ज्या मुर्खाला राष्ट्रगीत कळत नाही, तो राष्ट्रपुरुषांना काय ओळखेल?

17 Nov 2022 12:44:43

Rahul Gandhi




मुंबई :
"ज्या मुर्खाला राष्ट्रगीत कळत नाही, तो राष्ट्रपुरुषांना काय ओळखेल?", असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना टोला लगावला आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी निवेदकांचा माईक खेचून राष्ट्रगीत सुरू करा, अशी मागणी केली होती. त्यावेळी भारतीय राष्ट्रगीत सुरू होण्याऐवजी नेपाळचं राष्ट्रगीत सुरू झाल्यानं राहुल गांधींसह मंचावर उपस्थित अनेक नेते बुचकळ्यात पडले. विशेष म्हणजे राष्ट्रगीताची सुरुवातच कळत नसेल, त्यांना देश काय कळणार, अशा प्रकारची टीकाही राहुल गांधींबद्दल केली जात आहे.

भारत जोडो यात्रेत दिवसाच्या शेवटी राहुल गांधींसह महत्वाच्या नेत्यांची भाषणे होतात. त्याच्या समारोपाला राहुल गांधींनी आता राष्ट्रगीत सुरू करा, अशी सूचना साऊंड सिस्टीमकडे केली होती. यावेळी मंचावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह अन्य नेते मंडळीही उपस्थित होती. मात्र, यावेळी राष्ट्रगीताऐवजी नेपाळचे राष्ट्रगीत सुरू झाले. मंचावर उपस्थितांना नेमका प्रकारच कळेना. शेवटी राहुल गांधींनाच राष्ट्रगीत लावा राष्ट्रगीत, असे ओरडून सांगावे लागले. तोपर्यंत घडल्या प्रकाराचे वार्तांकन संपूर्ण देशभरात झाले होते.





यावरुन आता राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. काँग्रेसच्या कार्यक्रमात राष्ट्रगीताचा अवमान होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ११ ऑगस्ट २०१८मध्ये राजस्थानच्या जयपूर येथील एका कार्यक्रमात राहुल गांधींसह सचिन पायलट, अशोक गहलोत यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते. राजस्थानच्या काँग्रेस प्रतिनिधींच्या संमेलनाच्या कार्यक्रमावेळी राष्ट्रगीत सुरू झाले मात्र, राहुल गांधींसह अन्य नेते मंडळी हास्यविनोद करत मंचावर उभी होती. अखेर राष्ट्रगीत सुरू झाल्याचे कळताच एका ठिकाणी स्तब्ध उभे राहिले.







राहुल गांधींच्या सभेतील या प्रकारावर भाजप नेत्यांनीही सडकून टीका केली आहे. भारत जोडो वाल्यांचं हे राष्ट्रगीत आहे का, असा सवाल आता राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनीही विचारला आहे. लेखिका शेफाली वैद्य म्हणतात, "ज्या राहुल गांधींना राष्ट्रगीताच्या ओपनिंग बार्सचीही माहिती नाही ते काय देश जोडणार?". असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.








राहुल गांधींनी महाराष्ट्रात आल्यावर पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. सावरकरांनी ब्रिटीशांच्या माफीसाठी पत्र लिहीली होती, अशी सावरकरविरोधी गरळ ओकली आहे. महाराष्ट्रात येऊन अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्या राहुल गांधींच्या भारत जोडोला महाराष्ट्रातच रोखा, अशी टीका बाळासाहेबांची शिवसेना गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याकडे केली आहे. सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.




Powered By Sangraha 9.0