‘एकपात्री’ची ‘चितळे एक्सप्रेस’

02 Nov 2022 20:54:16
 
MTB


 
 
 
 
आपल्या सुबोध वाणीने एकपात्री अभिनयाची ‘चितळे एक्सप्रेस’ घेऊन निघालेले असामी, सुबोध चितळे यांच्याविषयी...
 
 
 
ठाण्यातील ‘श्रीरंग सोसायटी’त बालपणापासून वास्तव्यास असलेले चतुरस्र असामी सुबोध चितळे यांची एक चाकरमानी ते अभिनय क्षेत्रातील वाटचाल अविस्मरणीय आहे. आई-वडील दोघेही सरकारी सेवेत असल्यामुळे घरी सुबत्ता होती. सुबोध यांचे पहिले ते पाचवीपर्यंतचे शिक्षण ठाण्यातील ‘बेडेकर विद्यामंदिर’ येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण त्यांनी ’श्रीरंग विद्यालया’तून पूर्ण केले. 1976 साली ते शाळेत पहिले आले होते. नंतर उल्हासनगरच्या चांदीबाई महाविद्यालयातून ‘मायक्रो बायोलॉजी’ या विषयात पदवी प्राप्त केली. लहानपणापासूनच अभिनय क्षेत्राची आवड असल्याने ‘श्रीरंग सहनिवास सार्वजनिक गणेशोत्सवा’मध्ये छोट्या एकांकिका किंवा नाटकातही ते अभिनय करीत. त्यामुळे अभिनयाचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. परंतु, वडिलांच्या आग्रहाखातर त्यांनी धोपटमार्गाने नोकरीचा मार्ग पत्करला. विक्री क्षेत्रात अपघाताने आल्याचे ते सांगतात. पुढे विक्री अधिकारी म्हणून विविध खासगी उद्योगक्षेत्रात त्यांनी तब्बल 35 वर्षं नोकरी केली. दरम्यान, नोकरीत असताना विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्येही सहभागी होण्याचा सुबोध यांचा शिरस्ता कायम होता. त्या अनुषंगाने ‘श्रीरंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’त सादर होणार्‍या देखाव्याला अनुसरून काही वर्षे निवेदकाची भूमिका यशस्वीपणे त्यांनी पार पाडली. यात भाजपच्या नेत्यांची तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचीही साथ लाभल्याचे ते सांगतात.
 
 
 
नोकरी आणि सांस्कृतिक उपक्रम अशी वाटचाल सुरु असतानाच 2009 साली कर्करोगाने सुबोध यांच्या वडिलांचे निधन झाले. या धक्क्याने त्यांच्या आईला ‘अल्झायमर’च्या आजाराने ग्रासले. तिच्या सततच्याच्या आजारपणामुळे 2016 मध्ये सुबोध यांनी नोकरी सोडून साधारण दीड वर्ष तिची सेवासुश्रुषा केली. मात्र, 2018 साली आईचे देहावसान झाले. तरीही आई गेल्याचे दुःख करीत न बसता सुबोध यांनी मराठी मालिकांमधून छोट्या-छोट्या भूमिका साकारायला सुरुवात केली. आत्तापर्यंत त्यांनी तब्बल 23 मराठी मालिकांमधून भूमिका साकारल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून अभिनय क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे सुबोध प्रत्येक भूमिकेला न्याय देताना दिसतात.
 
 
 
कोरोना काळात ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’च्या नागपूर येथील ऑनलाईन एकपात्री स्पर्धेमध्ये ते प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले होते. ‘महाराष्ट्रभूषण’ पु. ल. देशपांडे यांच्या ‘असा मी असामी’ या एका कारकुनाच्या (काल्पनिक) आत्मचरित्रावर आधारित, स्वयंसंकलित केलेला 40 मिनिटांचा ‘मनोरंजनाचा बूस्टर’ हा एकपात्री कार्यक्रम सध्या ते सादर करीत आहेत. ’मैत्रीचं देणं’ ही संकल्पना मनाशी ठेवून ज्येष्ठ नागरिकांच्या मनातील दडपण दूर करण्यासाठी घराघरात ’असा मी असामी’चे प्रयोग करीत असल्याचे ते सांगतात.
 
 
 
विक्री क्षेत्रातील नोकरीनिमित्त शेवटची 24 वर्षं भारतभ्रमण त्यांना करावे लागले. त्यामुळे पत्नी वंदना हिने घरगुती शिकवण्या घेऊन मुलांचे व कुटुंबीयांचे संगोपन व जडणघडणदेखील केली. त्याबद्दल सुबोध कृतज्ञता व्यक्त करतात. अशा सहृदयी पत्नीचे 2019 मध्ये कर्करोगाने निधन झाले. आई - वडिलांच्या जाण्यानंतर मनावर झालेला हा मोठा आघात झेलून दोन मुलं व सासूबाईंची जबाबदारी सुबोध यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यांची मोठी मुलगी ‘एसएपी कन्सल्टंट’ म्हणून अमेरिकन कंपनीत नोकरीला आहे, तर आईच्या निधनानंतर पाचव्या दिवशी परीक्षेला बसून वयाच्या 22व्या वर्षी मुलगा ‘चार्टर्ड अकाऊंटंट’ बनला आहे. यासाठी सुबोध यांनीच त्याला सकारात्मक मार्गदर्शन केले होते.
 
 
 
अभिनय क्षेत्रात एकपात्री कार्यक्रमासोबत मराठी मालिकांतून भूमिका साकारताना, घर-प्रपंच सांभाळून सुबोध सामाजिक कार्य करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख म्हणून ‘वृंदावन’ विभागासाठी कार्यरत आहेत. याशिवाय सामाजिक बांधिलकी म्हणून ठाण्यातील सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांना गोष्टी व कथाकथनाचे कार्यक्रम करून छोटेसे योगदान देत आहेत.
 
 
 
आयुष्यात आपल्या हातून झालंच तर चांगलं होवो, तसेच कुणाचे कधीही वाईट होऊ नये, ही भावना मनाशी बाळगून, अनाथ बालके व वृद्धांसाठी आर्थिक वा वस्तूरूपाने जमेल तेवढे योगदान देणार्‍या सुबोध यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठीदेखील निधी संकलनाचे काम निष्ठेने बजावले आहे.
 
 
 
“हल्लीच्या पालकांनी त्यांच्या मुलांना घडवताना पैसा आहे, म्हणून वाटेल तसा न उधळता, मुलांना पैशांची किंमत कळावी, अशाप्रकारे आचरण करावे. पुढील पिढीसाठी तेच योग्य मार्गदर्शन ठरुन मुले बिघडण्याचा धोका कमी होईल,” अशा भावना ते व्यक्त करतात. अशा या लोकप्रबोधनाचा वसा घेऊन अनाथ, गरजू व वृद्धांसाठी कार्य करण्याची तळमळ व इच्छा बाळगलेल्या, सुबोध चितळे यांच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0