पंतप्रधान स्वनिधी कर्ज योजनेद्वारे फेरीवाले आत्मनिर्भर

17 Nov 2022 18:41:57

देवेंद्र फडणवीस
 
 
 
ठाणे : पंतप्रधान (पीएम) स्वनिधी या फेरीवाला कर्ज योजनेसाठी ठाणे महापालिका क्षेत्राला ११ हजार २३७ अर्जांचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्यामुळे सर्व सहाय्यक आयुक्तांनी वैयक्तिक लक्ष घालून हा टप्पा लवकरात लवकर पार करावा, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतेच दिले.
 
 
पीएम स्वनिधी ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्याबाबत मुंबईत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांची बैठक घेऊन उद्दिष्टपूर्तीबद्दल सूचना दिल्या होत्या. डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम स्वनिधीच्या लाभार्थीना १० हजार रुपयांचे वितरण होणार आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
 
 
'स्वनिधी से समृध्दी तक' या दुसऱ्या टप्प्यात ठाण्याची कामगिरी चांगली आहे. त्याची शिबिरे दर आठवड्याला घेतली जावीत. फेरीवाल्यांना डिसेंबर २०२४ पर्यंत पहिल्या टप्प्यात १० हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात ५० हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात ८० हजार रुपये मिळू शकतील. आताच्या काळात कोणत्याही हमी शिवाय असे कर्ज मिळणे अशक्य आहे. म्हणूनच जास्तीत जास्त फेरीवाल्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही बांगर यांनी केले.
 
 
बँका व प्रशासनाला आयुक्तांच्या सूचना
 
कोरोना काळात बसलेल्या आर्थिक फटक्यातून सावरण्यासाठी केंद्राने ही योजना आणली आहे. तेव्हा फेरीवाल्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, हे आपले नैतिक कर्त्यव्य आहे,अर्ज करण्यात काही अडचणी असतील तर त्यात स्वतः लक्ष घालावे. प्रत्येक प्रभागात २ हजार अर्ज भरावेत.बदललेल्या नियमांमुळे आता जुन्या अर्जातील काही जण पात्र ठरू शकतील, अर्ज भरण्याचा संपूर्ण प्रक्रियेसाठी फेरीवाल्यांचा एक दिवसापेक्षा जास्त वेळ जाणार नाही, याची दक्षता घेऊन एक तासात अर्ज भरून घ्यावा.केंद्र सरकारने ठरवून दिलेल्यापेक्षा कोणतीही अधिक कागदपत्रे बँकांनी मागू नयेत. तसेच, फेरीवाल्यांचे शून्य शिल्लक खाते विनाअडथळा उघडले जावे. या कर्जासाठी पात्र ठरले तरी अधिकृत फेरीवाल्याचा दर्जा प्राप्त होत नाही. अशा सूचनाही आयुक्त बांगर यांनी दिल्या.
 
 
 
.
Powered By Sangraha 9.0