुद्ध स्वरुपात न राहता अमर्याद उपभोगला जातो, तेव्हा साहजिकच त्याला पापाच्या सदरात टाकावे लागते. ज्याच्या मनात अपरिमित काम आहे, जो अतिकामाने वेडापिसा झाला आहे, तो स्थिरबुद्धी असू शकत नाही. अशा अस्थिर चंचल बुद्धी असलेल्यांच्या अंत:करणात राम राहणार नाही. ज्याच्या ठिकाणी अतिलोभ आहे, त्याला कशातही समाधान मिळणार नाही. कारण, कितीही मिळाले तरी ‘आणखी हवे’ हा लोभी, हावरट स्वभाव त्याला आनंदापासून दूर ठेवेल. अतिलोभी माणसाला कुठे थांबायचे ते कळत नाही. प्रत्येक वेळी हवे ते मिळेलच असे नाही. न मिळाल्याचे दु:ख लोभी माणसाला फार असते. त्यामुळे त्याच्या मनात तीव्र संतापाची लाट उसळते. त्यामुळे दु:खात आणखी भर पडते. अशा रितीने विकारांना अतिरेकी स्वरुप मिळाल्यावर हा माणूस त्यांच्या तृप्तीसाठी दीनवाणेपणे इकडे तिकडे फिरत असतो. हा सुखाभाव बाहेरुन येणारा असल्याने त्याला त्यासाठी लाचारी पत्करावी लागते. म्हणून समर्थ वरील श्लोकात म्हणतात की, ‘अती वीषईं सर्वदा दैन्यबाणा’ अशा आशाळभूत लाचार कधी सुखी होऊ शकत नाही. म्हणून असे हे भक्तिहीन लाचार जीवन जगण्यात अर्थ नाही,’ हाच अभिप्राय स्वामींनी पुढील श्लोकात व्यक्त केला आहे-
 
 
 
नको दैन्यवाणें जिणें भक्तिगुणें।
अती मूर्ख त्या सर्वदा दु:ख दूणें।
धरी रे मना आदरें प्रीति रामीं।
नको वासना हेमधामी विरामी॥65॥
 
 
 
भगवंताच्या भक्तीशिवाय जे जगणे आहे, ते दैन्यवाणे आहे, असा अभिप्राय समर्थांनी व्यक्त केला आहे. भक्तीत समर्पणाची भावना असते, भक्ती आपले सर्वस्व रामाला अर्पण करून भक्ती करत असतो. भौतिक गोष्टी जीवनात शक्य असतात. त्या रामाला अर्पण करायच्या म्हणजे, त्याची आसक्ती, हाव कमी करायची. देवळात देवदर्शनाला गेल्यावर तिथे दानपेटीत आपण काही पैसे टाकतो. ते टाकताना मी फार श्रीमंत आहे किंवा देवाला, देवळाला पैशांची आवश्यकता आहे, म्हणून हे दान नसते. त्या दानामागचा उद्देश माझी पैशांवरची आसक्ती सुटावी, हा असावा. तसे न करता केलेले अल्प दानही माणसाची देहबुद्धी वाढवते. देहबुद्धी पाठोपाठ गर्व, ताठा, दुराभिमान हे दुर्गण येतात आणि भक्तीशिवाय जगणे हीनदर्जाचे होते. असे दैन्यवाणे जीवन जगण्यात काही अर्थ नसतो. हे अतिमूर्खपणाचे लक्षण आहे. अशा गर्व, ताठा, उद्धट जीवन जगण्याने त्या माणसाचे दुःख दिवसेंदिवस वाढत जाते. भक्तिहीन जीवनात दुर्गंणांचा प्रवेश होऊन एक विलक्षण नैराश्य माणसाच्या वाट्याला येते. यासाठी प्रत्येकाने वेळीच सावध होऊन भगवंतावर, रामावर मोठ्या आदराने प्रेम करण्याचा अभ्यास करावा.
 
 
 
माणसाने मिळालेले ऐश्वर्य जरूर भोगावे, पण ते भगवंताशिवाय असू नये. भगवंताचा विसर पडला तर ती संपत्ती मी मिळवली, असा गर्व होऊन त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. अगदी सोन्याच्या घरात राहायला मिळाले आणि तेथे रामाच्या प्रेमाचा विचार नसेल, रामाची भक्ती नसेल, तर ते व्यर्थ आहे, अशी वासना कधीही करू नये म्हणून एका श्लोकाच्या शेवटच्या ओळीत समर्थ सांगतात की, ‘नको वासना हेमधामी विरामी.’ असे म्हणतात की, रावणाचे ऐश्वर्य खूप होते. ‘लंकेत सोन्याच्या विटा’ अशी एक म्हण मराठीत आली ती त्यामुळेच आणि असावी. तथापि रावण अत्यंत गर्विष्ठ, कपटी देवांना कैदेत ठेवणारा निर्दयी होता. शिवाय तो सत्वगुणी रामाचा द्वेष करणारा होता. त्यामुळे त्याचे सोन्याचे घर रामविरहित म्हणजे ‘विरामी’ असल्याने त्याचा नाश होणार हे ठरलेले होते. जेथे एक विचार सहज मनात आला की, रामाचे सैन्य मारूतीराय व इतर सेवकवर्ग रामरावण युद्ध रामाने जिंकल्यावर तेथील सुवर्णनगरीत न राहता रामाबरोबर परत फिरले. त्यांना तेथील वैभवाचे आकर्षण वाटले नाही. या प्रसंगावरून स्वामींना ‘नको वासना हेमधामी विरामी’ हे शब्द सुचले असावेत. अर्थात, हेही तितकेच खरे आहे की, समर्थ्यांच्या प्रतिभेचा शोध घेणे कठीण आहे .
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0